शालेय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा, आधार नोंदणी अभावी विद्यार्थी लाभापासून वंचित राहणार नाही: दीपक केसरकर

नागपूर, दि. २२ : शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत सर्व विद्यार्थ्यांची आधार जोडणी डिसेंबर, २०२२ अखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या १०० टक्के आधार नोंदणीसाठी राज्यातील महानगरपालिका, नगरपालिका तसेच इतर क्षेत्रीय कार्यालयांना वेळोवेळी सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र, कोणत्याही विद्यार्थ्यांना आधार नसल्याच्या कारणास्तव योजनांच्या लाभापासून वंचित ठेवण्यात येणार नाही, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज विधानसभेत दिली.
विधानसभा सदस्य प्रशांत ठाकूर यांनी या संदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री श्री. केसरकर बोलत होते.
राज्यशासनाने संच मान्यतेसाठी पहिली ते बारावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या आधारकार्डची माहिती सरल प्रणालीवर भरणे शाळांना बंधनकारक केले आहे. सर्व विद्यार्थ्यांच्या आधार जोडणी संदर्भातील प्रक्रिया पूर्ण करता येईल, याबाबत नियोजन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया वेळेवर पार पडावी यासाठी संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
राज्यात दोन कोटी १२ लाख विद्यार्थी नोंद या सरल प्रणालीवर करण्यात आली आहे, अशी माहिती मंत्री केसरकर यांनी दिली. या लक्षवेधी वरील चर्चेत विरोधी पक्षनेते अजित पवार, प्रा.वर्षा गायकवाड, रोहित पवार यांनी सहभाग घेतला.