छत्रपती संभाजीनगर

१० टन मकराना मार्बलने साकारला साडेबावीस फूट उंच मानस्तंभ जिनबिंब!; संभाजीनगरच्या सौंदर्यात भर…

संभाजीनगर, दि. १५ ः साडेबावीस फूट उंच, १० टन मकराना मार्बलचा वापर करून साकारलेला जिनबिंब मानस्तंभ शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकणारा ठरत आहे. हडकोतील सुदर्शननगरातील कल्पतरू शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिरासमोर तो उभारण्यात आला असून, त्याची विधिवत स्थापना उद्या, १६ डिसेंबरला करण्यात येणार आहे. यावेळी मंदिरात भगवंतांच्या ८ मूर्तींची स्थापना होणार आहे. मूर्तीही मकराना येथून आणल्या आहेत.

बालयोगी आचार्य सौभाग्यसागरजी महाराज व ससंघाच्या मार्गदर्शनाखाली काल सकाळी धर्मध्वजारोहण होऊन तीन दिवसीय पंचकल्याणक महोत्‍सवाची सुरुवात झाली. मंदिराच्या बाजूला धर्मव्यासपीठ उभारले आहे. देवाच्या ८ मूर्तींना वाजतगाजत मंडपात आणण्यात आले. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.

शेकडो भाविक महोत्‍सव अनुभवत आहेत. महोत्‍सवाच्या यशस्वीतेसाठी समितीचे अध्यक्ष पूनमचंद अग्रवाल, कार्याध्यक्ष विक्रमचंद साहुजी, कोषाध्यक्ष सुरेश साहुजी, शांतीनाथ अग्रवाल दिगंबर जैन मंदिर कार्यकारिणी अध्यक्ष रमण साहुजी, सुरजमल साहुजी, जयेश साहुजी, सुधीर साहुजी, रत्नशेखर साहुजी, संजय साहुजी आदी पुढाकार घेत आहेत.

महोत्‍सवात आचार्य सौभाग्यसागरजी महाराजांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की मूल हाताबाहेर गेल्यावर काय फायदा… आपली परंपरा, संस्कृतीचे संस्कार मुलांवर लहानपणापासूनच होणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. महोत्‍सवात आज, १५ डिसेंबरला भगवंतांचा जन्मोत्सव साजरा होत असून, सकाळी शोभायात्रा निघाली होती.

Back to top button
error: Content is protected !!