राजकारण
Trending

राष्ट्रवादीतील बंडानंतर अजितदादा गट प्रथमच शरद पवारांच्या चरणी ! प्रफुल्ल पटेल म्हणाले, सर्वांनी पाय पडून आशीर्वाद घेतले, पहा काय झाले बैठकीत !!

मुंबई, दि. १६ – अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील नऊ आमदारांनी बंडाचा झेडा फडकवून भाजपा व शिंदे सेनेसोबत घरोबा करून मंत्रीपदाची शपथ घेतल्यानं संपूर्ण महाराष्ट्रात एकच खळबळ उडवून दिली. त्यानंतर जे काही आरोप-प्रत्यारोप झाले ते उभ्या महाराष्ट्राने पाहिले. सत्तेत सहभागी झाल्यानंतर अजित पवार गटाने आज प्रथमच शरद पवार यांची भेट घेऊन झाल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त करून पक्ष एकसंघ राहण्यासाठी यातून मार्ग काढा अशी गळ घातली. अजित पवार गटाच्या विनंतीवर शरद पवार यांनी मात्र त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. सुमारे एक तास ही बैठक झाली. आम्हाला सांभाळून घ्या असाच सूर काहीसा अजित पवार समर्थकांचा होता. मात्र, शरद पवारांनी यावर कुठलाही प्रतिसाद दिला नाही.

अजित पवार गटातील आमदार व नेत्यांनी आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांची यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठाण येथे भेट घेतली. अचानक झालेल्या या भेटीमागे राजकीय गोटात एकच चर्चा होत आहे. शरद पवारांसह कोणालाही विश्वासान न घेता अजित पवार समर्थक आमदारांनी पक्षाची ध्येय धोरणे बाजूला ठेवून भाजपा व शिवसेनेत सत्तेत सहभागी होवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला.

दरम्यान, तब्बल दोन आठवड्यानंतर अजित पवार समर्थक गटाने शरद पवार यांची भेट घेऊन आशीर्वाद घेतला. पक्ष एकत्र राहावा, अशी विनंती शरद पवार यांच्याकडे केली. जवळपास एक तास ही बैठक चालली. अजित पवार, प्रफुल्ल पटेल, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आदी नेते या बैठकील होते.

सर्वांनी पाय पडून आशीर्वाद घेतले- प्रफुल्ल पटेल
सर्वांनी पाय पडून आशीर्वाद घेतले. पवार साहेबांनी सर्वांनी विनंती केली. आमच्या सगळ्यांच्या मनात आदर तर आहेच पण पक्ष एकसंघ राहू शकतो यासाठी त्यांनी योग्य विचार करावा, अशी आम्ही सर्वांनी शरद पवार यांच्याकडे मागणी केली असल्याचे प्रफुल्ल पटेल यांनी प्रसार माध्यमांना सांगितले.

शपथ घेतलेल्या सर्व मंत्र्यांनी दिलगीरी व्यक्त करून मार्ग काढण्याची विनंती केली- जयंत पाटील
शपथ घेतलेले सर्व मंत्री व विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला उपस्थित होते. त्यांनी पवार यांच्याकडे दिलगीरी व्यक्त केली. यातून काहीतरी मार्ग काढा अशी विनंती केली. मात्र, शरद पवार यांनी त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

Back to top button
error: Content is protected !!