महाराष्ट्र

अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्यास शासनाची मान्यता ! शासन निर्णय जारी, जाणून घ्या अटी !!

समायोजन करतांना विहीत बिंदुनामावलीनुसार आरक्षण
  • रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांवर सेवा जेष्ठतेनुसार समायोजन करावे. समायोजन करतांना विहीत बिंदुनामावलीनुसार आरक्षण, विषय इ. बाबींच्या सर्वसाधारण नियमांचे पालन करुन समायोजन करण्यात यावे.

संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – सन २०२२-२३ च्या संचमान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. यासंदर्भातील शासन निर्णय आजच जारी करण्यात आला.

राज्यातील खाजगी अनुदानित प्राथमिक/माध्यमिक व उच्च माध्यमिक अंशत: अनुदानित शाळामध्ये विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे वैयक्तिक मान्यता प्राप्त शिक्षकांचे पद कमी झाल्यास त्यांची सेवा समाप्त करण्यात येते. अशा सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे सद्यस्थिती असलेल्या नियमानुसार समायोजन करण्यात येत नाही. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन करण्याची मागणी लोकप्रतिनिधी व शिक्षक संघटना यांच्याकडून वारंवार करण्यात येत होती. त्यामुळे राज्यातील वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांना पुन्हा सेवेची संधी देणेसाठी समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित पदे रिक्त असल्यास अशा रिक्त पदावर समायोजनाबाबत तरतूद करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

असा आहे लेटेस्ट शासन निर्णय :-

सन २०२२-२३ च्या संचामान्यतेनुसार पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांचे समायोजन खालील अटी व शर्तीच्या अधीन राहून करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे.

१. आयुक्त (शिक्षण), यांच्या स्तरावर प्रथम राज्यातील रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदाचा आढावा घेण्यात यावा.

२. आढाव्याअंती राज्यात अंशत: अनुदानित पदे रिक्त राहात असल्याचे निदर्शनास आल्यास अशा पदांची यादी तयार करावी. सदर रिक्त पदांवर पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या शिक्षकांचे समायोजन पुढील प्रमाणे करावे. :-

अ. सन २०२२-२३ च्या संचमान्यतेमध्ये पद कमी झाल्याने सेवा समाप्त होणाऱ्या वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित शिक्षकांची जेष्ठता सूची आयुक्त (शिक्षण) यांनी तयार करावी.

आ. तद्नंतर रिक्त असलेल्या अंशत: अनुदानित पदांवर सेवा जेष्ठतेनुसार समायोजन करावे. समायोजन करतांना विहीत बिंदुनामावलीनुसार आरक्षण, विषय इ. बाबींच्या सर्वसाधारण नियमांचे पालन करुन समायोजन करण्यात यावे.

इ. वैयक्तिक मान्यता प्राप्त अंशत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे समायोजन केवळ अनुदानाच्या समान टप्यावर पद उपलब्ध असल्यास अनुज्ञेय राहील. मात्र अनुदानाच्या टप्प्याचे पद उपलब्ध नसल्यास सदर कर्मचाऱ्यांचे समायोजन कुठल्याही परिस्थितीत करता येणार नाही.

ई. वैयक्तिक मान्यता प्राप्त अशंत: अनुदानित कर्मचाऱ्यांचे प्रथम संस्थेतर्गत समान अनुदान टप्यावरील रिक्त पद उपलब्ध असल्यास समायोजन करण्यास प्राधान्य द्यावे. पद उपलब्ध नसल्यास इतर संस्थेच्या अनुदानाच्या समान टप्प्यावरील अंशत: अनुदानित पदावर समायोजन करावे. अशा प्रकारे समान टप्प्यावर पद उपलब्ध नसल्यास समायोजन करता येणार नाही व कुठल्याही परिस्थितीत अनुदानाचा टप्पा बदलून समायोजन करता येणार नाही.

Back to top button
error: Content is protected !!