महाराष्ट्र
Trending

विधान परिषदेच्या पदवीधरसह शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणीचा कार्यक्रम जाहीर !

- उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस समेळ

मुंबई, दि. २७ : विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण विभागाच्या पदवीधर मतदारसंघासाठी तसेच शिक्षक मतदारसंघांसाठी मतदार नोंदणी ३० सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, या मतदार नोंदणीसाठी १ नोव्हेंबर २०२३ ही अर्हता दिनांक असेल, अशी माहिती मुंबई उपनगरचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी तेजस किरण समेळ यांनी दिली.

एक नोव्हेंबर 2023 या अर्हता दिनांक वर आधारित पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार नोंदणी संदर्भात आज मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक झाली. त्यावेळी समेळ बोलत होते.

या मतदार नोंदणीसाठी पुनरीक्षण कार्यक्रमाचे टप्पे पुढीलप्रमाणे आहेत. शनिवार ३० सप्टेंबर २०२३ रोजी जाहीर सूचना प्रसिध्द केली जाईल, वृत्तपत्रातील सूचनेची प्रथम पुनर्प्रसिद्धी सोमवार १६ ऑक्टोबरला, द्वितीय पुनर्प्रसिद्धी बुधवारी २५ ऑक्टोबरला केली जाईल. अर्ज क्रमांक १८ आणि १९ द्वारे ६ नोव्हेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारल्या जातील. त्यानंतर सोमवार २० नोव्हेंबरला हस्तलिखिते तयार करून प्रारुप मतदार याद्यांची छपाई केली जाईल.

या प्रारुप मतदार याद्या २३ नोव्हेंबरला प्रसिद्ध होतील. त्यावर २३ नोव्हेंबर ते ९ डिसेंबर २०२३ पर्यंत दावे आणि हरकती स्वीकारले जातील. त्यानंतर २५ डिसेंबरपर्यंत दावे आणि हरकती निकाली काढून यादीची छपाई केली जाईल आणि ३० डिसेंबरला अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या मतदार याद्या तयार करण्याच्या अनुषंगाने लागणाऱ्या अर्जाचे अनुक्रमे नमुना क्रमांक 18 व नमुना क्रमांक 19 नमुन्यांच्या छपाईच्या आदेश मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य कार्यालय याकडून शासकीय मुद्रणालय, मुंबई येथे देण्यात आले असून त्यांच्याकडून ते प्राप्त करून घेऊन सर्व 26 विधानसभा मतदार नोंदणी अधिकारी यांना देण्यात येणार आहेत.

तसेच मतदार नोंदणी अधिकारी मतदार नोंदणी अधिनियम 1960 चे कलम 31 (३) अन्वये जाहीर सूचना प्रसिद्ध करतील. भारत निवडणूक आयोगाच्या दिनांक 5 सप्टेंबर 2016 रोजीच्या सूचनेनुसार संबंधित मतदार नोंदणी अधिकारी विहित रीतीने आणि नमुन्यात परिशिष्ट ‘ए’ आणि ‘बी’ मध्ये सार्वजनिक नोटीस जारी करतील आणि प्रकरण परत्वे परिशिष्ट अ किंवा ब नमुन्यात नोटीसीची पुन्हा प्रसिद्ध करतील. पात्र मतदार, राजकीय पक्षांनी या कार्यक्रमाला सहकार्य करावे, असेही समेळ म्हणाले. यावेळी इतर अधिकारी आणि विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!