तलाठी भरती, वन विभाग आणि पोलिस भरतीत करोडो रुपयांचा भ्रष्टाचार ! मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल !!
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा गंभीर आरोप
पुणे, दि. २५- स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५,००० पदांची मेगा भरती करण्यात येईल असे राज्य सरकार तर्फे जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार परीक्षा घेण्यासाठी TCS आणि IBPS या दोन एजन्सीची निवड करण्यात आली होती. पण महाराष्ट्रात जवळ-जवळ प्रत्येक नोकर भरतीचा पेपर फोडण्यात येत असून याद्वारे करोडो रुपयांचा भ्रष्टाचार सुरू असल्याचा आरोप स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने केला आहे.
तलाठी भरती, वन विभाग भरती आणि मुंबई पोलीस भरती घोटाळ्याबाबत आज स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने आम आदमी पक्षासोबत पत्रकार भवन, पुणे येथे पत्रकार परिषदेत हे आरोप करण्यात आले. पेपरफुटी कायदा करावा आणि या सर्व घोटाळ्यांची न्यायालयीन चौकशी करून योग्य तो निर्णय घ्यावा यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिका दाखल केल्याची घोषणाही यावेळी समितीने केली.
1) मुंबई पोलीस भरती पेपरफुटी 2023 :
मुंबई पोलिस भरतीत 8000 पेक्षा जास्त कॉन्स्टेबल आणि ड्रायव्हरच्या पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. परीक्षेत घोटाळा होऊ शकतो याची कल्पना स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने परीक्षेपूर्वीच मुंबई पोलिसांना दिली होती, मात्र तरीही योग्य ती खबरदारी न घेतल्याने मुंबई पोलिस भरतीचा पेपर घोटाळेबाजांनी फोडला. स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला फुटलेला पेपर मिळाल्यानंतर स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने संघटनेच्या वतीने मुंबई पोलिसांकडे तक्रार दाखल केली त्यानुसार दहिसर पोलीस स्थानकात पेपरफुटीची FIR दाखल करण्यात आली. मुंबई पोलिसांनी या घोटाळ्याचा सखोल तपास सुरू केला आणि 100 हून अधिक आरोपींविरुद्ध पुरावे सिद्ध केले आहेत. अद्याप तपास सुरूच आहे तरीही उमेदवारांना मेडिकल नंतर नियुक्ती देण्याची प्रक्रिया सुरू केली गेली आहे. घोटाळेबाजांनी हाय टेक कॉपी करताना इतरांचे सिम कार्ड वापरले असल्यास अशा आरोपींना पकडणे कठीण झाले आहेत, 100% गुन्हेगारांना पकडण्यात आले आहे का? याच उत्तर मुंबई पोलिसांनी द्यावे. जर 100% पारदर्शक भरती झाली नसेल तर नियुक्त्या देण्याची इतकी घाई का ? सखोल तपास पूर्ण झाल्यानंतरच नियुक्त्या देण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.
२) वन पेपरफुटी २०२३ :
वन विभागाच्या २,३१८ पदांच्या भरतीसाठी अर्ज मागविण्यात आले होते. वन विभाग परीक्षेत काही टोळ्या गैरप्रकार करू शकतात याची माहिती स्पर्धा परीक्षा समन्वय समितीला मिळाली होती त्यानुसार स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने छत्रपती संभाजीनगर पोलिसांना याबाबत सूचित केलं होत. परीक्षेच्या दिवशी छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी टाकलेल्या धाडीत काही आरोपी पेपर फोडताना आढळून आले. आरोपींकडे प्रश्नांचे १११ फोटो सापडले असून परीक्षेदरम्यान पेपर फुटल्याचे सिध्द झालं आहे. वन विभागाच्या परीक्षेत अनेक FIR दाखल झाल्या असून, यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या टोळ्यांनी सदर पेपर नक्की किती आरोपींपर्यंत पोहचवला याचा तपास अजून सुरूच आहे. फक्त स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सूचित केलेल्या आरोपींना पकडण्यात आले पण इतर परीक्षा केंद्रावर किती गैरप्रकार झाले असतील? पेपर फोडून कित्येकांना पाठविण्यात आले असतील? यामुळे प्रामाणिक उमेदवारांना न्याय मिळू शकेल काय? पेपरफुटीनंतरही वनविभागाने निकाल जाहीर करण्याची तयारी केली आहे. मात्र पेपरफुटीमुळे या परीक्षा रद्द करून पुन्हा परीक्षा घेण्यात याव्यात, अशी आमची मागणी आहे.
