राजकारण

उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले ! निवडणूक आयोगाच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप !!

सकाळी सुप्रीम कोर्टाचा फैसला तर सायंकाळी निवडणूक आयोगाचे निकालपत्र

नवी दिल्ली, दि. १७ – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेनेतील उभ्या फुटीवर निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांना मोठा झटका बसला असून शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने दिला आहे.

दरम्यान, आज सकाळीच सुप्रीम कोर्टाने ठाकरे गटाची ७ न्यायमूर्तीच्या मागणीची याचीका फेटाळून लावत ५ न्यायमूर्तींच्या बेंच समोरच खटला सुरु राहणार असल्याचा फैसला दिला होता. मेरीटवर दोघांचाही युक्तीवाद ऐकून घेणार असल्याचा सुप्रीम कोर्टाने आज सकाळीच फैसला दिलेला असताना सायंकाळी निवडणूक आयोगाचा आलेला फैसला ठाकरे गटाला एकाच दिवसात दोन मोठे धक्के मानले जात आहे.

सुप्रीम कोर्टाने यापूर्वीच स्पष्ट केले होते की, निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टातील खटल्यांचा फैसला येण्यापूर्वी निवडणूक आयोगासमोर सुरु असलेल्या खटल्याच्या निर्णयाला रोक लावावी, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली होती. मात्र, ही मागणी यापूर्वीच अमान्य करण्यात आली होती.

दरम्यान, आज सायंकाळच्या सुमारास निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या दाव्यावर अंतिम निकाल दिला. हे निकालपत्र सुमारे ७८ पानांचं असल्याचं सांगण्यात येत आहे. शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय या निकालपत्राद्वारे देण्यात आला आहे. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर शिंदे गटाचे आमदार सूरत, गुवाहाटी फिरून पुन्हा महाराष्ट्रात आले. या दरम्यान, ठाकरे गट आणि शिंदे गटांचे कार्यकर्ते आमने सामने आले होते. रोज शाब्दीक युद्ध झडत होतं. खरी शिवसेना आमचीच असा दावा दोन्ही गटांकडून केला जात होता. त्यानंतर शिवसेना पक्ष हे नाव व धनुष्यबाणावर शिंदे आणि ठाकरे गटांनी दावा सांगितला.

दोन्ही गटांनी निवडणूक आयोगाकडे लाखोंनी कागदपत्रे सादर करून खरी शिवसेना आमचीच असा दावा, युक्तीवाद करण्यात आला. शपथपत्र दाखल करण्यात आले. दोन्ही बाजुंची कागदपत्र, युक्तीवाद ऐकून निवडणूक आयोगाने आज अंतिम निकाल दिला. उद्धव ठाकरेंच्या हातातून शिवसेना निसटली असून धनुष्यबाण हे चिन्हही एकनाथ शिंदे यांना या निकालपत्राने मिळाले आहे. दरम्यान, निवडणूक आयोगाच्या या निकालाला आव्हान देण्यात येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या वतीने देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!