राजकारण
Trending

या ‘घडी’ची सर्वात मोठी बातमी: जयंत पाटील, जितेंद्र आव्हाडांवर अपात्रतेच्या कारवाईचे पत्र, पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे अजित पवारांचा दावा ! आम्हाला शरद पवारांचे निर्णय लागू नाहीत: प्रफुल्ल पटेल !!

मुंबई, दि. ३ – उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये अंतर्गत बंडळी उफाळून आली असून दोन्ही गट एकमेकांवर कारवाईची भाषा करत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, या आशयाचे पत्र विधानसभा अध्यक्षांना दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विधीमंडळ नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोणी काहीही म्हणत असलं तरी आमच्याकडे बहुमत आहे त्यामुळे पक्ष आणि चिन्ह आमच्याकडे असल्याचा दावाही अजित पवार यांनी यावेळी केला.

कालच्या सत्तानाट्यानंतर आता राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये वेगवान घडामोडी घडत आहे. या पार्श्वभूमीवर आज सायंकाळच्या सुमारास राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, अजित पवार, छगन भुजबळ आदी नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नियुक्त्या जाहीर केल्या. प्रफुल्ल पटेल यांनी विधीमंडळ नेतेपदी अजित पवार, प्रदेशाध्यक्षपदी सुनील तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षपदी रुपाली चाकणकर, प्रवक्तेपदी अमोल मिटकरी तर अनिल पाटील प्रतोदपदी कायम राहील अशी घोषणा प्रफुल्ल पटेल यांनी केली. जयंत पाटील यांना पदमुक्त केल्याची घोषणाही यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी केली.

राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच- अजित पवार
पत्रकार परिषदेला सुरुवातीलाच पत्रकारांनी प्रश्न विचारला की, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण आहे, यावर अजित पवार यांनी पत्रकारांनी उलट प्रश्न विचारला की राष्ट्रीय अध्यक्ष आपण शरदराव पवार यांना विसरलात का ? राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारच राहतील याचा पुनुरुच्चार अजित पवार यांनी यावेळी केला. याशिवाय प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांनीही शरद पवार आमचे गुरु आहेत. आज गुरु पोर्णिमा असून आम्ही त्यांना पक्षासाठी उपमुख्यमंत्री म्हणून गुरुदक्षिणा दिली आहे, असे तिघेही म्हणाले.

रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निर्णय सांगितले जातायत- अजित पवार म्हणाले की, नऊ जणांना नोटीस देणं कायदेशीर नाही. आम्ही जे करतोय ते कायदेशीर करतोय. पक्षाच्या हिताच करतोय. रात्री १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन निर्णय सांगितले जात आहेत. या निर्णयाला काहीही अर्थ नाही, असा टोलाही अजितदादांनी जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून लगावला. पक्षातून हकालपट्टी करण्यासाठी आम्ही येथे बसलेलो नाही. पक्षात आम्हाला बेरजेचे राजकारण करायचे आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची हकालपट्टी करण्याचा प्रश्नच उदभवत नाही, असा रोख अजितदादांचा होता.

आम्हाला वाद करायचा नाही, जर तसं झालं तर निवडणूक आयोग निर्णय घेणार- मीडियामध्ये मी वाचलं, ऐकलं की नऊ जणांवर कारवाई करण्यात येणार आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की आपल्याकडे लोकशाही आहे. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. आमच्याकडे बहुमत आहे. आम्हाला वाद करायचा नाही. याऊपरही वाद झाला तर यावर निवडणूक आयोगाला निर्णय घेण्याचा अधिकार आहे. विधीमंडळ नेता या नात्यानं मी कालच विधानसभा अध्यक्षांना पत्र दिलं असून जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. बंड केलं की नाही. पक्ष कुणाचा यावर निर्णय घेण्याचा अधिकार निवडणूक आयोगाला असल्याचंही अजितदादा म्हणाले.

शरद पवार यांनी घेतलेले निर्णय आम्हाला लागू नाही- प्रफुल्ल पटेल
शरद पवार यांनी घेतलेले निर्णय आम्हाला लागू राहणार नाही. याचं कारण असे की बहुसंख्य लोकांनी आमच्या निर्णयाला पाठिंबा दिलेला आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व आहे. आमची इच्छा नाही की वाद होता कामा नये पण कुठलाही प्रश्न निर्माण झाला तर त्यावेळी जसं अलिकडच्या काळात निवडणूक आयोगाने निर्णय घेतला तसा अधिकार निवडणूक आयोगाकडे राहील. यावेळी पत्रकारांनी विचारले की तुमच्याकडे किती आमदारांची संख्याबळ आहे त्यावर आमच्याकडे आमदार असल्याशिवाय शपथविधी झाला का, असा उलट प्रश्नही प्रफुल्ल पटले यांनी उपस्थित केला. ज्यांनी दावा केला आहे त्यांनी त्यांच्याकडे किती आमदार आहे, हे स्पष्ट करावं, असा टोलाही प्रफुल्ल पटेल यांनी जयंत पाटील यांचा नामोल्लेख टाळून लगावला.

Back to top button
error: Content is protected !!