महाराष्ट्र
Trending

जालन्यातील मराठा आंदोलन पोलिसांनी चिरडले, महिलांच्या डोक्यातून रक्त निघेपर्यंत पोलिसांचा लाठीचार्ज ! रेटारेटीत पोलिसही जखमी, सोलापूर धूळे रोडवर बस जाळल्या !!

राज्य सरकार व जालना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस यांचे सर्वांना शांततेचे आवाहन

संभाजीनगर लाईव्ह, दि. १- अंतर वाली सराटी (ता. अंबड, जिल्हा जालना) येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज, १ सप्टेंबर रोजी हिंसक वळण लागले. आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याने आंदोलक आक्रमक झाले. यावेळी पोलिसांनी केलेल्या लाठीचार्जमध्ये आंदोलनाला समर्थन देण्यासाठी आलेल्या महिलांनाही पोलिसांनी सोडले नाही. अतिशय अमानुष लाठीचार्ज पोलिसांनी केल्याने परिसरात एकच गोंधळ उडून रेटारेटी व पळापळ सुरु झाली. यात पोलिसही जखमी झाले. दरम्यान, राज्यसरकार व स्थानिक जालना जिल्हाधिकारी व जिल्हा पोलिस यांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले आहे.

सकल मराठा समाजाच्या वतीने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे लोकशाही मार्गाने व शांततेत आंदोलन सुरु असताना आंदोलन चिरडण्याचा उद्देशाने पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. तर आंदोलनकर्त्याची प्रकृती खालावत असल्याने उपोषणकर्त्यास जिल्हा प्रशासन व वरिष्ठ पोलिसांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याची विनंती केली. मात्र, उपोषणकर्ते हे आरक्षणाच्या मागणीवर ठाम झाले अन् यातून भडका उडाल्याची प्राथमिक माहिती आहे.

मराठा आरक्षणावर ठोस निर्णय घेईपर्यंत उपोषण सुरु ठेवण्यावर आंदोलक ठाम- जोपर्यंत राज्य सरकार मराठा आरक्षणा बाबत ठोस निर्णय घेत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे. यामुळे राज्यसरकारची झोप उडाली आहे. राज्य सरकार केवळ आश्वासन देत आहे मात्र, लेखी व ठोस निर्णय घेत नसल्यामुळे आंदोलक आंदोलनावर ठाम आहे. यात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावत असल्याने राज्य सरकारच्या पायाखालची वाळू सरकली आहे. दरम्यान, जिल्हा प्रशासन व पोलिसांनी उपोषणकर्याला विनंती केली मात्र, उपोषणकर्ते मागणीवर ठाम राहिले.

सोलापूर धूळे महामार्गवर बस जाळल्या- आंदोलनस्थळी झालेल्या लाठीचार्जची बातमी वार्यासारखी पसरली. राज्यभर मराठा समाज आक्रमक झाला. सोलापूर धूळे महामार्गावरील वडीगोद्रीजवळ आंदोलकांच्या वतीने दोन बस जाळण्यात आल्या. याशिवाय दोन बसेसवर दगडफेक करण्यात आली.

उद्या, २ सप्टेंबर रोजी जालना, बीड नंदूरबार बंदची हाक- जालना जिल्ह्यातील मराठा आरक्षणाचे आंदोलन राज्य सरकारने पोलिसांना हताशी धरून चिरडल्याचा आरोप करत मराठा क्रांती मोर्चाने उद्या, २ सप्टेंबर रोजी बंदची हाक दिली आहे. सर्वांनी लोकशाही शांततेच्या मार्गाने हे आंदोलन करावे, असे आवाहन मराठा समाजातील आंदोलक करत होते.

या घटनेच्या निषेधार्ह मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने जालना जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे. आरोग्य सुविधा, शाळा व महाविद्यालय वगळता सर्व व्यापारी प्रतिष्ठान, वाहतूक, बाजार पेठा बंद ठेवून सहकार्य करावे, असे आवाहन जालना जिल्हा मराठा मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!