सिल्लोड
Trending

सरपंच पती व उपसरपंचास १ लाखाची लाच घेताना रंगेहात पकडले ! सिल्लोड तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायतमधील अनागोंदी चव्हाट्यावर, लिपीकाच्या भरतीसाठी लाच घेतली !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- लिपीकाची नौकरी लावून देतो त्यासाठी तुझ्या बाजुने ठरावही घेतो अशी थाप मारून सरपंच पती व उपसरपंचास १ लाखाची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज ही कारवाई केली. या कारवाईमुळे सिल्लोड तालुक्यातील केळगाव ग्रामपंचायतमधील अनागोंदी चव्हाट्यावर आली आहे.

अशोक राजाराम वाघमोडे (ग्रुप ग्रामपंचायत केळगाव, सरपंच यांचे पती, ता. सिल्लोड), बबन रामसिंग चव्हाण (उपसरपंच, ग्रुप ग्रामपंचायत, केळगाव, ता. सिल्लोड, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी आरोपींची नावे आहेत.

यातील तक्रारदार यांना वसुली कारकून म्हणुन कामावर ठेवणे बाबत ग्रामपंचायत ने ठराव केला व त्यानंतर सहा महिने उपरान्त त्यांना कायम करतांना रुपये 50,000/- घेतले. तदनंतर पंचायत समिती मार्फत तक्रारदार कायम होवून पगार सुरू झाला, तेव्हा ग्रामपंचायत मधे लिपीक व वसुली कारकून यांचेपैकी एकच पद भरता येणार होते.

ही माहिती आरोपी उपसरपंच बबन चव्हाण व सरपंच यांचे पती अशोक वाघमोडे यांना समजल्याने त्या दोघांनी मिळून तक्रारदार यास आम्हास लिपीक पदासाठी एकाने तीन लाख रुपये दिले आहे, तेव्हा तू आम्हास तीन लाख रुपये दे नाहीतर आम्ही पुन्हा तुझ्याविरूद्ध ठराव घेवून तुला काढून त्या ऐवजी लिपीक म्हणून त्यास भरती करू. यासाठी 3,00,000/- रुपये लाचेची मागणी केली होती. तक्रारदार यास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती.

तक्रारीनुसार लाच मागणी पडताळणी अंती दोन लाख लाच रक्कम ठरली व त्यापैकी लगेच एक लाख रुपये पंचासमक्ष घेताना आरोपी उप सरपंच बबन चव्हाण व सरपंच यांचे पती अशोक वाघमोडे यांना ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी सिल्लोड ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, राजीव तळेकर, पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी:- राहुल फुला, पोलीस निरीक्षक, सहायक अधिकारी – संतोष घोडके, पोलिस निरीक्षक, सापळा पथक – पोअं/ रविंद्र काळे, राजेंद्र सिनकर, शिरीष वाघ, चालक चंद्रकांत शिंदे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!