छत्रपती संभाजीनगर
Trending

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी उर्दू, मोडी लिपीतील नोंदींबाबत जाणकारांची मदत घेण्याचे निर्देश !

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपद्धतीसाठी नेमलेल्या समितीच्या कामकाजात जात नोंदींच्या पुराव्याबाबत सविस्तर चर्चा

संभाजीनगर लाईव्ह, दि.11 :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेली समितीची बैठक आज छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्त कार्यालयात झाली. ‘मराठा कुणबी, कुणबी मराठा’ या जात नोंदींचे सबळ पुरावे ठरणारी कागदपत्रे, पुरावे निश्चित करण्यासंदर्भात या कामकाजात सविस्तर चर्चा झाली. त्याच बरोबर समितीने भूमि अभिलेख विभाग, कारागृह विभाग, नोंदणी विभाग या सर्व विभागांकडील नोंदींबाबतही माहिती घेतली. उर्दू, मोडी लिपीतील नोंदींबाबत संबंधित जाणकारांची मदत घेण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले.

समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) तसेच समितीचे सदस्य सचिव तथा विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड, पोलीस आयुक्त मनोज लोहिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विकास मीना, पोलीस अधीक्षक मनिष कलवानिया, विधी व न्याय विभागाचे सह सचिव सुभाष कराळे, उपसचिव विजय पवार, उपायुक्त जगदीश मिनियार, अपर जिल्हाधिकारी डॉ. अरविंद लोखंडे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते,विभागीय आयुक्त कार्यालयातील विशेष कक्ष प्रमुख शिवाजी शिंदे तसेच विभागातील सर्व जिल्ह्यांचे निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व विभागप्रमुख आदी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी समितीचे अध्यक्ष व सदस्यांचे ग्रामगिता हे पुस्तक देऊन स्वागत करण्यात आले. विभागीय आयुक्त अर्दड यांनी विभागात आतापर्यंत कागदपत्रांच्या तपासणीची माहिती सादर केली तर अपर जिल्हाधिकारी लोखंडे यांनी जिल्ह्यात झालेल्या कागदपत्रे तपासणीची माहिती दिली. त्याच बरोबर समितीने भूमि अभिलेख विभाग, कारागृह विभाग, नोंदणी विभाग या सर्व विभागांकडील नोंदींबाबतही माहिती घेतली.

उर्दू, मोडी लिपीतील नोंदींबाबत संबंधित जाणकारांची मदत घेण्यात यावी, असेही निर्देश देण्यात आले. सकाळच्या सत्रातील कामकाजानंतर जिल्ह्यातील नागरिकांनी त्यांच्याकडील उपलब्ध जुने पुरावे, कागदपत्रे समितीकडे सादर करण्यासाठी वेळ देण्यात आली होती. यावेळी नागरिकांकडील पुरावेही समितीने जाणून घेतले.

Back to top button
error: Content is protected !!