महाराष्ट्र
Trending

मराठ्यांच्या बैठकीत गोंधळ… कोणी केला? का केला? इति वृत्तांत… वाचा सकल मराठा समाज समन्वयक योगेश केदार यांच्याच शब्दात !

Story Highlights
  • मागचे अनुभव होते की कुणीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण हा मुद्दा लावून धरत नाही. मग आपण आपला मुद्दा रेटून धरायचा, या स्पष्ट हेतूने आम्ही बैठकीला गेलो - सकल मराठा समाज समन्वयक योगेश केदार
  • मंत्री महोदयांमुळे समाज नाही तर समाजामुळे मंत्री आहेत. तुमच्यामुळे आम्ही नाहीत तर आमच्यामुळे तुम्ही आहात.

मुंबई, दि. १९ – मराठा समाजाने काढलेल्या शांततामय विराट अशा मराठा आरक्षण मोर्चाची संपूर्ण विश्वाने सोनेरी आक्षरात दखल घेतली खरी मात्र, अजूनही मराठा आरक्षण पूर्णत्वास गेले नाही. मराठा वनवास यात्रेनिमित्त पुन्हा एकदा राज्याचे राजकारण ढवळून निघत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल तातडीने राजधानी मुंबईत बैठक बोलावली. राज्यभरातून मराठा समन्वयकांना या बैठकीला बोलावण्यात आले. ५० टक्केच्या आत ओबीसीमधूनच आरक्षण द्या, अशी मागणी सकल मराठा समाज समन्वयक योगेश केदार यांनी केली. एकूणच बैठकीत कसा गोंधळ झाला? कोणी केला? का केला? वाचा सकल मराठा समाज समन्वयक योगेश केदार यांच्याच शब्दात….

चंद्रकांत दादा पाटील यांच्या कडून बैठकीला येण्याच्या विनंतीचे फोन आले तेंव्हा देखील मी त्यांना सांगितले होते. आम्ही वनवास यात्रा काढतोय, आमचा उद्देश स्पष्ट ओबीसी आरक्षणचा आहे. त्यावर बोलणार आहेत का? त्यावर तिकडून सांगितले गेले की तुमच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवरच ही बैठक आहे. मग मला संशय आला की सदर बैठक उभ्या राहत असलेल्या चळवळीत फूट पाडण्याचा डाव देखील असू शकतो. म्हणून आम्ही सर्व सहकाऱ्यांशी चर्चा करून बैठकीत जाण्याचा निर्णय घेतला. मागचे अनुभव होते की कुणीही मराठ्यांना ओबीसी आरक्षण हा मुद्दा लावून धरत नाही. मग आपण आपला मुद्दा रेटून धरायचा, या स्पष्ट हेतूने आम्ही बैठकीला गेलो.

तिथे जान्या अगोदर काही लोकांनी मला टीप दिली की आजच्या बैठकीत काही लोकं गोंधळ घालणार आहेत. आम्ही जेंव्हा सह्याद्री गेस्ट हाऊसमध्ये पोचलो तेंव्हा तिथे चंद्रकांत दादांचे पी ए भेटायला आले. दहा वीस लोकांच्या उपस्थिती मी मोठ्याने त्यांना सूचना केली की आजच्या बैठकीत सारथी अन् अण्णासाहेब पाटील महामंडळावर चर्चा कमी करा. किंवा आधी आरक्षणावर चर्चा होऊ द्या मग इतर विषय घ्या. पण दादाच्या स्टाफ ने तो विषय त्यांच्या कानी घातला नसावा.

बैठक सुरू झाली, अन् सुरुवातीलाच मुद्दा सारथीचा घेतला गेला. सारथीचे अधिकारी काकडे यांनी लांबलचक लिहिलेलं वाचून दाखवायला सुरुवात केली. सारथी देत असलेले लाभ वगेरे सांगत बसले.

तेंव्हा मी उठून म्हणालो, की दादा, सारथीचे जे निर्णय तुम्ही already घेतले आहेत. ते थेट पत्रकार परिषदेत जाहीर करा. सारथीमध्ये ‘पी एच डी’ च्या विद्यार्थ्यांचा ‘डेट ऑफ रजिस्ट्रेशन’ विषयासारखा एकच महत्वाचा मुद्दा घ्या. बाकी आपण आरक्षणावर चर्चा घडवून आणा. ही बैठक जर आरक्षणाच्या नावाने बोलावली गेली असेल तर त्याच विषयाला जास्त महत्त्व द्या. प्रत्येक वेळी असेच घडते. सारथी आणि अण्णासाहेब महामंडळावर एकतर थोडक्यात बोला किंवा आरक्षणाची चर्चा झाल्यानंतर ते विषय घ्या. मग चंद्रकांत दादा म्हणाले की थोडं थांब मी तुझी हवाच काढून घेतो. यांचीच हवा समाज भविष्यात नक्की काढेल. असो,

