महाराष्ट्र

भोकरदन तालुक्यातील आन्वा गावात १०० एकरवर १५ मेगावॅट वीज निर्मिती होणार ! १४ गावांतील ४ हजार कृषिपंप ग्राहकांना दिवसा वीजपुरवठा होणार !!

महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांची आन्वा येथील ३३ केव्ही उपकेंद्रास भेट  

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देण्यासाठी महावितरणतर्फे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत सौर प्रकल्प उभारण्यासाठी भोकरदन तालुक्यातील आन्वा येथील ३३ केव्ही उपकेंद्राची निवड करण्यात आलेली आहे. महावितरणचे संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे यांनी रविवारी (१५ ऑक्टोबर) या उपकेंद्रास भेट देऊन पाहणी केली.     

महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना-२.० अंतर्गत जालना जिल्ह्यातील इतर उपकेंद्रांबरोबरच आन्वा उपकेंद्राची निवड करण्यात आलेली आहे. त्यासाठी आन्वा ग्रामपंचायतीअंतर्गत शासनाने १०० एकर जागा उपलब्ध करून दिली आहे. या जागेवर जवळपास १५ मेगावॅट वीज निर्मिती होणार असून संबंधित सौर कृषी वाहिनी तयार झाल्यानंतर आन्वा उपकेंद्रांतर्गत जवळपास १४ गावांतील सुमारे ४ हजार कृषिपंप ग्राहकांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा होणार आहे.

या योजनेअंतर्गत प्रथम टप्प्यात जालना जिल्ह्यातील २१ उपकेंद्रांचा समावेश आहे. संचालक (संचालन) श्री.संजय ताकसांडे यांनी उपकेंद्राची पाहणी करून सौर प्रकल्पासाठी आवश्यक विविध प्रकारची देखभाल-दुरुस्तीची कामे त्वरित पूर्ण करण्यासह अनेक उपयुक्त सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी त्यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करून सर्व कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. संचालक (संचालन) यांनी आन्व्यासारख्या दुर्गम भागातील उपकेंद्रास भेट दिल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला आणि त्यांना अजून उत्स्फूर्तपणे काम करण्याची प्रेरणा मिळाली.

यावेळी संचालक (संचालन) श्री.ताकसांडे यांच्या हस्ते उपकेंद्रात वृक्षारोपणही करण्यात आले. यावेळी जालना मंडलाचे अधीक्षक अभियंता श्री.संजय सरग, जालना-१ विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.प्रशांत सोनार, भोकरदन उपविभागाचे उपकार्यकारी अभियंता श्री.प्रशांत नाखले, आन्वा शाखेचे सहायक अभियंता श्री.प्रदीप गव्हांडे, भोकरदन शाखेचे सहायक अभियंता श्री.प्रमोद दारकोंडे यांच्यासह आन्वा शाखेतील सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!