छत्रपती संभाजीनगर
Trending

निर्दयी पित्याने पोटच्या दोन लेकरांना विहिरीत फेकले, एकाचा मृत्यू ! पत्नी नांदत नसल्याने उचलले टोकाचे पाऊल, छत्रपती संभाजीनगरातील खळबळजनक घटना !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- पत्नी सोबत राहत नसल्याने व सासरची मंडळी आणून घालत नसल्याने त्याने चक्क पोटच्या दोन लेकरांनाच विहिरीत फेकून दिले. एका मुलाला वाचवण्यात यश आले मात्र, एका मुलाचा यात मृत्यू झाला. ही घटना छत्रपती संभाजीनगर शहरातील चिकलठाणा परिसरात रात्रीच्या सुमारास घडली. निर्दयी पित्याने आपल्या पोटच्या मुलाला विहिरीत फेकल्याने परिसरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. मुलांना विहीरीत फेकल्यानंतर परिसरातील लोकांनी त्या निर्दयी पित्याला लोकांनी पकडले होते.

शिवम भोसले (वय 8वर्षे) आणि श्रेयस भोसले (वय 4) या दोन मुलांना विहीरीत फेकले. यातील श्रेयस याचा या दुर्दवी घटनेत मृत्यू झाला. राजु प्रकाश भोसले (वय 34 वर्षे) असे आरोपीचे नाव आहे.

गणेश प्रकाश भोसले (वय 27 धंदा-मार्कटींग रा चौधरी कॉलनी, चिकलठाणा छत्रपती संभाजीनगर) यांनी पोलिसांना दिलेली प्राथमिक माहिती अशी की, आई-वडील पत्नी तसेच भाऊ राजु व त्याचे दोन मुले शिवम वय 8वर्ष आणि श्रेयस वय 4 वर्ष असे एकत्र राहतात. गणेश प्रकाश भोसले हा मार्कटींगचे काम करतो व भाऊ राजु हा वेल्डींगचे काम करतो.

राजु व त्याच्या पत्नीचे दारूवरून नेहमी भांडण होत असे. गणेश प्रकाश भोसले यांनी त्यांना अनेक वेळा समजावून देखील सांगितले होते. परंतु भाऊ राजू त्याची पत्नी व आई वडील याचेशी भांडण करीत होता. त्याची पत्नी यास कंटाळून मागील तीन महिन्यांपासून तिच्या माहेरी विष्णुपुरी, नांदेड येथे राहत आहे. त्याची पत्नी माहेरी गेल्यानंतर देखील राजू आईवडीला सोबत भांडण करत असायचा. तसेच गणेश प्रकाश भोसले यांच्या फोनवरुन त्याच्या सासरी फोन करून सासरच्या लोकांना शिवीगाळ करुन “तुम्ही माझ्या पत्नीला माझ्याकडे आणून घाला नाहीतर मी माझ्या दोन्ही मुलांचे बरेवाईट करीन “अशी धमकी देत असे.

दि. 28/04/2023 रोजी रात्री 07.40 वाजेच्या सुमारास गणेश प्रकाश भोसले हे रात्री घरी असताना त्यांना मोबाईवर कॉल आला की “राजू भाऊने त्याच्या पोरांना विहिरीत टाकले तुम्ही महादेव मंदीराकडे लवकर या.” त्यानंतर गणेश प्रकाश भोसले हे  धावत मंदिराकडे जात असताना मंदिरांच्या अलीकडेच भाऊ राजु यास लोकांनी पकडून ठेवले होते व बाजुच्या विहीरीमध्ये राजुने त्याच्या दोन्ही मुलांना टाकल्याचे सांगत होते.

गणेश प्रकाश भोसले हे विहीरीकडे गेले असता राजु यांचा मोठा मुलगा शिवम यास विहीरीतून बाहेर काढलेले होते व लहान मुलगा श्रेयस यास फायरबिगड कर्मचारी विहीरीत शोध घेण्याचे काम चालु होते. त्यावेळी गणेश प्रकाश भोसले यांनी शिवम यास विचारले असता त्याने सांगितले की “माझे पप्पा मला व श्रेयसला फिरायला घेउन जातो असे सांगून इकडे घेऊन आले. विहीरीजवळ आल्यावर पप्पांनी श्रेयसला विहीरीत फेकून दिले व त्यांनंतर आरडाओरडा करत असताना मला सुध्दा विहिरीत टाकले आमचा आवाज ऐकून आजुबाजुचे लोक तेथे येवून मला बाहेर काढले. परंतु माझा भाऊ खाली गेल्याने त्याला बाहेर काढु शकले नाहीत.

“त्यानंतर शिवम यास तेथील काही मुले घरी घेऊन गेले होते. त्यानंतर काही वळेने फायर ब्रिगेडच्या कर्मचान्यांनी श्रेयसला बाहेर काढले. तो बेशुध्द अवस्थेत असल्याने त्यास गणेश प्रकाश भोसले यांनी रिक्षाने घाटीत उपचारसाठी दाखल केले. तेथे डॉक्टरांनी श्रेयस यास तापासून 22.30वाजता मृत घोषित केले.

याप्रकरणी गणेश प्रकाश भोसले यांनी दिलेल्या तक्रारीवरून राजु प्रकाश भोसले (वय 34 वर्षे) याच्यावर एमआईडीसी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढीत तपास पोलिस करत आहेत.

Back to top button
error: Content is protected !!