छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

आयुक्त जी श्रीकांत यांनी स्वतः कचरा वेगळा करून केले प्रबोधन ! यापुढे ओला व सुका कचरा वेगळा करून न दिल्यास मनपाने घेतला हा मोठा निर्णय !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ७- सध्या ओला आणि सुका कचरा वेगवेगळा संकलित करण्यावर महानगरपालिका भर देत असून यासंदर्भात नागरिकांमध्ये जागृतीही करण्यात येत आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी आज शहरातील विविध भागांत भेट देऊन यासंदर्भात केवळ प्रबोधनच नव्हे तर स्वतः कचर्याचे वर्गीकरण करून दाखवले. दरम्यान, यापुढे शहरातील नागरिकांनी ओला व सुका कचरा वेगळा करून न दिल्यास मनपा तो कचरा उचलणार नसल्याचेही आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी बजावले. केवळ आदेश, निर्देश न देता ओला व सुका वेगळा करून आणलेल्या एका मुलाच्या पाठीवर शाबासकीची थापही त्यांनी दिली.

या महिन्याच्या म्हणजेच ऑगस्टच्या पहिल्या तारखेपासून छत्रपती संभाजी नगर महानगरपालिका मिसळलेला कचरा घेणार नाही, असा निर्णय महापालिकेचे आयुक्त प्रशासक जी श्रीकांत यांनी घेतलेला आहे. याबाबत संपूर्ण शहरात सर्वसामान्य नागरिकांमध्ये जनजागृती देखील करण्यात येत आहे. या जनजागृतीचा भाग म्हणून आज, ७ ऑगस्ट रोजी शहा बाजार काचीवाडा भागात नागरिक मित्र पथक यांनी ओला आणि सुका कचरा वेगवेगळा द्यावा असे जनजागृती संदेश देण्यासाठी रूट मार्च रॅलीचे आयोजन केले.

काचीवाड्यात मिक्स कचरा आणल्यानंतर प्रशासक जी श्रीकांत यांनी स्वतःहून ओला व सुका कचरा वेगळा केला- सदरील रूटमार्चचे उद्घाटन प्रशासक जी श्रीकांत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रशासक जी श्रीकांत यांनी कचरा वर्गीकरण बाबत जनजागृती स्टिकर चिटकावून रूट मार्चचे उद्घाटन केले. यावेळी रूट मार्चसोबत फिरताना प्रशासकांनी नागरिकांशी संवाद साधला आणि त्यांचे प्रबोधन केले. काचीवाडा येथे मिक्स कचरा आणल्यानंतर प्रशासक जी श्रीकांत यांनी स्वतःहून ओला व सुका कचरा वेगळा केला. त्या कचऱ्यात त्यांना डायपर सुद्धा सापडले ते डायपर उघडे देण्यात आले होते. हे बघून त्यांनी स्वतः एक डायपर उचलला आणि त्याला कागदात लपेटून त्याच्यावर पेनाने मार्किंग टाकून जैव वैद्यकीय कचरा याच पद्धतीने सफाई कर्मचाऱ्यांच्या हातात द्यावे असे प्रत्यक्ष करून दाखवले.

ओला व सुका कचरा घेऊन आलेल्या मुलाच्या पाठीवर शाबासकीची थाप- पुन्हा पुन्हा प्रबोधन करूनही जर नागरिक ओला व सुका कचरा वेगवेगळा न देता मिक्स कचरा देत असेल तर महानगरपालिका तो कचरा उचलणार नाही असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले. यापुढे एका मुलगा सुका आणि ओला कचरा वेगळा ठेवून हात गाडीच्या प्रतीक्षेत उभा होता त्याला प्रशासकांनी शाबासकीची थाप दिली आणि सुका आणि ओला कचरा याच्यातून महानगरपालिका खत, गॅस निर्माण करतोय अशी माहिती यावेळी दिली. इतर नागरिकांना देखील त्यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा देण्याचे महत्वाचे प्रबोधन केले आणि शहरातील सर्व नागरिकांना आवाहन केले की त्यांनी ओला आणि सुका कचरा वेगळा देऊन महापालिकेची सहकार्य करावे. यावेळी नागरी मित्र पथक प्रमुख प्रमोद जाधव, वार्ड अधिकारी नईम अन्सारी, संबंधित स्वच्छता निरीक्षक जवान आणि सफाई मजूर व इतरांची उपस्थिती होती.

बुड्डी लेन कबाडीपुरा भागाची पाहणी- या आधी प्रशासक जी श्रीकांत यांनी कबाडीपुरा येथून वाहणारा नाल्याची पाहणी केली आणि त्यावर बांधण्यात आलेले महापालिकेचे व्यापारी संकुलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी नागरिकांना आवाहन केले की त्यांनी कचरा आणि इतर वस्तू जसे की कपडे प्लास्टिक इत्यादी नाल्यात टाकू नये. यामुळे नाल्याच्या प्रवाहात अडथळे निर्माण होऊन दुर्गंध आणि अस्वच्छता पसरते. यावेळी त्यांनी व्यापारी संकुलात महापालिकेचे आरोग्य केंद्राची देखील पाहणी केली आणि आरोग्य केंद्राच्या परिसर तसेच टेरेस स्वच्छ करून तिथे टाकण्यात आलेला कचरा उचलून घेण्याचे निर्देश दिले. आरोग्य केंद्रात आत मध्ये देखील दुरुस्तीचे काम करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी वार्ड अभियंता यांना दिले.

Back to top button
error: Content is protected !!