महाराष्ट्र
Trending

तुकडा बंदीचे आदेश रद्द करण्यासाठी 15 दिवसांत न्यायालयाच्या संमतीने निर्णय घेणार ! महसूल मंत्र्यांची विधान परिषदेत मोठी घोषणा !!

पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांची लक्षवेधी

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- तुकडा बंदीचे आदेश रद्द करण्यासाठी 15 दिवसांत न्यायालयाच्या संमतीने सकारात्मक निर्णय घेतला जाईल अशी घोषणा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी आज (दि.23) विधान परिषदेत केली.

शासनाच्या तुकडा बंदी आदेशामुळे वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) परिसरातील सर्वसामान्य नागरिकांची, शेतकर्‍यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यासंदर्भात आज विधान परिषदेत मराठवाडा पदवीधर आमदार सतीश चव्हाण यांनी लक्षवेधी सूचना उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले.

औद्योगिक वसाहतीमुळे वाळूज महानगर (छत्रपती संभाजीनगर) परिसराचा झपाट्याने विकास झाला. वाळूज परिसरातील शेतकरी, खाजगी विकासकांनी स्वत:च्या जमिनीवर प्लॉटींग करून जमिनी विकसित केल्या. नोकरी, व्यवसायानिमित्त आलेल्यांनी वाळूज परिसरात जागा घेऊन घरे बांधली. मात्र 12 जुलै 2021 पासून नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक यांनी तुकडा बंदीचा आदेश लागू केल्याने सर्वसामान्य कामगार, मजूर इत्यादींना हक्काचे घर घेण्याचे व शेतकर्‍यांना जमिनी विकसित करता येत नसल्याचे आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.

या निर्णयाविरोधात परिसरातील शेतकरी, विकासकांनी उच्च न्यायालय, खंडपीठ छत्रपती संभाजीनगर येथे याचिका दाखल केली असता उच्च न्यायालयाने तुकडा बंदीचा आदेश रद्द ठरवून दस्तनोंदणी करण्याचे आदेश दिले असले तरी उच्च न्यायालयाचा आदेश शासनाने अद्यापही मान्य न केल्याने दस्तऐवज नोंदण्या रखडल्या असल्याचे देखील आमदार सतीश चव्हाण यांनी सभागृहात सांगितले. त्यामुळे उच्च न्यायालयाने जो आदेश दिला आहे त्यासंदर्भात किती दिवसात कार्यवाही करणार? असा प्रश्न आमदार सतीश चव्हाण यांनी उपस्थित केला.

राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सदरील तुकडा बंदीचा आदेश रद्द करण्यासंदर्भात येत्या 15 दिवसांत न्यायालयाच्या संमतीने सकारात्मक निर्णय घेऊ असे सभागृहास आश्वस्त केले. या चर्चेत राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादासजी दानवे, आ. एकनाथ खडसे, आ.शशिकांत शिंदे यांनी देखील सहभाग घेतला.

Back to top button
error: Content is protected !!