उत्कंठा वाढवणारा “आयसा’चा इंजिनिअरिंग एक्स्पो उद्यापासून!; कोट्यवधींच्या उलाढालीची शक्यता!!

संभाजीनगर, दि. १५ ः इंडस्ट्रियल सप्लायर्स असोसिएशनतर्फे (आयसा) रेल्वेस्टेशनजवळील अयोध्यानगरी मैदानात १६ ते १९ डिसेंबरदरम्यान आयसा इंजिनिअरिंग एक्स्पो भरवला जात आहे. त्याचे उद्घाटन सीआयआयचे महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम नारायणन यांच्या हस्ते व सहकारमंत्री अतुल सावे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
केंद्रीय मंत्री नारायण राणे, उद्योगमंत्री उदय सामंत हेही प्रदर्शनाला भेट देणार असल्याचे आयोजकांनी सांगितले. पत्रकार परिषदेत आयसाचे अध्यक्ष सूरज डुमणे म्हणाले, की प्रदर्शनासाठी भव्य डोम उभारले आहे. यातील एक डोम केवळ औद्योगिक सुरक्षेच्या साधनांची निर्मिती करणाऱ्या कंपन्या आणि त्यांच्या पुरवठादारांसाठी आहे.
जगभरातील उद्योगांना सुट्या भागांचा पुरवठा करणाऱ्या आयसातर्फे दर दोन वर्षांनी असे प्रदर्शन भरवले जाते. यात मशीन टूल्स, ऑटोमेशन ॲन्ड रोबोटिक्स, प्लास्टिक अँड पॉलिमर, पॉवर ॲन्ड ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, औद्योगिक सुरक्षा, टेस्ट अँड मेजरिंग इन्स्ट्रुमेंट्स आदी विषयांवरील सुमारे १५० स्टॉल्स असतील.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
प्रदर्शनात रोज दोन कार्यशाळा होणार आहेत. शहर आणि परिसरातील सर्व अभियांत्रिकी महाविद्यालये, तंत्रशिक्षण संस्था, आयटीआय, एमबीए विद्यार्थी, शिक्षक, प्रशिक्षक, उद्योग क्षेत्राबद्दल उत्सुकता असलेले २० हजार नागरिक भेट देतील, असा विश्वासही डुमणे यांनी व्यक्त केला. या वेळी संघटनेचे सचिव दत्तात्रय बेदडे, कोषाध्यक्ष सागर मालानी, मिलिंद उमदीकर, सतीश मंडोळे उपस्थित होते.