कन्नड तालुक्यातील कोळवाडी महाविद्यालयाला मोठा दणका, चौकशीचे आदेश ! दोन लाखांचा दंड भरेपर्यंत निकाल घोषित होणार नाही !!
छत्रपती संभाजीनगर, दि.६ : पदवी परीक्षेचे केंद्र परस्पर बदलल्या प्रकरणी कोळवाडीच्या महाविद्यालयास दोन लाख रुपयांचा दंड सात दिवसात भरावा लागणार आहे. तर सर्वच प्रकारच्या सुविधांचा अभाव व केवळ कागदावरच अस्तित्वात असलेल्या या महाविद्यालयाची शैक्षणिक विभागाकडून चौकशी करण्याचे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीए, बीकॉम, व बी.एस्सी यासह पदवी अभ्यासक्रमाच्या परीक्षा सध्या सुरू आहेत. या परीक्षेत शुक्रवारी (दि.३१) कन्नड तालुक्यातील कोळवाडी येथील महाविद्यालयाने परस्पर केंद्र बदलल्याचा प्रकार घडला होता. भरारी पथकाच्या निदर्शनास सदर बाब आल्यानंतर त्यांनी त्या संदर्भात अहवाल परीक्षा विभागाला सादर केला.
स्व. गोविंदराव पाटील जीवरख पाटील वरिष्ठ महाविद्यालय (कोळवाडी,ता -कन्नड) येथील केंद्रावरील विद्यार्थी औराळा येथील राधा गोविंद शिक्षण प्रसार मंडळाच्या शाळेतील केंद्रावर पेपर देत होते. या घटनेची गंभीर दखल घेऊन कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी सदर परीक्षा केंद्र रद्द करण्याचा निर्णय रविवारी घेतला सोमवारपासून या विद्यार्थ्यांच्या परीक्षा शिवाजी कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कन्नड येथे होत आहेत.
कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या आदेशाने या महाविद्यालयाच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्यात आली. विज्ञान व तंत्रज्ञान शाखेचे अधिष्ठाता डॉ.भालचंद्र वायकर, अधिष्ठाता डॉ.प्रशांत अमृतकर व डॉ.दीपक पाचपट्टे यांचा समितीत समावेश होता.
समितीचा अहवाल
या महाविद्यालयाच्या चौकशीसाठी डॉ.भालचंद्र वायकर यांच्या समितीने कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांना बुधवारी (दि.पाच) अहवाल सादर केला. या चौकशीत संबंधित महाविद्यालय परीक्षा केंद्र तसेच सर्व प्रकारच्या पायाभूत व मनुष्यबळाच्या सुविधा बाबतीत दोषी असल्याचे समितीने अहवाल म्हटले आहे. राधा गोविंद शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाचे अस्तित्व केवळ कागदावरच असल्याचेही समितीने म्हटले आहे.
परीक्षा मंडळाच्यावतीने या महाविद्यालयास दोन लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला असून सात दिवसांच्या आत दंड भरावा लागणार आहे. अन्यथा १० टक्के दराने व्याज लावण्यात येईल. तसेच दंड भरेपर्यंत निकाल घोषित होणार नाही तसेच या महाविद्यालयाची कोणतीही परीक्षा ही घेण्यात येणार नाही, असे परीक्षा व मुल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी सांगितले.
दोन महाविद्यालयांची चौकशी
शैक्षणिक, प्रशासकीय व वित्त व्यवस्था तसेच पायाभूत सुविधांचा अभास असल्यामुळे दोन महाविद्यालयांची चौकशी करण्याचे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत. यानूसार स्व.गोिंवदराव पाटील जिवरख महाविद्यालय कोळवाडी, ता.कन्नड व डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम महाविद्यालय देवळाई या महाविद्यालयांची चौकशी करण्यात येणार आहे. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (१४) (क) अन्वये परिच्छेद ३ अन्वये ही तपासणी होणार आहे. या दोन्ही महाविद्यालयांना ६ एप्रिल रोजी शैक्षणिक विभागकडून नोटीस जारी करण्यात आली असून १० एप्रिलार्यंत लेखी खुलासा मागविण्यात आला आहे, अशी माहिती प्रकुलगुरु डॉ.श्याम शिरसाठ यांनी दिली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe