महाराष्ट्र

पतंग उडवा पण, जरा जपून ! धातूमिश्रित मांजा ठरू शकतो घातक !!

वीजेच्या तारांपासून दूर राहण्याचे महावितरणचे आवाहन

नांदेड दि.10 जानेवारी : मकर संक्रात सण आणि पंतगबाजीचे अनोखे नाते आहे. हा सण जसा जवळ येऊ लागतो तसे बालगोपालांना आणि मोठ्यांनाही वेध लागतात ते पतंगाचे. रंगीबेरंगी विविध आकारातील पतंग उडविणे हा एक वेगळाच आनंद असतो. मात्र या आनंदाच्या भरात आपण सुरक्षीततेकडे दुर्लक्ष करतो. पतंगोत्सव साजरा करताना उत्साहाच्या भरात निष्काळजीपणामुळे आपणास प्रसंगी जीव ही गमवावा लागू शकतो याचे भान राहत नाही. त्यामुळेच पतंग उडविताना पतंग, पतंगाचा मांजा वीज वाहिन्या, रोहीत्र यांच्या संपर्कात आल्याने काही दुर्घटना घडण्याची शक्यता असते. त्यामुळे पतंग उडविताना वीज यंत्रणेपासून  सावधगिरी बाळगावी असे आवाहन महावितरणने केले आहे.

पतंग उडविताना अपघात घडल्याच्या घटना बातम्यांच्या स्वरुपात आपण दरवर्षी वाचतो. शहरी भागात अपुऱ्या जागे अभावी घराच्या छतावर पतंग उडविताना अनेक जण आपल्याला दिसतात.

मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇

https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne

पतंग उडविण्याच्या नादात आपल्या घराच्या परिसरातील वीजतारांचाही विसर पडतो आणि खबरदारी न घेतल्यामुळे अपघातही होतो. त्याचबरोबर युवकांच्यात वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचीही जणू स्पर्धाच लागलेली असते. अशावेळी शॉक लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वीजतारांमध्ये अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करू नये.

वीजतारांमध्ये अडकलेल्या पतंगाचा मांजा खाली जमिनीवर लोंबकळत असतो, हा मांजा ओढून पतंग काढण्याच्या प्रयत्नात एका तारेवर दुसऱ्या तारेचे घर्षण होवून शॉटसर्किट होण्याची शक्यता असते. त्यामुळे संबंधित परिसरात वीजपुरवठा खंडीत होण्याबरोबरच, त्या व्यक्तीचा शॉक लागून प्राणांकीत अपघात होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे संक्राती सारख्या आनंददायी सणाला गालबोट लागू नये याकरिता योग्य खबरदारी घेवूनच पतंग उडवण्याचा आनंद घ्यावा.

त्यासाठी मोकळ्या जागेतच पतंग उडवावेत. तातडीच्या मदतीची संभाव्य गरज लागल्यास, नजिकच्या महावितरणच्या कार्यालयाशी किंवा चोवीस तास सुरु असणाऱ्या कॉल सेंटरच्या १९१२, १८००-२३३-३४३५ आणि १८००-२१२-३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

धातूमिश्रित  मांजा  ठरू  शकतो  घातक

सध्या बाजारात धातूमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातूमिश्रित रसायनाचे कोटिंग केलेले असते. असा मांजा वीजेच्या तारेत अडकल्यास त्यामधून वीज प्रवाह पतंग उडविणाऱ्या व्यक्ती पर्यंत पोहचून अपघात होण्याची  शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर पक्षी त्यामधे अडकून जखमी होतात. त्यामुळे धातूमिश्रित मांजा न वापरता काळजी घेऊन सर्वांनी सुरक्षितपणे पतंगोत्सव साजरा करावा. –धनंजय पवार, जनसंपर्क अधिकारी, नांदेड परिमंडळ 

हे लक्षात ठेवा…

1.विजेच्या तारांवर अडकलेले पतंग काढणे जीवघेणे ठरू शकते.

2.तारांमध्ये अडकलेला मांजा ओढू नये.

3.वीजतारा असलेल्या परिसरात पतंग उडविणे टाळा.

4.तारात अडकलेली पतंग काढण्यासाठी दगडाला दोरा बांधून तारांवर फेकू नये.

Back to top button
error: Content is protected !!