छत्रपती संभाजीनगर
Trending

बांधकाम विभागाचा लिपीक लाच घेताना जाळ्यात, निवीदेचा गैरकारभार चव्हाट्यावर ! शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कार्यालयातच पिशवीत घेतले ५ हजार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २१ – शासकीय वैद्यकीय महाविदयालय व रुग्णालयाच्या बांधकाम विभागातील लिपीकाला ५ हजारांची लाच घेताना पकडले. सेवाभावी संस्थेस निवीदा दाखल करण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे बक्षीस म्हणून त्यांनी १५ हजारांची मागणी केली व तडजोडीअंती ५ हजार रुपये घेतले. रघुनाथ तुकाराम केदारे (वय 45 वर्षे, व्यवसाय- नौकरी, पद-कनिष्ठ लिपीक, कार्यालय बांधकाम विभाग, शासकिय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय छत्रपती संभाजीनगर, रा. पळशी खुर्द ता. कन्नड, ह.मु. पहाडसिंगपुरा, पवननगर, छत्रपती संभाजीनगर) असे आरोपीचे नाव आहे.

महिला तक्रारदार या एका सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा व हॉटेल चालक आहेत. त्यांनी पोलिसांना दिलेली माहिती अशी की, सदरील बिगर शासकिय संस्था सन 2020 मध्ये नोंदणीकृत केलेली आहे. संस्थेच्या मार्फतीने शासकीय कार्यालयातील कामे घेत असतात. डिसेंबर 2021 मध्ये सेवाभावी संस्थे मार्फत शासकीय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय, छत्रपती संभाजीनगर येथील सर्जिकल ईमारती समोरील स्वच्छतागृहाची निवीदा भरून दि. 06/12/2021 ते दि. 05/11/2022 या कालावधी करिता निवीदा 4,11,000/- रुपये खरेदी केली होती. सदरचा कालावधी संपल्यानंतर संस्थेला परत अधिष्ठाता, शासकिय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय यांनी 7 महिन्यांची मुदतवाढ दिली होती.

सदरची मुदत दि.. 05/06/2023 रोजी संपत असल्याने अधिष्ठाता यांनी सन 2023-24 करिता नवीन ई-निवीदा करिता जाहिरात प्रसिध्द केली असून त्यामध्ये ई-निवीदा भरण्याची शेवटीची दिनांक 06/06/2023 असा आहे. संस्थेच्या मार्फत स्वच्छता गृहाची निवीदा भरण्याकरिता अनुभव प्रमाणत्राची आवश्यकता असल्याने सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा या शासकीय वैद्यकीय महाविदयालय येथील बांधकाम विभागातील रघुनाथ केदारे, लिपीक यांचेकडे लेखी अर्जासह दिनांक 05/06/2023 रोजी दुपारच्या वेळी कार्यालयात गेल्या.

लिपीक केदारे यांना सांगितले की, मला स्वच्छातागृहाचे निवीदा भरणे आहे त्या करिता मला अनुभव प्रमाण पत्राची आवश्यकता आहे. तरी आपण मला संस्थेच्या नावे अनुभव प्रमाणपत्र द्यावे अशी विनंती केली असता केदारे लिपीक म्हणाले की, थोड्या वेळाने तुम्हाला मी अनुभव प्रमाणपत्र देतो पण प्रमाणपत्र असेच मिळत नाही त्यासाठी काही तरी खर्च करावा लागतो असे म्हणाले. त्यानंतर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा थोडयावेळाने परत कार्यालयात गेल्या असता केदारे, लिपीक यांनी संस्थेचे नावे अधिष्ठाता यांची स्वाक्षरी असलेले अनुभव प्रमाणपत्र दिले व फुल नाही फुलाची पाकळी तरी द्या असे म्हणाले. त्यावर सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा यांनी त्यांना 1000/-रुपये दिले. केदारे यांनी ते घेतले व म्हणाले की तुम्ही तर 1000/- रुपयेच दिले या कामासाठी किमान 15000/-रुपये लागतात आता तुम्ही तुमचे काम करून घ्या व उद्या परत मला भेटायला कार्यालयात या असे म्हणून 15000/- रुपये लाचेची मागणी केली.

