बीड जिल्ह्यातील निरपणा येथील हाफ मर्डर व रेणापूर हद्दीतील अपहरणाचे गुन्हे उच्च न्यायालयाकडून रद्द !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – निरपणा (जि. बीड) येथील बर्दापूर पोलिस स्टेशन हद्दीतील हाफ मर्डर व रेणापूर पोलिस स्टेशन हद्दीतील अपहरण प्रकरणातील परस्परविरोधी गुन्हे उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले. यातील एका प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे साक्ष पुरावे झाले असतानाही उच्च न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देऊन हे गुन्हे रद्द करण्याचे आदेश दिले. सन २०१८ राजकीय वादातून ही घटना घडली होती.
शशिकांत जाधव यांना मारहाण करण्यात आली होती. याप्रकरणात रमेश जाधव व दयानंद जाधव यांच्या विरोधात बर्दापूर पोलिस स्टेशनमध्ये हाफ मर्डरचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर दयानंद जाधव यांच्या अपहरण प्रकरणात शशिकांत जाधव आणि श्रीकांत जाधव यांच्यावर रेणापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मौजे निरपणा येथील आरोपी रमेश जाधव, दयानंद जाधव यांनी शशिकांत जाधव यांना केलेल्या मारहाणीमुळे बर्दापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा नं. ११/२०१८ भा.द.वि. कलम ३०७, ५०४ व ३४ प्रमाणे झाला होता. सदर आरोपी विरूद्ध जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथे साक्ष पुरावे झाले असतानाही त्यांनी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे फौजदारी अपील दाखल करून गुन्हा रद्द करण्याची मागणी अॅड. प्रशांत जाधव व प्रियंका शिंदे यांच्या मार्फत केली.
तसेच रेणापूर पोलीस स्टेशनमध्ये दाखल अपहरण मारहाण प्रकरणातील आरोपी शशिकांत जाधव व श्रीकांत जाधव यांनीही गुन्हा रद्द व्हावा म्हणून उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे अपील केले. बर्दापूर पोलीस स्टेशनमध्ये झालेल्या गुन्ह्याबद्दल दोन्ही गुन्हे ऐकमेकाविरूद्ध रद्द व्हावे म्हणून दाद मागीतली होती.
शशिकांत जाधव, श्रीकांत जाधव, दयानंद जाधव, रमेश जाधव यांच्यावतीने अॅड. प्रशांत जाधव यांनी युक्तीवाद केला की, सदर गुन्हे राजकीय दबामुळे दाखल झाले असून एकाच गावातील व एकमेकांचे भाऊ असून ते यापुढे भांडण करणार नाहीत व भविष्यात कोणताही वाद निर्माण होणार नाही, तरी गुन्हा रद्द करण्यात यावेत. सरकारी वकील यांनी युक्तीवाद केला की जिल्हा सत्र न्यायालय अंबाजोगाई येथील प्रकरणात आरोपपत्र दाखल झाले असून साक्ष पुरावाही संपत आला आहे. त्यामुळे गुन्हा रद्द करू नये. यावर अॅड. प्रशांत जाधव व प्रियंका शिंदे यांनी न्यायालयापुढे असा युक्तीवाद केला की, जरी साक्षीदार तपासले असले तरी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा रद्द करण्यात येतो. वरील सर्व बाबींचा विचार करून साक्षीदार तपासले असतांनाही उच्च न्यायालयाने अपहरण व हाफ मर्डर सारखे गुन्हे रद्द केले. आरोपी व तक्रारदार यांच्यावतीने अॅड. प्रशांत जाधव व प्रियंका शिंदे यांनी काम पाहिले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe