महाराष्ट्र
Trending

अंगणवाडी सेविका आणि ग्रामसेवकांवर मोठी जबाबदारी ! बालविवाह होताना निदर्शनास आल्यास तातडीने द्यावी लागेल माहिती !!

बालविवाह झाल्यास सश्रम कारावास व आर्थिक दंडही निश्चित- जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

Story Highlights
  • बालविवाह होतांना निदर्शनास आल्यास तातडीने 1098 किंवा 112 क्रमांकावर साधा संपर्क
  • अक्षय्य तृतीया व आसपास होणाऱ्या विवाहांवर प्रशासनाचे बारीक लक्ष

नांदेड,  दि. 22 :- जिल्ह्यात व राज्यात अक्षय तृतीया व इतर मुहूर्तांवर मोठ्या प्रमाणात विवाहाचे आयोजन होते. अशा विवाहात जर कुठे बालविवाह लागले तर संबंधितांविरूद्ध दंडात्मक कारवाईसह सश्रम कारावासाची कायद्यात तरतूद केली आहे. दरम्यान, बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास गावपातळीवर ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका, शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

बालविवाह कायद्याने गुन्हा असून या कुप्रथेविरुद्ध प्रत्येकाने दक्षता घेतली पाहिजे. बालविवाह जर कुठे लागत असतील तर ते रोखण्यासाठी इतर नागरिकांनीही पुढे येऊन तातडीने 1098 व 112 या क्रमांकावर पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले.

अक्षय्य तृतीया अशा विशेष दिवसाचे औचित्य साधून मोठ्या प्रमाणात विवाह व बालविवाह होत असतात. बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 अन्वये विवाहाच्या वेळी मुलीचे वय 18 व मुलाचे वय 21 पेक्षा कमी असू नये, अशी तरतूद आहे. मुलींना लहान वयात विवाह झाल्यास तिची मानसिक व शारीरिक परिपक्वता न झाल्याने तिच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो. बालविवाह आयोजित करणे हा अजामीनपात्र गुन्हा आहे.

यातील कलम 9, 10, 11 नुसार बाल विवाह करणाऱ्या आई-वडील, नातेवाईक, लग्न विधी लावणारे, मंडप, बँडवाले या सकट सर्व वऱ्हाडी यावर 1 लाख रुपये दंड व 2 वर्षांपर्यंतचा कारावासाची शिक्षा आहे. या शिक्षेतून मेंदी लावणाऱ्या व्यक्तीपासून, ब्युटीपार्लर, छायाचित्रकार यांचीही सुटका नाही.

विवाह संदर्भात जे काही घटक असतील त्या सर्वांविरुद्ध कायदेशीर कारवाईची तरतूद अधिनियमान्वये करण्यात आलेली आहे. बालविवाह झाल्याचे निदर्शनास आल्यास गावपातळीवर ग्रामसेवक व अंगणवाडी सेविका, शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी, मुख्य सेविका यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!