दरम्यान, सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा यांनी लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालय गाठून रितसर तक्रार दिली. या तक्रारीवरून दिनांक 6/06/2023 रोजी बांधकाम विभाग, शासकिय वैदयकिय महाविदयालय व रुग्णालय येथे नेमणुकीस असलेले रघुनाथ केदारे, कनिष्ठ लिपीक, यांची त्यांचे कार्यालयात जावून लाच मागणीची पडताळणी करण्याचा निर्णय घेतला. बांधकाम विभाग, शासकिय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय येथे पडताळणीदरम्यान लिपीक केदारे यांनी पंचसाक्षीदारां समक्ष सेवाभावी संस्थेला निवीदा दाखल करण्यासाठी अनुभव प्रमाणपत्र दिल्याचे बक्षीस म्हणून प्रथम 15000/- रुपयाची मागणी करून तडजोडी अंती 5000/- रुपयांची मागणी करून ते स्वीकारण्याचे मान्य केले.

सदर लाचेची रक्कम दिनांक 07/06/2023 रोजी बांधकाम विभाग, शासकिय वैदयकीय महाविदयालय व रुग्णालय येथे देण्याचे ठरले. ठरल्यानुसार लिपीक केदारे यांची भेट शासकिय वैदयकिय महाविदयालय व रुग्णालय येथे ओ.पी.डी. कार्यालयात झाली. भेटी दरम्यान केदारे सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षांना म्हणाले की, तुम्ही गडबड चिंता करु नका प्लिज, तुम्हाला विनंती आहे. तुम्ही निवांत राहा जशी ऑर्डर झाली तर मी घेवुन येतो असे म्हणाल्याने व तिथे गर्दी असल्याने तक्रारदार सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा लाचेची रक्कम न तेदा निघून आल्या. त्यानंतर त्यादिवशीची सापळा कारवाई स्थगित केली.

दिनांक 07/06/2023 रोजी पुन्हा संपर्क केला असता लिपीक केदारे म्हणाले की, मॅडम मी सध्या गडबडीत आहे, माझ्या घरी कार्यक्रम आहे, मी जेव्हा सांगेल तेव्हा तुम्ही या असे म्हणाले. त्यानंतर दिनांक 17/06/2023 रोजी लिपीक कैदारे याचा तक्रारदार सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा यांना फोन आला व ते म्हणाले की, तुम्ही दिनांक 19/06/2023 रोजी कार्यालयात या तुम्हाला निवेदेची रक्कम भरण्या संदर्भात पत्र देणे आहे. त्यानुसार 19/06/2023 रोजी बांधकाम विभाग, शासकिय वैदयकिय महाविदयाल व रुग्णालय येथे लाचेचा सापळा लावला. बांधकाम विभाग कार्यालयामध्ये लिपीक केदारे यांना तक्रारदार सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा भेटल्या. केदारे यांनी निवीदाची रक्कम भरण्या संदर्भात पत्र दिले व हाताने इशारा करून पैश्या बाबत विचारणा केली.

सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा यांनी लेडीज पर्स मधून 5,000/- रुपये काढून केदारे, लिपीक यांचे समोर धरली असता त्यांनी ती रक्कम ठिक आहे असे म्हणून त्यांच्या बाजुच्या खुर्चीवर असलेल्या केसरी रंगाच्या पिशवीमध्ये ठेवण्याचे सांगितले. त्यानंतर तक्रारदार सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा यांनी सदरची 5000/-रु. लाचेची रक्कम केदारे यांच्या बाजुच्या खुर्चीवर केसरी रंगाच्या पिशवी मध्ये ठेवली. त्यानंतर लगेच सापळा पथकाने कारवाई करून त्यांना पकडले. याप्रकरणी बेगमपुरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button
error: Content is protected !!