महाराष्ट्र
Trending

जालना महानगरपालिकेतील लिपिक लाच घेताना चतुर्भुज ! घराच्या कागदपत्रांची नक्कल काढून देण्यासाठी घेतले ८०० रुपये !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- घराच्या रिव्हीजन रजिस्टरची नक्कल काढून देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेताना जालना महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात आले. सुरुवातीला एक हजाराची मागणी करून नंतर 800 रुपयांवर तडजोड झाली. जालना महानगरपालिकेतच लाच घेताना त्यास रंगेहात पकडल्याने सरकारी वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे.

नदीम अब्दुल रहेमान चौधरी (वय 33 वर्षे, पद – फायरमन/कनिष्ठ लिपिक, वर्ग – 4, महानगरपालिका कार्यालय, जालना. रा. खडकपुरा मानवत जि. परभणी) असे आरोपीचे नाव आहे. यातील तक्रारदार यांनी त्यांचे पणजोबाच्या नावावरील बडीसडक जवळील घराचे रिव्हीजन रजिस्टरची नक्कल काढून देण्यासाठी अर्ज दिला होता. त्यावरून आरोपी नदीम चौधरी याने त्यांना 1,000/- रूपये लाचेची मागणी केली होती. त्याअनुषंगाने लाच मागणी पडताळणी कारवाई दरम्यान आरोपी नदीम चौधरी याने पंचासमक्ष महानगरपालिका कार्यालय, जालना येथे तक्रारदाराला 1,000/- रुपये लाच मागणी करून तडजोडअंती 800 रुपये स्वीकारण्याचे मान्य केले.

सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी नदीम चौधरी यास महानगरपालिका कार्यालय, जालना येथे पंचासमक्ष लाचेची रक्कम 800 रुपये स्वीकारतांना रंगेहाथ पकडले. आरोपी नदीम चौधरी यांचेकडून 800 रुपये लाचेची रक्कम पंचासमक्ष जप्त करण्यात आली आहे. सदर आरोपी नदीम चौधरी यास ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी पोलीस ठाणे कदीम जालना (जि. जालना) येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई संदीप आटोळे, पोलीस अधीक्षक, विशाल खांबे, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. छत्रपती संभाजीनगर, किरण बिडवे, पोलीस उपअधीक्षक, अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो जालना यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी – सुजित बडे, पोलीस निरीक्षक, सापळा पथक – गणेश चेके, जावेद शेख, गजानन खरात, शिवलिंग खुळे यांनी पार पाडली.

Back to top button
error: Content is protected !!