एकाच दिवशी ४० अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले, हिमायतबाग ते उद्धवराव पाटील चौक १०० फुटी रस्ता मोकळा ! गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच सुरुवातीला दमबाजी करणाऱ्या भूमाफियांची नंतर पळता भूई थोडी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – मनपा अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज एकूण ४० अतिक्रमणधारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. ही या सत्रातील सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. एन १२ परिसरातील उद्धव पाटील चौक ते मौलाना आझाद कॉलेज लगत सर्व शंभर फुटी रस्त्यावर बाधित एकूण ४० अतिक्रमण हटवले. सुरुवातीला काही जणांनी सरकारी कामात अडथळा निर्माण केला. मात्र, गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच सुरुवातीला दमबाजी करणाऱ्या भूमाफियांची नंतर पळता भूई थोडी झाली.
महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागा मार्फत उच्च न्यायालयाचे आदेशानुसार आज रोजा बाग चौक, उद्धवराव पाटील चौक, हिमायत बाग चौक एन १२ या ठिकाणी शंभर फुटीरस्ता बाधित आणि खुल्या जागेत मागील पंचवीस वर्षापासून केलेले अतिक्रमणे आज जमीनदोस्त करण्यात आले. उच्च न्यायालयाचे आदेशानुसार ही कारवाई दि.०२ मार्चपासून सातत्याने सुरू आहे.
याच अनुषंगाने आज एन १२ परिसरातील उद्धव पाटील चौक ते मौलाना आझाद कॉलेज लगत सर्व शंभर फुटी रस्त्यावर बाधित एकूण ४० अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. या ४० अतिक्रमण धारकांमध्ये २५ अतिक्रमण धारकांनी या ठिकाणी सर्रास खुलेआम १५ बाय १५ व २५ बाय १५ या आकाराचे पक्के बांधकाम करून सर्व प्रकारचे बाजारपेठ थाटले होते आणि विशेष म्हणजे काही भूमाफीया आणि काही टपरी भूमाफिया हे भाडे वसूल करत होते.
या चौकात अनेक वेळा वाहतुक खोळंबून भांडण झालेले आहे. या परिसरात सर्व व्हीआयपी बंगले आणि व्हीआयपी कॉलनी असल्याने या भागातील नागरिक या अतिक्रमण धारकांना वैतागले होते. अनेकांनी स्वतःहून अतिक्रमण काढणे सुरुवात केली परंतु काही टपरी माफिया कोण आता है हम देखते है असे सांगत विरोध करत होते. अतिरिक्त आयुक्त रवींद्र निकम आणि पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे यांनी प्रथम नम्रतेने घेतले व नंतर सरळ त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करणे आणि नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश दिल्यानंतर ही मंडळी पळून गेली आणि मग जेसीबीच्या साह्याने पूर्ण कारवाई करण्यात आली.
या अतिक्रमण धारकांनी सुरुवातीला नम्र विनंती केली व तास दोन तास मागितले नंतर आजी-माजी नगरसेवकांचा दबाव टाकण्यास सुरुवात केली परंतु सिडकोचे कर्मचारी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांनी या दबावाला बळी न पडता पूर्ण अतिक्रमण रस्ता मोकळा केला आहे. उद्धव पाटील चौक ते चाऊस कॉलनी, उद्धवराव पाटील चौक ते रोजा बाग , उद्धवराव पाटील ते हिमायत बाग कडे जाणारा रस्ता आता 100 फूट पूर्ण मोकळा झाला आहे. दोन-तीन अतिक्रमणधारक मोक्यावर नसल्याने उद्या सकाळी त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.
अतिक्रमण कारवाई वेळी या भागात अनेक नागरिकांनी गर्दी केली होती आणि अतिक्रमण निघाल्यामुळे व रस्ता मोठा झाल्यामुळे महापालिकाचे अभिनंदन केले. या अतिक्रमणा मुळे या ठिकाणी टवाळखोर आणि पान टपरीवर काही तरुण उभे राहून येणाऱ्या जाणाऱ्या महिलांना सुद्धा त्रास देत होते अशा तक्रारी सुद्धा पोलिसाकडे प्राप्त झाल्या आहेत. याबाबत अतिक्रमण काढल्याने आज सर्वत्र अभिनंदन होत आहे आणि आज जवळपास ४० लोकांवर कारवाई करण्यात आली.
सदर कारवाई प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त तथा अतिक्रमण विभाग प्रमुख रवींद्र निकम यांचे मार्गदर्शनाखाली पद निर्देशित अधिकारी सविता सोनवणे, वसंत भोये, पोलीस निरीक्षक फईम हाश्मी ,बेगमपुरा पोलीस स्टेशनचे कर्मचारी दिवटे ,उगले ,पठाण अतिक्रमण निरीक्षक सय्यद जमशेद ,रामेश्वर सुरासे ,सिडकोचे अभियंता मीलन खिल्लारे व त्यांचे पथकाने पार पाडली.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe