राजकारण
Trending

अजित पवार माझ्या संपर्कात, ‘नॉट रिचेबल’ वरील प्रश्नावर शरद पवारांनी दिलं हे उत्तर !

जेपीसीत सत्ताधारी जास्त असतील तर त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी आहे;जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रमाणशीर ठरेल - शरद पवार

मुंबई दि. ८ एप्रिल – २१ लोकांची जेपीसी असेल तर त्यात १५ लोक सत्ताधारी भाजपचे असतील आणि फक्त ६ ते ७ जण विरोधी पक्षातील असतील तर विरोधी पक्षाची संख्या कमी आणि सत्ताधारी अधिक याचा अर्थ ज्याची चौकशी नीट करावी अशी अपेक्षा आहे त्या समितीविषयी शंका व्यक्त करायला संधी आहे अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी आपली भूमिका पत्रकार परिषदेत मांडली. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी पत्रकांरानी अजित पवार ‘नॉट रिचेबल’ वर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिले.

आज सकाळी सिल्व्हर ओक या निवासस्थानी शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन जेपीसी का नको याबाबत आपले मत व्यक्त केले. जेपीसीऐवजी सुप्रीम कोर्टाने एक कमिटी नियुक्त करण्याचा निर्णय घेतला त्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे निवृत्त न्यायाधीश आणि इतर लोक आहेत. सुप्रीम कोर्टाने आणखी एक गोष्ट केली, किती दिवसात अहवाल द्यायचा (टाईम पिरियड) याबाबतची सूचना केली आहे. जेपीसीला सरसकट विरोध करत नाही. यापूर्वी काही जेपीसी होत्या त्या जेपीसीचा चेअरमन होतो असे शरद पवार यांनी सांगतानाच जेपीसी बहुमताच्या संख्येवर त्याचा दुरुपयोग होणार असल्याने जेपीसीपेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी अधिक उपयुक्त आणि प्रमाणशीर ठरेल अशी स्पष्ट भूमिका शरद पवार यांनी मांडली.

मला हिंडेनबर्ग कोण आहे हे माहीत नाही. त्यांचा रिपोर्ट वर्तमानपत्रात वाचला. एक कंपनी परदेशातील ती या देशातील परिस्थितीवर भूमिका घेते. त्यावर किती लक्ष केंद्रित करावे हे लक्षात घेतले पाहिजे. त्यापेक्षा सुप्रीम कोर्टाची कमिटी ही अत्यंत प्रमाणित ठरेल असे स्पष्ट करतानाच कुठची बाहेरची संघटना आम्हाला सांगणार यापेक्षा या देशातील सुप्रीम कोर्टाने आम्हाला सांगितले तर ते लोकांच्या अधिक विश्वासाला पात्र ठरेल असेही शरद पवार म्हणाले.

विरोधी पक्षातील लोकांचे जे मत आहे त्यांचा सन्मान करतो. त्यांना माझे मतही सांगेन पण चर्चा होईल त्यावेळी यावर बोलेन असे स्पष्ट करतानाच १८ -१९ विरोधी पक्ष एकत्र आले ही गोष्ट खरी असली तरी या पक्षातील लोकांना त्या जेपीसीमध्ये संधी मिळणार नाहीय. कारण ज्यांची संख्या एक – दोन आहे त्यांना संधी मिळणार नाही. ठराविकांनाच संधी मिळेल हेही शरद पवार यांनी सांगितले.

खरे सांगायचे तर २० हजार कोटी वगैरे याची आकडेवारी माझ्याकडे नाही. याबाबतची माहिती घेऊन बोलेन. एखाद्या गोष्टीवर बोलायचे तर त्याची माहिती माझ्याकडे असणे आवश्यक आहे. ती माहिती माझ्याकडे नाही हेही शरद पवार यांनी स्पष्ट केले.

ज्यावेळी अनेक पक्ष एकत्र येत असतात त्यावेळी काही प्रश्नांवर मतभिन्नता असू शकते. उदाहरणार्थ खैरे यांच्या घरी बैठक घेतली त्यावेळी सावरकरांचा विषय निघाला. त्यावेळी त्या बैठकीत सावरकरांबद्दल भूमिका मांडली. चर्चा झाली परंतु त्यानंतर विषय संपला. त्यामुळे चर्चा होत असते, मतभिन्नताही असू शकते, मते मांडण्याची संधी असते असेही शरद पवार म्हणाले.

मला तर माहित नाही तुम्ही कशाच्या आधारावर बोलताय ते. सुप्रिया सुळे इथे समोर नाहीत मात्र त्या घरात आहेत. याचा अर्थ त्या ‘नॉट रिचेबल’ होऊ शकत नाही. अजित पवार माझ्या संपर्कात आहेत असे स्पष्टीकरण शरद पवार यांनी पत्रकांरानी अजित पवार ‘नॉट रिचेबल’ वर विचारलेल्या प्रश्नावर बोलताना दिले.

सुप्रीम कोर्टाच्या त्या निर्णयाची आम्ही वाट बघत आहोत. वेगळा निर्णय आला तर चांगली गोष्ट आहे असेही शरद पवार यांनी पत्रकांरानी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आपले मत व्यक्त केले.

Back to top button
error: Content is protected !!