छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

बिपरजॉय चक्रीवादळाचा असाही परिणाम, छत्रपती संभाजीनगरात पावसाचा मारा ! सोसाट्याचा वाऱ्याने चार ठिकाणी झाडे उन्मळली !!

महापालिका यंत्रणेने तत्पर प्रतिसाद देऊन पडलेले झाडे हटवले

संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – मान्सून महाराष्ट्राच्या वेशीवर येऊन धडकला असला तरी बिपरजॉय चक्रीवादळामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाचे आगमन झाले आहे. छत्रपती संभाजीनगर शहर परिसरात काल सायंकाळच्या सुमारास झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने अनेकांची तारांबळ उडाली. हा पाऊस मान्सूनपूर्व व मान्सूनचा नसून बिपरजॉय चक्रीवादळाचा परिणाम असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. दरम्यान, काल झालेल्या सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसामुळे छत्रपती संभाजीनगर शहरात चार ठिकाणी झाडे उन्मळून पडली. माहिती मिळताच महानगर पालिकेच्या यंत्रणेने ही झाडे हटवली.

दिनांक 10 जून रोजी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास शहरात सोसाट्याचा वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. यामुळे वीट्स हॉटेल जवळ, खडकेश्वर सांस्कृतिक मंडळ जवळ, घाटी मेन गेट जवळ आणि शहागंज येथील आदर्श भवन जवळ या चार ठिकाणी झाडे पडले. याबाबतचे रेस्क्यू कॉल आपत्ती व्यवस्थापन कक्षाला प्राप्त होताच आपत्ती व्यवस्थापन कक्ष, अग्निशमन विभाग आणि यांत्रिकी विभागाने तत्परता दाखवून तवरीत सदरील ठिकाणी जेसीबी आणि फायर टेंडर पोहच केले. रात्री आठ वाजेपर्यंत वर चारही ठिकाणाचे रेस्क्यू कॉल प्राप्त झाले होते. त्यानंतर महानगरपालिकेच्या यंत्रणेने युद्धपातळीवर काम हाती घेऊन उन्मळलेले झाड हटवले.

जय भवानी नगर येथील नाल्याला पूर- याशिवाय जय भवानी नगर येथील नाल्याला पूर आल्यामुळे या भागात पाणी साचल्याची माहिती प्राप्त होतातच यांत्रिकी विभागातर्फे या ठिकाणी जेसीबी पाठवण्यात आले होते. साचलेले पाणी काढण्याचे काम युद्धपातळीवर करण्यात आले.

आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्मार्ट सिटी कार्यालयात स्थलांतरित- पावसाळ्यात जीवित हानी, लोकांच्या मालमत्तेचे नुकसान किंवा रस्त्यांवर झाडे पडून वाहतुकीचा त्रास होऊ नये यासाठी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका तर्फे आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन चे काम प्रभावीपणे व्हावे आणि याच्यात जास्तीत जास्त अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर व्हावा या दृष्टिकोनातून महापालिकेचे प्रशासक जी श्रीकांत यांनी आपत्ती व्यवस्थापन कक्ष स्मार्ट सिटी कार्यालयात स्थलांतरित केला आहे.

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सहजपणे बघता येते रेस्क्यू ऑपरेशन- स्मार्ट सिटी येथील कंट्रोल रूम मध्ये संपूर्ण शहरात काय परिस्थिती आहे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या माध्यमातून सहजपणे बघून रेस्क्यू ऑपरेशन तातडीने आणि तत्परतेने हाती घेणे शक्य झाला आहे. याशिवाय मोठी आपदा किंवा आग लागल्यावर आपत्तीग्रस्त भागाच्या ड्रोनच्या साह्याने आढावा घेऊन रेस्क्यू ऑपरेशनचे नियोजन करावे असे निर्देश देखील प्रशासक जी श्रीकांत यांनी दिले आहे.

दरम्यान, अरबी समुद्रातील बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सनच्या हालचालीत वेगाने बदल होत असून पुढील २४ तासांत महाराष्ट्रात मान्सून दाखल होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

Back to top button
error: Content is protected !!