ट्रॅप लागला होता, सावज अडकणारच होते… झाले वेगळेच!; पण हार मानेल ती ACB का?, नक्की काय घडलं संभाजीनगरात जाणून घेऊ…

संभाजीनगर, दि. १५ ः लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अर्थात एसीबीने लाचखोर भूमापक कर्मचाऱ्यांसाठी सापळा रचला. त्याने जमीन मोजणी नकाशात दुरुस्तीसाठी ४५ हजार रुपये मागितले होते. त्यातील ३५ हजार आधी घेतले होते, उरलेले १० हजार घेताना जाळ्यात अडकणार होता. पण त्याला संशय आला. त्यामुळे पैसेच घेतले नाहीत… मात्र तरीही एसीबीने त्याला ताब्यात घेतले.
सिटी चौक पोलीस ठाण्यात या लाचखोर कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याचे नाव राहुल अंभुरे (३३, रा. मिलकॉर्नर) असे आहे. तो भूमिअभिलेख कार्यालयात भूमापक आहे. वडगाव कोल्हाटी येथील शेतकऱ्याकडे त्याने लाच मागितली होती. या शेतकऱ्याची गाव शिवारात शेतजमीन असून, मोजणी नकाशा दुरुस्ती करून देण्यासाठी अंभुरेने ५० हजार रुपये मागितले होते.
तडजोडीअंती हा व्यवहार ४५ हजार रुपयांत ठरला होता. शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने एसीबीकडे तक्रार दिली होती. पडताळणीत अंभुरेने ३५ हजार रुपये स्वीकारल्याचे व उर्वरित १० हजार रुपये मागत असल्याचे दिसून आले. हे १० हजार रुपये स्वीकारताना त्याला पकडायचेच, असा चंग एसीबीने बांधला. पण अंभुरेला संशय आला आणि तो पैसे स्वीकारण्यास टाळाटाळ करू लागला.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
अखेर कालही सापळा लावण्यात आला. सावज फसलेच असते, पण त्याला पुन्हा हुशारी केली. मात्र तरीही त्याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला. ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप आटोळे, अप्पर अधीक्षक विशाल खांबे, उपअधीक्षक दिलीप साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक शुभांगी सूर्यवंशी, राजेंद्र सिनकर, साईनाथ तोडकर, प्रकाश घुगरे, नागरगोरे व बागूल यांनी केली.