छत्रपती संभाजीनगरटॉप न्यूज
Trending

अवैध हॉटेल, बार, दारु दुकानदारांचे धाबे दणाणले ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले धाडी टाकण्याचे आदेश !!

छत्रपती संभाजीनगर, दि.२९ :-अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन तसेच मद्य पिऊन वाहन चालविणे व त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यासाठी संयुक्त पथके स्थापन करून परमिट रुम, बियरबार, मद्यविक्री दुकाने, वाहने इ.ची तपासणी करावी, यासोबतच पालक व मुलांचे प्रबोधन करावे,असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज दिले.

अल्पवयीन मुलांमध्ये मद्यप्राशन व अन्य व्यसनाधिनता त्यातून होणारे गुन्हे, अपघात इ. प्रकार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तात्काळ उपाययोजना राबविण्याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात संयुक्त बैठक पार पडली. पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर, जिल्हा परिषदेचे अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुनिल भोकरे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क संतोष झगडे, पोलीस उपायुक्त वाहतुक शिलवंत नांदेडकर, पोलीस उपायुक्त एस.एन. भुजंग, सहा. प्रादेशिक परिवहन अधिकारी एम.व्ही. दौंड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.दयानंद मोतीपवळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अभय धानोरकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्यात ३६ मध्य विक्री दुकाने, ८२२ परमिट रुम बियर बार, १०६ बियर शॉपी, १४२ देशी दारु दुकाने आहेत. मद्य विक्री दुकानांना सकाळी १० ते रात्री साडेदहा वा. पर्यंत, परमिट रुम बियरबार सकाळी १० ते रात्री साडेदहा वा. पर्यंत सुरु ठेवण्याची मुभा आहे, अशी माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागातर्फे देण्यात आली. सर्व मद्यविक्री दुकानांवर अल्पवयीन (२१ वर्षेपेक्षा कमी वय) मुलांना मद्य विक्री न करणे, परमिटरुम-बियरबार मध्ये अल्पवयीन मुलांना प्रवेश न देण्याबाबत सर्व बारचालक व मद्यविक्रेत्यांना सक्त अंमलबजावणीच्या सुचना देणे. याबाबत बार व मद्य विक्री दुकानांच्या अचानक तपासण्या करण्यात याव्या. त्यासाठी राज्य उत्पादन शुल्क, पोलीस विभाग, महानगरपालिका, परिवहन विभाग, आरोग्य विभाग व अन्य संबंधित विभागांचे संयुक्त पथक तयार करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

छुप्या मद्यविक्री व मद्यसेवनावरही लक्ष ठेवून कारवाई करा, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. मद्य विक्री दुकानाच्या आजूबाजूला आडोसा शोधून तेथेच मद्यप्राशन करणारे, परवानगी नसतांना जेवणाच्या हॉटेलात मद्यपान करु दिले जाते अशा ठिकाणी कारवाई करावी. मद्य पिऊन वाहन चालविणाऱ्यांची ‘ब्रेथ ॲनॅलायझर’ यंत्राद्वारे तपासणी करण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.

अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नयेत. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील १९२ अ- १९२-१ तसेच कलम १९९ अ मधील तरतूदीनुसार गुन्हे दाखल करण्यात यावे. त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल होणे, वाहनाची नोंदणी रद्द करणे तसेच दंडाची तरतूद ही आहे. याबाबत पालक व पाल्य यांच्यामध्ये जनजागृती करण्यात यावी. त्यासाठी महाविद्यालये, विद्यालयांच्या स्तरावर कार्यक्रम घेऊन प्रबोधन करण्यात यावे,असेही जिल्हाधिकारी स्वामी यांनी सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!