३ लाख २३ हजार कृषीपंपधारक शेतकरी ग्राहकांनी गेल्या पंधरा वर्षांपेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरले नाही !
अखंड वीजपुरवठ्यासाठी ग्राहकांनी नियमित वीजबिले भरणे गरजेचे, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांचे प्रतिपादन
संभाजीनगर लाईव्ह, दि.१५ फेब्रूवारी २०२३: महावितरणच्या उत्पन्नाच्या सुमारे ८० टक्के रक्कम वीज खरेदीवर खर्च होत असल्याने अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी वीजबिलांचे उत्पन्न हा एकमेव उपाय असून घरगुती, औद्योगिक, व्यावसायिक व कृषीग्राहक अशा सर्व ग्राहकांनी वीजबिले भरून सहकार्य करावे, असे आवाहन महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी केले.
ते म्हणाले की, महावितरणसुद्धा एक ग्राहक असून इतरांकडून वीज खरेदी करून ग्राहकांना पुरवते. महावितरण स्वतः वीजनिर्मिती करत नाही किंवा कंपनीला कोणाकडून मोफत वीज मिळत नाही. महावितरणच्या एकूण उत्पन्नापैकी सुमारे ८० टक्के रक्कम ही वीजखरेदीवर खर्च होते. २०२१ -२२ या गेल्या आर्थिक वर्षात महावितरणने वीजखरेदीपोटी ६९,४७८ कोटी रुपये खर्च केले होते.
महावितरणला ग्राहकांकडून मिळणारे वीजबिलाचे पैसे हाच उत्पन्नाचा एकमेव मार्ग आहे. बिलाच्या उत्पन्नातून कंपनी वीजखरेदीचे पैसे देते व त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे वेतन आणि वीज प्रकल्पांचा खर्च भागवला जातो. वीजबिलांतून उत्पन्न मिळणे म्हणजे महावितरणचा श्वास चालू राहण्यासारखे आहे. अखंड वीजपुरवठा चालू ठेवण्यासाठी महावितरणकडे ग्राहकांनी वीजबिले भरणे हा एकमेव पर्याय आहे. वीज ग्राहकांची बिलांची थकबाकी ७३,३६१ कोटींवर गेल्याने ग्राहकांनी वीजबिले भरणे अधिक गरजेचे झाले आहे.
महावितरणकडून शेतकऱ्यांना खूप मोठ्या सवलतीच्या दरात वीजपुरवठा होतो. तरीही राज्यातील १५ लाख १९ हजार कृषीग्राहकांनी गेली पाच वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक काळ एकही बिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे २१,०६७ कोटी रुपये थकबाकी आहे. त्यापैकी ३ लाख २३ हजार असे कृषीपंपधारक ग्राहक आहेत ज्यांनी गेली पंधरा वर्षापेक्षा अधिक काळ एकही वीजबिल भरलेले नाही आणि त्यांच्याकडे ५,२१६ कोटी रुपयांची थकबाकी आहे.
विजेमुळे शेतीचे सिंचन होते, शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते, त्यातून त्यांना चांगले जीवन जगता येते, तरीही त्यांच्या एकूण खर्चाच्या तुलनेत कमी असलेले वीजबिल भरण्यास काही शेतकऱ्यांची अनास्था दिसते.
वीज ही अत्यावश्यक सेवा आहे. पाणी पुरवठा, रुग्णालयांचे काम, इमारतीतील लिफ्ट, वाहतूक नियंत्रण, कार्यालयांचे कामकाज, बँकिंग अशा अनेक सेवा या वीजपुरवठ्यावर अवलंबून आहेत. त्यासाठी अखंड वीजपुरवठा करायचा तर महावितरणला वीज खरेदी करण्यासाठी पैसे उभे करणे आवश्यक आहे. महावितरणकडे बिलांच्या माध्यमातून पैसे आले तरच कंपनीला वीज खरेदी करणे आणि ती ग्राहकांना पुरविणे शक्य आहे, याची नोंद घ्यावी आणि ग्राहकांनी वीजबिले भरण्यास प्राधान्य द्यावे आणि वेळेत वीजबिले भरावीत, असेही आवाहन त्यांनी केले.
ते म्हणाले की, महावितरण ग्राहकांना केवळ वापरलेल्या विजेचे पैसे बिलाच्या स्वरुपात आकारते. जी सेवा वापरली आहे त्याचे बिल देण्यास कोणी विरोध करेल अशी शक्यता नाही. काही ग्राहक मोबाईल बिल, डीटीएचचे बिल, केबलचे बिल अशी बिले नियमित भरत असताना त्यांच्यासाठी अत्यावश्यक सुविधा असलेल्या विजेचे बिल भरण्यास टाळाटाळ करतात हे आश्चर्यकारक आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe