महाराष्ट्रवैजापूर
Trending

अंगणवाडी सेविका आक्रमक: चांगले मोबाईल, गॅस सिलिंडर व नळ कनेक्शन तातडीने द्या, अन्यथा आंदोलनाचा इशारा !

शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी संघटनेकडून गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – उत्कृष्ट कंपनीचे मोबाईल, गॅस सिलिंडर व नळ कनेक्शनसाठी वैजापूर तालुक्यातील अंगणवाडी सेविका आक्रमक झाल्या आहेत. या सुविधांचा लाभ तातडीने उपलब्ध करून द्यावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शिक्षक भारती महाराष्ट्र राज्य पूर्व प्राथमिक अंगणवाडी संघटनेकडून देण्यात आला आहे.

यासंदर्भात वैजापूर पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, अंगणवाडी सेविकांना उत्कृष्ट कंपनीचे मोबाईल ग्रामपंचायत मार्फत देण्यात यावे. जेणेकरून अंगणवाडी सेविका अंगणवाडी स्तरावर १०० टक्के काम करतील. अंगणवाडीतील ३ ते ६ वयोगटातील लाभार्थी यांच्यासाठी गरम ताजा आहार अंगणवाडीत पुरवठा झालेला आहे. अंगणवाडीमध्ये आहार शिजवण्यासाठी ग्रामपंचायतकडे अंगणवाडीसाठी निधी आलेला आहे.

त्यामार्फत प्रत्येक अंगणवाड्यांना आहार शिजविण्यासाठी गॅस सिलेंडर व भांडे व इतर साहित्य आवश्यक आहे. प्रत्येक अंगणवाडीमध्ये नळ जोडणी आवश्यक आहे. अंगणवाडी स्तरावर अंगणवाडी सेविकांना जे साहीत्य दिले जाते उदा. बेबी किट, खेळणी, पुर्व प्राथमिक शालेय शिक्षण साहित्य किट इ. हे अंगणवाडी स्तरावर वाटप करण्यात यावे.

जेणे करुन अंगणवाडी सेविका यांना नेण्यास अडचणी येणार नाही. अंगणवाडी सेविका यांची मासिक बैठका या महिन्यातून दोनदा घेण्यात याव्या. वैजापूर प्रकल्पांत एकूण १० बिट असून प्रत्येक बिटला एक पर्यवेक्षिका असणे गरजेचे असुन सद्यस्थितीत ५ पर्यवेक्षीका उपलब्ध आहे. उर्वरीत ५ पर्यवेक्षिकांची नियुक्ती करण्यात यावी.

संघटनेच्या जिल्हाध्यक्ष माया म्हस्के, तालुकाध्यक्ष पुष्पा जाधव, तालुका संघटक अश्विनी बरकसे आदी पदाधिका-यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे हे निवेदन सादर करून इशारा दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!