विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: महाविद्यालयांची यादी ३१ मे रोजी प्रसिध्द होणार, क्षमतेपेक्षा जास्त तसेच १५ जूनपूर्वी प्रवेश देण्यास मनाई हुकूम !
विद्यार्थी, पालकांनी मान्यता पाहुनच प्रवेश घ्यावा
संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशासाठी मान्य जागांसह (इनटेक कॅपॅसिटी) यादी ३१ मे रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी तसेच मान्यतेशिवाय जास्त जागांना प्रवेश दिल्यास मान्यता मिळणार नाही, असे आदेश कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी दिले आहेत.
शैक्षणिक विभागाच्यावतीने संलग्नित महाविद्यायांसाठीची सर्व माहिती अद्यवायत करण्यात आली आहे. कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली शैक्षणिक विभागाने संलग्नित महाविद्यालयासंदर्भात विविध निर्णय घेतले आहेत. महाविद्यालयांचे सर्व शुल्क ऑनलाईन पध्दतीने जमा करून घेण्यात येत आहे. अकॅडमिक ऑडिट करून घेण्यात येत आहे. परंपरागत अभ्यासक्रमांच्या चार महाविद्यालयांचे प्रवेशही थांबवण्यात आले.
तसेच विद्यापीठांशी संलग्नित ३३ व्यावसायिक महाविद्यालयांना प्रथम वर्ष प्रवेशासाठी अपात्र ठरविण्यात निर्णय घेण्यात आलाआहे. यामध्ये चार जिल्हयातील बीएड, बीपीएड व विधि शाखेतील महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच अनेक महाविद्यालयांची अनियमितता आढळल्यास आर्थिक दंडही सुनावण्यात आला आहे. गेल्या आठवड्यात संलग्नीत महाविद्यालयाच्या प्राचार्यांना शैक्षणिक विभागाच्यावतीने पत्र पाठविण्यात आले आहे. पत्रात म्हटले आहे की, विद्यापीठाशी शैक्षणिक सत्र २०२२-२३ साठी संलग्नित असलेल्या सर्व महाविद्यालयांची व तेथे सुरु असलेल्या अभ्यासक्रम व त्या अभ्यासक्रमाची प्रवेशक्षमता यासह अंतिम यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेली आहे.
नवीन शैक्षणिक सत्र इथे पंधरा जून पासून सुरू होणार आहे. सन २०२३ -२४ या शैक्षणिक व वर्षासाठी मान्यता प्राप्त महाविद्यालये, अभ्यासक्रम व प्रवेश क्षमता याबद्दलची यादी येत्या ३१ मे रोजी प्रसिद्ध होणार आहे. या संदर्भात विभागाच्या वतीने २४ मे रोजी जाहीर करण्यात आले आहे. यात म्हटले आहे, सर्व संलग्नीत महाविद्यालये, विद्यार्थी व पालक यांना कळविण्यात येते की, शैक्षणिक वर्ष २०२३-२४ साठी या विद्यापीठाशी संलग्नीत महाविद्यालयात पदवी व पदव्यूत्तर अभ्यासक्रमास प्रवेश घेतांना विद्यापीठाद्वारे दि.३१ मे २०२३ रोजी तात्पुरत्या स्वरुपात प्रकाशित होणा-या संलग्नीकरण महाविद्यालये यादीतील संलग्नीत महाविद्यालय व त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता, महाविद्यालयात उपलब्ध पायाभूत सुविधा इत्यादी तपासूनच विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश घ्यावेत. उपरोक्त प्रमाणे यादी तपासून प्रवेश न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही प्रवेश देणा-या संबंधित महाविद्यालय व संबंधित विद्यार्थ्यांवर राहील, याची नोंद घ्यावी.
तसेच सर्व संलग्नीत महाविद्यालयांनी दिनांक ३१ मे २०२३ रोजी तात्पुरत्या स्वरुपात प्रकाशित होणा-या शैक्षणिक वर्ष २०२३-२०२४ साठीच्या संलग्नीकरण महाविद्यालये यादीतील संलग्नीत महाविद्यालय व त्यांचे अभ्यासक्रम, प्रवेश क्षमता इत्यादी तपासून दिनांक १५ जून २०२३ नंतर विद्यार्थ्यांना प्रवेश दयावेत. अतिरिक्त अभ्यासक्रमास किंवा मंजूर प्रवेश क्षमतापेक्षा जास्त प्रवेश दिल्यास त्यास विद्यापीठाद्वारा मान्यता देण्यात येणार नाही. करिता उपरोक्त प्रमाणे यादी तपासून प्रवेश न दिल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी ही संबंधित महाविद्यालयाची राहील याची नोंद घ्यावी, असे कुलसचिव डॉ. भगवान साखळे यांनी म्हटले आहे.
शैक्षणिक गुणवत्तेत तडजोड करणार नाही : मा.कुलगुरु
सन २०२३-२४ शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापुर्वीच ३१ मे रोजी संलग्नित महाविद्यालये, मान्यता प्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशक्षमता याची यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे. क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालयांवर कारवाई केली जाईल, असे कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांनी म्हटले आहे. तसेच पुढील वर्षांची प्रवेशप्रक्रिया, अकॅडमिक कॅलेंडर व परीक्षेचे वेळापत्रकात यांचे तंतोतंत पालन करण्याचा आमचा प्रयत्न आहे . शैक्षणिक गुणवत्तेच्या बाबतीत कसलीही तडजोड केली जाणार नाही असेही ते म्हणाले.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe