छत्रपती संभाजीनगर
Trending

कचनेरच्या जैन मंदिरातून एक कोटीची सोन्याची मूर्ती चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! कटरने मूर्तीचे तुकडे करून काही तुकडे भोपोळच्या सराफास विकल्याची कबुली !

संभाजीनगर लाईव्ह, द्. २६ –  कचनेर येथील मंदिरातून ०१ कोटी ०५ लाख रुपये किंमतीची सोन्याची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती बदलून चोरून नेणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडून २४ तासांच्या आत पर्दाफाश करण्यात आला. ९४,८७,७९७/- रुपये किंमतीचा मुद्येमाल पोलिसांनी हस्तगत केला. दरम्यान, चोरलेल्या सुवर्ण धातूच्या मूर्तीचे इलेक्ट्रीक कटर व हातोडयाच्या सहाय्याने तुकडे केले असून त्यापैकी काही तुकडे हे भोपाळ राज्य मध्यप्रदेश येथील सराफास विक्री केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.

दिनांक २५/१२/२०२२ रोजी विनोद रुपचंद लोहाडे (वय ५६ वर्षे, व्यवसाय व्यापार रा. रामतारा हौसींग सोसायटी, शहानुरमियाँ दर्गा) यांनी पोलीस ठाणे चिकलठाणा येथे फिर्याद दिली की, दिनांक ०८ / १२ / २०२२ रोजी दुपारी एक वाजता ते दिनांक २३/ १२ / २०२२ रोजी रात्री नऊ वाजेच्या दरम्यान कचनेर येथील श्री १००८ चिंतामणी पार्श्वनाथ दिगांबर जैन मंदिराच्या गाभाऱ्यातील पार्श्वनाथ भगवंताची १,०५,००,०००/- ( एक कोटी पाच लाख) रुपये किंमतीची ०२ किलो ५६ ग्रॅम वजनाची सुवर्ण धातूची मूर्ती  चोरटयाने चोरुन त्याठिकाणी पार्श्वनाथ भगवंताची पिताळाची मूर्ती ठेवली. मुख्य सुवर्ण धातूची मुर्ती चोरुन नेली. या फिर्यादीवरुन पोलीस ठाणे चिकलठाण येथे गुन्हा दाखल आहे.

या गुन्हयाची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक मनीष कलवानीया यांनी सदर गुन्हयाचे घटनास्थळास भेट देऊन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गुन्हयाच्या तपासकामी सूचना व मार्गदर्शन केले. त्यांनी केलेल्या मार्गदर्शनाप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक सदर गुन्हयाचा समांतर तपास करीत असताना त्यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून व तांत्रीक विश्लेषणावरून खात्रीलायक माहिती मिळाली की, सदरचा गुन्हा हा आरोपी अर्पित नरेंद्र जैन (रा. शिवपुरी जि. गुणा राज्य मध्यप्रदेश), अनिल भवानीदिन विश्वकर्मा (रा. शहागड जि. सागर राज्य मध्यप्रदेश) यांनी केलेला आहे.

ही खात्रीलायक माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपींचा मध्य प्रदेश राज्यात जाऊन शोध घेतला. अर्पित नरेंद्र जैन व अनिल भवानीदिन विश्वकर्मा हे मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत व गुन्हयातील गेल्या मालाबाबत विश्वासात घेऊन विचारपुस केली असता आरोपीतांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली.

सदर गुन्हयातील चोरलेल्या सुवर्ण धातूच्या मूर्तीचे इलेक्ट्रीक कटर व हातोडयाच्या सहाय्याने तुकडे केले असून त्यापैकी काही तुकडे हे भोपाळ राज्य मध्यप्रदेश येथील सराफास विक्री केले आहे व आलेल्या पैशातून सोन्याचे दोन शिक्के खरेदी केले. काही रक्कम कर्ज फेडण्यासाठी दिल्याची कबुली दिली.

उर्वरित मूर्तीचे ८७,५६,१९५/- रुपये किंमतीचे १६०४.९८ ग्रॅम सोन्याचे तुकडे, ६,२९,३०२/- रुपये किंमतीचे सोन्याचे १०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट, ०२ ग्रॅम वजनाचे व ०१ ग्रॅम वजनाचे सोच्याचे दोन शिक्के असे एकूण १७०६.९८ ग्रॅम सोने एकूण किंमत ९३,८५,४९७/- रुपये व ७०,०००/- रुपये रोख रक्कम, ३२,३००/- रुपये किंमतीचे दोन मोबाईल हॅन्डसेट व सुवर्ण मूर्तीचे तुकडे करण्यासाठी वापरलेले एक इलेक्ट्रीक कटर, ०३ लहान मोठ्या हातोडया, ०१ लोखंडी पकड, ०१ व्हेक्सा ब्लेड कटर, ०१ छोटा इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा मुद्येमाल एकूण ९४,८७,७९७/ रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

आरोपीतांना सदर गुन्हयाच्या पुढील तपासकामी पोलीस ठाणे चिकलठाणा पोलीसांच्या ताब्यात दिले असून सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस ठाणे चिकलठाणा करीत आहेत. ही कामगिरी पोलीस अधीक्षक मनिष कलवानीया यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी, उप विभाग औरंगाबाद ग्रामीण जयदत्त भवर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर रेंगे, देविदास गात, पोउपनि प्रदीप ठूबे, विजय जाधव, पोह लहू थोटे, श्रीमंत भालेराव, पोना शेख नदीम, पोकॉ राहूल गायकवाड, योगेश तरमाळे, जीवन घोलप यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!