३) तलाठी भरती पेपरफुटी २०२३ :
४,६४४ तलाठी पदांसाठी दि. १७ ऑगस्ट २०२३ ते १४ सप्टेंबर २०२३ दरम्यान एकूण ५७ शिफ्ट मध्ये TCSION कंपनीमार्फत पेपर घेण्यात आले होते. तलाठी परीक्षेसाठी १०,०४१,७१३ उमेदवारांनी अर्ज केले त्यापैकी ८,६४,९६० उमेदवार परीक्षेस हजार होते. तलाठी परीक्षेत अनेक गैरप्रकार झाले ते पुढीलप्रमाणे :
अ) नाशिक पेपरफुटी : पिंपरी-चिंचवड पोलीस भरती २०२१, म्हाडा पदभरती २०२२ मधील आरोपी गणेश गुसिंगे याने तलाठी भरतीचा पेपर पहिल्याच दिवशी फोडला. आरोपींकडे प्रश्न पत्रिकेचे १८६ फोटो आढळून आल्याचे FIR मध्ये नमूद आहे स्पाय कॅमेरा, मायक्रो ब्लूटूथ सारखी अत्याधुनिक उपकरणे वापरून हा पेपर फोडण्यात आला.
ब) श्रीगोंदा जिल्हा. अहमदनगर : येथे एक उमेदवार परीक्षेदरम्यान पुस्तकात कॉपी करून पेपर सोडविताना आढळून आल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ज्याअर्थी त्याने पुस्तक परीक्षा केंद्राच्या आत नेले त्याअर्थी तलाठी परीक्षा केंद्रांची सुरक्षा व्यवस्था अत्यंत कुचकामी होती.
क) वर्धा : तानिया कॉम्प्युटर लॅब येथील परीक्षा केंद्रातील कर्मचारी परीक्षे दरम्यान लॅपटॉप बराच वेळ केंद्राबाहेर घेऊन गेला आणि नंतर परत केंद्राच्या आत आला. बाहेर गेल्यानंतर त्याने पेपर फोडला नसेल, कोणाला प्रश्न पुरविले नसतील किंवा इतर गैरप्रकार केले नसतील का? केंद्रात आत आल्यानंतर ड्राईव्ह डाऊनलोड करण्यास गेलो होतो असे मोघम उत्तर त्याने दिले. यामुळे परीक्षेच्या पारदर्शकतेवर मोठं प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
ड) अमरावती आणि सांगली FIR अमरावती येथील माधव इन्फोटेक नावाच्या परीक्षा केंद्रांवर पेपर फोडण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या हाय-टेक उपकरणांसह एका उमेदवाराला अटक करण्यात आली. सांगलीत मिरज रत्यावरील परीक्षा केंद्रात, परीक्षेआधीच हाय-टेक उपकरणांसहीत अटक करण्यात आली.