त्यानंतर लगेच माजी मंत्री आणि आमदार प्रवीण दरेकर बोलू लागले. तुम्ही मंत्री महोदयांना अशा जाहीर सूचना कशा काय देऊ शकता. चंद्रकांत दादा मंत्री आहेत हे लक्षात ठेवा. तुम्ही मंत्री महोदयांना अमुकच एका विषयावर बोला असे डिक्टेट कसे काय करता. हे खपवून घेतले जाणार नाही. त्यावर मी दरेकरांना म्हणालो, दरेकरजी, मंत्री महोदयांमुळे समाज नाही तर समाजामुळे मंत्री आहेत. तुमच्यामुळे आम्ही नाहीत तर आमच्यामुळे तुम्ही आहात. त्यावर तेही शांत बसले आणि मीही शांत बसलो. परंतु काही समन्वयक लगेच उठून समर्थन करण्या ऐवजी विरोधात बोलून गेले. मराठ्यांची ओबीसी आरक्षण मागणी कदाचित त्यांना महत्वाची वाटत नसावी. काही काळ बैठक सुरुळीत चालली.

पुन्हा काही वेळानंतर एक समन्वयक उठले आणि त्यांनी सारथीमध्ये अमुक एका समाजाला सारथीमध्ये स्थान नको अशी भूमिका मांडली. त्यावर राजेंद्र कोंढरे यांनी भूमिका मांडली.

समोरून कोल्हापूरचे दिलीप पाटील उठून कुणबी समाज सारथीमध्ये नको असे बोलण्यास सुरुवात करत होते. तेवढ्यात त्यांच्या विरोधात काँधरे यांचे समर्थक आक्रमक झाले. मी समोर जाऊन त्यांना विनंती केली की, दिलीप पाटील यांना जे बोलायचे ते बोलू द्या. जर ओबीसी आरक्षण बाबत त्यांनी चुकीचा मुद्दा मांडला तर मी देखील तुमच्या सोबत उभा राहतो. आपण मिळून त्यांचा मुद्दा खोडून काढू. पण आधी दिलीप पाटील यांना बोलू द्या. परंतु इकडचे लोक काही केल्या शांत बसत नव्हते. त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर चळवळ फोडण्याचे आरोप ठेऊन त्यांचा राजीनामा मागायला सुरुवात केली. मला जाणीव झाली की हा प्रकार वेगळ्याच दिशेने घेऊन चालला गेला आहे. मग मी जाऊन जागेवर बसलो.

कदाचित चंद्रकांत दादा दुखवले गेले असावेत. अर्ध्यावर बैठक सोडून ते निघाले तेंव्हा मराठ्यांनी गोंधळ केला. गोंधळाची सुरुवात दादांच्या जवळच्या व्यक्तींनीच केली. असा समज काहींचा झाला. काहीनी राजीनाम्याची मागणी लावून धरली, त्यामुळे दादा डाव अर्ध्यावर सोडून निघाले.

आरक्षणावर चर्चेसाठी आजची बैठक बोलावली होती. वनवास यात्रेच्या तयाऱ्या सोडून आम्ही मुंबई पर्यंत आलो होतो. अन् इथे काही समन्वयक पुढे करून समाजात फूट पाडण्याचा डाव दिसला.

मग मात्र चिडून जाऊन टेबलवर चढलो. मराठ्यांना 50% च्या आत ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा दिल्या. मंत्री दादा भुसे यांनी मला टेबलवरून खाली ओढण्याचा प्रयत्न केला. मी फिरून त्यांच्या तोंडावर जोरात घोषणा दिल्या. मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. हे ठासून बोललो. त्यानंतरही तिथे काहीकाळ दादा भुसे थांबले. त्यांना मी मराठ्यांची कायदेशीर भूमिका समजावून सांगितली. आमच्या सोबत आणखीही अभ्यासक बोलत उभे होते.

गेटवर आल्या नंतर कळले की काही समाज बांधवांना प्रवेश दिला गेला नव्हता. त्यांनी त्यांची खदखद बोलून दाखवली. तिथे पुन्हा सर्व राजकारण्यांच्या विरोधात आम्ही घोषणा दिल्या.

मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालेच पाहिजे. मराठ्यांना 50% च्या आत आरक्षण मिळालेच पाहिजे.

योगेश केदार
9823620666

Back to top button
error: Content is protected !!