राजकारण
Trending

भाजपाच्या मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात सामिल झालेले अजितदादा १०० दिवसांतच साहेबांना विसरले ! स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून महाराष्ट्राशी केलेल्या पत्रसंवादात शरद पवारांचा नामोल्लेख टाळला !!

मुंबई, दि. १० – राजकारण आणि समाजकारणात स्पष्ट वक्ता म्हणून अजित पवार यांना ओळखले जाते. काका तथा ज्येष्ठ नेते शरद पवारांच्या सावलीखाली त्यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय भूकंप होवून शिवसेनेत उभी फूट पडली अन् उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीचे सरकार कोसळून एकनाथ शिंदे गट आणि भाजपाची सत्ता महाराष्ट्रात आली. शिवसेनेतील उभ्या फुटीवर अजित पवार यांनी यापूव्री प्रसारमाध्यमांना समोरे जात आपली स्पष्ट प्रतिक्रिया दिली. मात्र, सकाळच्या शपथविधीचा अनुभव पाहता अजित पवार गटाने शिंदे गटाच्या पावलावर पाऊल टाकत जोरदार झटका देत भाजपा सरकारमध्ये सामिल होवून राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना जोरदार झटका दिला. अजितदादा गट आता सत्तेत सामिल होवून १०० दिवस पूर्ण झाले. यानिमित्त दादांनी महाराष्ट्रातील जनतेसोबत पत्रसंवाद साधून आपल्या भावना मोकळ्या केल्या. या पत्रसंवादात यशवंतराव चव्हाण यांना स्थान दिले असून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचा नामोल्लेख मात्र टाळला आहे. अजितदादांनी स्वतला राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घेतले आहे. चला तर मग अजितदादांनी काय लिहलंय या पत्रात वाचूया त्यांच्याच शब्दात…

महाराष्ट्रातील माझ्या बंधूंनो आणि भगिनिंनो,

आज १० ऑक्टोबर २०२३ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला महायुतीच्या सरकारमध्ये सामील होऊन १०० दिवस पूर्ण होत आहेत. त्यानिमित्ताने मी आज आपणा सर्वांशी या पत्राद्वारे संवाद साधत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नेहमीच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श, फुले – शाहू – आंबेडकरांचे विचार आणि वंदनीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या लोककल्याणाचे धोरण यांचा वारसा जपला आहे. माझ्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षदेखील पुढील काळात हीच परंपरा कायम जपणार आहे, हे माझे तुम्हा सर्वांना वचन आहे.

महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात यापूर्वीही अनेक मोठ्या नेत्यांनी वेगळी राजकीय भूमिका असणारे निर्णय घेतले आहेत. अशा प्रकारचे निर्णय हे त्या त्या वेळच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीप्रमाणे प्रत्येक राजकीय नेत्याला घ्यावे लागतात. अशीच एक भूमिका घेऊन माझ्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष २ जुलै २०२३ रोजी महायुती सरकारमध्ये सामील झाला.

वंदनीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी समाजकारण करताना मांडलेलं ‘बहुजनांना सत्तेतून पाठबळ आणि लोकांना उत्तरदायित्व’ हे सूत्र माझी प्रेरणा आहे, हे मी अनेकदा वेगवेगळ्या मंचांवर मांडले आहे. याच भूमिकेतून महापुरुषांचा आदर्श घेत लोककल्याणासाठी हाती घेतलेला ‘वसा विकासाचा आणि विचार बहुजनांचा’ हे आमच्या राष्ट्रवादी पक्षाचे सत्तेत असण्याचे सूत्र राहणार आहे, यांची मी या पत्राद्वारे आपणास ग्वाही देऊ इच्छितो.

प्रत्येक काळ हा वेगळा असतो आणि प्रत्येक काळाची आव्हानेही वेगळी असतात, त्या त्या काळानुसार त्या त्या आव्हानांचा सामना करत लोकांच्या कल्याणासाठी, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी, लोकप्रतिनिधींना समाजात काम करावे लागते. आपण लोकांचे देणे लागतो आणि त्यासाठीच लोकांनी आपल्यावर विश्वास टाकून आपल्याला त्यांचा प्रतिनिधी म्हणून निवडून दिले आहे, या भूमिकेवर माझा आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांचा विश्वास आहे.

येत्या काळात राष्ट्रवादी वर्ष काँग्रेस पक्ष महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या युवकांच्या, महिलांच्या तसेच विविध समाजघटकांच्या हितांचे रक्षण करण्याच्या भूमिकेतून राज्य सरकारमध्ये कार्यरत असेल याची प्रचिती मी आणि माझ्या सर्व सहकाऱ्यांच्या कामातून तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही, हा माझा तुम्हा सर्वांना शब्द आहे.

राजकारणाच्या पलीकडे भूक, बेरोजगारी, महागाई या प्रश्नावर राज्य सरकारला काम करावे लागते. त्यासोबतच रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अमलबजावणी हे राज्य सरकारच उद्दिष्ट असते. येत्या काळात या सर्व विषयावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तसेच राज्य सरकारमधील सत्तेच्या माध्यमातून आम्ही हे काम अधिक जोमाने करणार आहोत.

टीका ही राजकीय नेत्याच्या जीवनाचा भाग आहे, असे मी मानतो आणि सकारात्मक टीकेची मी नेहमीच दखल घेतो. मात्र केवळ राजकारणासाठी राजकीय टीका हा माझा प्रांत नाही. मी सकारात्मक, विकासात्मक राजकारणावर विश्वास असणारा राजकीय कार्यकर्ता आहे. हाती घेतलेले कुठलेही काम मार्गी लावणे, त्या कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड आहे, यावर माझा विश्वास आहे.

नव्या सरकारमध्ये सामील होत असताना मी वर मांडलेली भूमिका आम्ही पुढे घेऊन जाणार आहोत. आम्ही याच मार्गावर गेले शंभर दिवस वाटचाल केली आहे आणि यापुढेही करीत राहू हा विश्वास मी आज या पत्राच्या माध्यमातून तुम्हा सर्वांना देऊ इच्छितो, तुम्हा सर्वांचे आशीर्वाद आणि साथ अशीच सोबत राहू दे, ही आशा व्यक्त करतो. तूर्तास इतकेच. यापुढेही तुमच्याशी हा पत्रसंवाद कायम राहील.

जय हिंद, जय महाराष्ट्र

आपला,

(अजित पवार)

राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष

Back to top button
error: Content is protected !!