छत्रपती संभाजीनगरपैठण
Trending

बिडकीन हद्यीतील फारोळा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह रोखला ! गंगापूर तालुक्यातील भोयगावच्या मुलासोबत होणार होता विवाह !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ –  गंगापूर तालुक्यातीलच भोयगावच्या मुलासोबत बीडकीन हद्यीतील फारोळा येथील 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचा विवाह पोलिसांनी रोखला. अल्पवयात मुलीचा विवाह करणार नसल्याची हमी कुटुंबाने समुपदेशनंतर पोलिसांना दिली. १४ जुलै रोजी हा विवाह योजिला होता. मात्र, मुलीचे वय कमी असल्याने कायद्यानुसार हा विवाह सोहळा पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून थांबवला.

मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली की, बिडकीन हद्यीतील फारोळा येथे एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलींचे दिनांक 14/07/2023 रोजी गंगापूर तालुक्यातील भोयगाव या गावच्या मुलासोबत विवाह सोहळा संपन्न होणार आहे. याबाबत पोलीस अधीक्षक यांनी तातडीने पावले उचलत दामिनी पथकांच्या स.पो.नि. आरती जाधव यांना निर्देश दिले. या विवाहा बाबत अधिक माहिती घेवुन खातरजमा करून पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन करून विवाह होत असल्यास थांबविण्याचे निर्देश दिले.

यावरून दामिनी पथकांचे प्रमुख सपोनि आरती जाधव या पथकासह फारोळा येथे गेल्या असता तेथे त्यांना विवाहाची तयारी होत असतांना दिसले. यावरुन त्यांनी तात्काळ मुलींच्या आई- वडिलांची भेट घेतली. हे कुटूंब शेतकरी असून अशिक्षित असल्याचे समजले. त्यांना विश्वासात घेवून अधिक चर्चा करता त्यांनी त्याच्या मुलींचे वय हे 16 वर्षे असल्याचे सांगितले तसेच मुलीचे लग्न नात्यातील मुलांशी करत असल्याचे मान्य केले आहे.

त्यावर दामिनी पथकांचे सपोनि आरती जाधव व चाईल्ड लाईनचे समुपदेशक गोंविद तांगडे यांनी बालविवाहामुळे मुलीच्या आयुष्याबाबत होणा-या दुष्परिणामा बाबत व कायदेशिर बाबींची संपूर्ण माहिती देवून पालकांचे व नातेवाईकांचे समुपदेशन केले. यामुळे आई- वडिल यांचे मन व मत परिवर्तन होवून त्यांनी हा विवाह न करण्याचे मान्य केले. याबाबत त्यांच्याकडून चाईल्डलाईनचे समुपदेशक यांनी बंधपत्र लिहून घेवून सदर मुलीला बाल कल्याण समितीच्या समक्ष हजर करण्यात येवून त्यांचे निर्देशानुसार पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

पोलीस अधीक्षक यांनी अशा प्रकारे होणारे बालविवाह रोखण्यात अग्रेसर व कडक भूमीका घेवून यापूर्वी सुध्दा अशा प्रकारे अल्पवयीन मुलींचे बालविवाह पालकांचे मनपरिर्वतन करून अत्यंत सांमजस्याने रोखले आहे. या प्रकरणी सुध्दा मुलीच्या आई- वडिल व ईतर नातेवाईक यांना कायदेशिर बाबींची माहिती देवून मुलींचे अल्पवयात लग्न करणे हा कायदेशिररित्या गुन्हा असुन असा जाणीव पूर्वक बालविवाह ठरविणा-यास किंवा त्यास प्रोत्साहन तसेच सोहळा पारपाडणा-यास दोन वर्षे सक्तमजुरी व एक लक्ष रूपये दंड किंवा दोन्ही शिक्षा ही बाल विवाह प्रतिबंध अधिनियम-2006 नुसार होवू शकते.

यामुळे पालकांनी अल्पवयीन मुलींचा लवकर लग्न करण्याचा घाट न धरता तिला उच्चतम शिक्षण घेण्यास प्रवृत्त करावे. ज्यामुळे भविष्यात मुली स्वत:चे पायावर उभे राहुन तीचे स्वत:चे उज्वल भविष्य निर्माण करून समाजात तिची एक विशिष्ट ओळख निर्माण करू शकेल. ही कारवाई मनिष कलवानिया, पोलीस अधीक्षक, सुनील कृष्णा लांजेवार अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली दामिनी पथकांचे स.पो.नि. आरती जाधव, चाईल्ड लाईनचे समुपदेशक गोंविद तांगडे, पोलीस अंमलदार कपिल बनकर,जयश्री महालकर यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!