इ) TCS ION परीक्षा केंद्र संभाजीनगर: परीक्षा केंद्रातील पर्यवेक्षक उमेदवारांना रफ शीट द्वारे उत्तरे पुरविताना सापडला, त्याला मदत करणारी सफाई कामगार महिला आणि इतर कर्मचारी सुध्दा यावेळी अटक करण्यात आले. परीक्षेदरम्यान कच्या कामासाठी दिले जाणाऱ्या रफ शीटवर उत्तरे उमेदवारापर्यंत पोचविण्यात येत होत्या. परीक्षेतील प्रश्न बाहेरील स्थळावरून पाठविले जात होते तर त्याची उत्तरे शोधून उमेदवारांना रफ शीटद्वारे पुरविण्यात आली. यातील आरोपी पोलिसांना अनायसेच सापडला, गाडी चोरीच्या आरोपीला पकडायला गेलेल्या पोलिसांनी जेव्हा आरोपीचे मोबाईल चेक केले तेव्हा त्यांना यातील काही गोष्टी आढळून आल्या
असे गैरप्रकार नक्की किती परीक्षा केंद्रावर झाले असतील, किती खासगी परीक्षा केंद्राचे मालक किंवा पर्यवेक्षक विकले गेले असतील? नक्की किती परीक्षा केंद्र मॅनेज झाले असतील किंवा किती शिफ्टचे पेपर फुटले असतील याचा अंदाज न बांधलेला बरा. पण अनेक शिफ्टचे पेपर फुटल्याची आमचा संशय आहे, त्याबाबतचे रफ शीट आणि इतर पुरावे आमच्याकडे आहेत. तलाठी भरतीत मोठा भ्रष्टाचार झाला असून लाखो रुपयांच्या बदल्यात उत्तीर्ण करून देण्याचे आमिष दाखविण्यात आले आहे. तलाठी भरती पारदर्शक पद्धतीने झाली नसल्याने प्रामाणिक उमेदवारांवर अन्याय होणार आहे त्यामुळे तलाठी भरती रद्द करून तत्काळ फेरपरीक्षा घ्यावी अशी आमची मागणी आहे.
पेपरफुटी घोटाळ्यांवर मुंबई उच्च न्यायालयात याचिका
यापैकी प्रत्येक विभागाला स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने मागण्यांचे निवेदन दिलं आहे पण कोणत्याही विभागाने आमच्या मागण्या मान्य न केल्याने स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे अध्यक्ष राहुल कवठेकर आणि आपचे धनंजयजी शिंदे यांनी मिळून अॅड. मनोज पिंगळे व अॅड. मनुजा पिंगळे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. याकामी आम आदमी पक्ष (महाराष्ट्र) उपाध्यक्ष धनंजय शिंदे आणि आपचे राज्यसभा खासदार संजय सिंग, गोपाल इटालिया व टीमचे सहकार्य राहिले आहे. याचिकेत स्पर्धा परीक्षा समन्वय समितीने सर्व पुरावे जोडले असून, विशेष चौकशी समिती (SIT) द्वारे या सर्व घोटाळ्याचा तपास करावा अशी मागणी करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात सद्या अस्तित्वात असलेले पेपरफुटी विरोधी कायदे उदा. युनिव्हर्सिटी अॅक्ट १९८२ आणि आयटी अॅक्ट अनुसार पेपरफुटीच्या गुन्ह्यात जन्मठेपेसारख्या कठोर शिक्षेचे प्रावधान नसल्याने असे काही आरोपी आहेत ज्यांच्य पेपरफुटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत आणि टोळ्या बनवून पेपरफोडी करण्यात येत आहेत. त्यामुळे आहे ते कायदे अजून कठोर करण्यात यावे किंवा राजस्थान, उत्तराखंड राज्यांप्रमाणे कठोर पेपरफुटी कायदे करण्याची विनंती करण्यात आली आहे. मुंबई पोलीस भरती, वन विभाग भरती आणि तलाठी भरतीत प्राथमिक दृष्ट्या घोटाळा झाल्याचे निदर्शनास येत असल्याने SIT चौकशी पूर्ण होईपर्यंत या सर्व भरती प्रक्रियांची यथास्थिती कायम ठेवावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे. SIT तपासात घोटाळा झाल्याचे सिद्ध झाल्यास, अनेक शिफ्टचे पेपर फुटल्याचे समोर आल्यास आणि शेवटच्या आरोपी पर्यंत पोचणे शक्य वाटत नसल्यास या पदभरती रद्द करून नवीन उपाय योजनेसह फेरपरीक्षा घ्याव्या अशी आमची मागणी असेल. फेरपरीक्षा घेताना विशेष सामिती अंतर्गत नवीन उपाययोजना आणि SOP निश्चीत करून TCS ION/IBPS मार्फत परीक्षा घ्याव्या अन्यथा सरसकट सर्व परीक्षा MPSC आयोगामार्फत घ्याव्यात अशी आमची मागणी असेल.
स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचे राहुल कवठेकर (अध्यक्ष), निलेश गायकवाड (सचिव), महेश घरबुडे (कार्याध्यक्ष) रमेश पाटील (सहसचिव), सुरेश साबळे (सहसचिव) यांनी या सर्व भरती प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe