महाराष्ट्र
Trending

जुन्या पेन्शन योजनेमुळे काही राज्य अडचणीत येणार ? देवेंद्र फडणवीसांच्या अंगझटकू दाव्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम !!

जुन्या निवृत्तीवेतन योजनेबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक- देवेंद्र फडणवीस

मुंबई, दि. 10 : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितले. दरम्यान, ज्या राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केली आहे ते राज्य भविष्यात कसे अडचणीत येतील यासंदर्भातील आकडेवारी सांगून एकप्रकारे महाराष्ट्र ही जुनी पेन्शन योजना लागू करू शकत नाही, असेच अप्रत्यक्ष फडणवीस यांनी आज संंकेत दिले. सकारात्मक असा सरकारी शब्द वापरून मधला मार्ग काढण्यासाठी चर्चा करू, असेही फडणवीस म्हणाले. यामुळे आंदोलनाची हाक दिलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

विधान परिषद सदस्य कपिल पाटील यांनी यासंदर्भात नियम 97 अन्वये उपस्थित केलेल्या अल्पकालीन चर्चेला उपमुख्यमंत्री फडणवीस उत्तर देत होते. फडणवीस म्हणाले की, लोककल्याणकारी राज्यात समाजातील सर्व घटकांचा विचार करून विविध योजना राबविण्यासाठी अर्थव्यवस्था योग्य राखणे आवश्यक आहे.

2005 साली तेव्हाची परिस्थिती विचारात घेऊन नवीन निवृत्ती योजना लागू करण्याचा जाणीवपूर्वक निर्णय घेण्यात आला होता. सध्या राज्याचा अत्यावश्यक खर्च अर्थव्यवस्थेच्या 56 टक्के असून वेतन, निवृत्ती वेतन आणि कर्जावरील व्याजावर होणारा हा खर्च मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. आता जुनी निवृत्तीवेतन योजना पुन्हा लागू केल्यास याचे अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम दिसून येतील.

जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबतचा निर्णय विचारपूर्वक घेणे गरजेचे आहे. याअनुषंगाने कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेण्याची शासनाची तयारी असून सर्वांनी एकत्र येऊन याबाबत मार्ग काढणे आवश्यक आहे. त्यामुळे विरोधी पक्षनेते आणि कर्मचारी संघटनांसमवेत चर्चा करण्यासाठी बैठक घेऊन प्रश्न सोडविण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचे उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी यासंदर्भातील अल्पकालीन चर्चेच्या उत्तरात सांगितले.

Back to top button
error: Content is protected !!