छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

सिडको एन ५ मधील अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! मनपाच्या धडक मोहीमेमुळे अतिक्रमणधारकांचे धाबे दणाणले !!

सिडको एन ५ एच सेक्टर येथील सत्यम नगर, प्रियदर्शनी कॉलनी व श्रीनगर कॉलनीत मोहीम

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने सिडको एन ५ एच सेक्टर या परिसरातील एकूण 10 अतिक्रमणे जमिनदोस्त करण्यात आली. महानगरपालिकेच्या वतीने एन ५ सत्यम नगर सर्विस रस्त्यावर सध्या रस्ता तयार करण्याचे व त्यावर गट्टू बसविण्याचे काम सुरू आहे. रस्त्याची लांबी रुंदी पूर्ण मिळावी यासाठी या भागातील नागरिकांना वेळोवेळी आपले अतिक्रमण स्वतः काढून घेण्याची विनंती व आवाहन केले होते. परंतु स्थानिक नागरिकांनी सहकार्याची भूमिका न घेतल्याने प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार आज, १९ ऑगस्ट रोजी सिडको एन ५ एच सेक्टर येथील सत्यम नगर, प्रियदर्शनी कॉलनी व श्रीनगर कॉलनी या ठिकाणचे अतिक्रमण काढण्यात आले.

या ठिकाणी शिंदे, मयूर ढवळे यासह इतर नागरिकांनी आपल्या घरासमोर रस्ता बाधित अतिक्रमण केले होते. शिंदे यांनी अंदाजे दहा बाय 80 फूट या आकाराच्या जागेत घरासमोर लोखंडी गेट लावून समोर सिमेंटचे उभे गट्टू लावले होते. ज्यामुळे हा रस्ता अरूंद झाला होता. यामुळे इतर नागरिक गाड्या रस्त्यावर उभ्या करत होते. ढवळे यांनी आपल्या कंपाउंड वॉलच्या बाहेर दहा बाय पंधरा या लोखंडी जाळीला गेट बसवून त्यामध्ये शोभिवंत झाडे लावली होती. त्या झाडांचा कचरा सुद्धा त्या ठिकाणी साचला होता. त्यामुळे त्यांच्या समक्ष सदर लोखंडी जाळी आणि गेट काढून टाकण्यात आले.

डॉक्टर जयस्वाल यांनी सुद्धा घराच्या समोर उत्तर दक्षिण आणि पश्चिम बाजूने लोखंडी जाळी लावून व त्यावर मोठा ओटा बांधून झाडे लावली होती. या ठिकाणी चौरस्ता असल्याने नेहमी अपघात होत होते आणि वाहतुकीची कोंडी होत होती. याबाबत स्थानिक नागरिकांनी सुद्धा महानगरपालिका प्रशासन आणि सिडकोला अतिक्रमण काढण्याची विनंती केली होती. हे सर्व अतिक्रमणे आज काढण्यात आली. बजरंग चौक येथील देवगिरी नागरी बँक ते वोखार्ड कंपनी या रस्त्यावर दोन चहाच्या टपऱ्या काढण्यात आल्या तर एक हातगाडी हटविण्यात आली. या कारवाईमुळे सदर रस्ता आता रुंद झाला असून या ठिकाणी गट्टू बसवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

एन ५ मधील डॉक्टर महेंद्र यांचे याच प्रकारचे अतिक्रमण होते परंतु ते घरी नसल्याने त्यांनी मोबाईलवर संपर्क साधला असता त्यांनी मी स्वतः अतिक्रमन काढून घेणार असे सांगितले. त्यामुळे वरिष्ठांच्या परवानगीनुसार त्यांना एक दिवसाची मुदत देण्यात आली आहे. सर्व सिडको हडको भागातील व शहरातील नागरिकांना विनंती आहे की आपल्या घरासमोरील रस्त्यावर बाधित जागा कोणत्याही प्रकारचे शेड अतिक्रमणे, झाडे लावणे ज्यामुळे अपघात होईल व रस्ता अरुंद होऊन वाहतुकीत अडथळा निर्माण होईल असे कृत्य करू नये, असे आवाहन मनपाच्यावतीने करण्यात आले आहे.

महानगरपालिकेच्या वतीने अतिक्रमण हटाव मोहीम सुरू आहे आणि या मोहीममध्ये नागरिकांच्याच मालमत्तेचे नुकसान होते. त्यामुळे ज्या नागरिकांनी अतिक्रमण केले आहे त्यांनी आपले अतिक्रमण स्वतः काढून घ्यावे व महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक जी श्रीकांत यांनी केले आहे.

ही कारवाई प्रशासक जी श्रीकांत यांच्या आदेशानुसार अतिरिक्त आयुक्त सौरभ जोशी, उपायुक्त ०१ अतिक्रमण सविता सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली इमारतीत निरीक्षक सय्यद जमशेद व पथक कर्मचारी यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!