महाराष्ट्र
Trending

किल्लारीच्या विनाशकारी भूकंपाला धैर्याने तोंड दिले, ४८ तास न झोपता काम केले ! दिवसभर काम करून थकलेल्या कलेक्टरने बैलगाडीवरच अंग टाकले, तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवारांनी कटू अनुभव केले कथन !!

लातूर, दि. १ –किल्लारीच्या विनाशकारी भूकंपाला ३० वर्षे पूर्ण झाली. ४८ तास न झोपता काम केले. यंत्रणाही धावून आली. दिवसभर कष्ट करून रात्री दोन अडीचच्या दरम्यान २-३ तासांचा आराम करण्यासाठी कलेक्टरने बैलगाडीवर अंग टाकले होते. या विनाशकारी भूकंपाला धैर्याने केसे तोंड दिले होते याचा अनुभव कथन ज्यष्ठ नेते तथा त्यावेळचे मुख्यमंत्री शरद पवार यांनी केला. निमित्त होते भूकंपग्रस्त कृती समिती आयोजित कृतज्ञता सोळ्याचे. या सोहळ्यात शरद पवारांचा गौरव करण्यात आला.  उद्ध्वस्त गावांचे पुनर्वसन व ऐनवेळी आलेल्या महाविनाशकारी संकटाला कसे समोरे जावे, यासंदर्भात शरद पवार यांनी “Disaster Management plan” यावरील अनुभव कथक केले. त्यांनी केलेले भाषण त्यांच्याच शब्दात…

आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि या संकटाच्या कालावधीत लातूर जिल्ह्याची जिल्हा परिषदेची जबाबदारी ज्यांनी खांद्यावर घेऊन अहोरात्र कष्ट केले ते दिलीपराव देशमुख, राज्याच्या विधिमंडळाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, राज्य सरकारचे मंत्रिमंडळाचे लातूरचे प्रतिनिधी संजय बनसोडे, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार ओमराजे, आमचे सहकारी जीवनराव भोजे, राजेश टोपे, बसवराज पाटील, कैलास पाटील, राहुल मोरे, वैजनाथ शिंदे या ठिकाणी अगत्याने उपस्थित असलेले माजी खासदार गोपाळराव पाटील, अन्य सर्व सहकारी आणि बंधू-भगिनींनो…!

झोपायला गेलो आणि तेवढ्यात माझ्या घराच्या खिडक्या हल्ल्यात, घरातले सामान हलले- आजचा दिवस हा एक प्रकारे अस्वस्थ करणारा दिवस आहे. राज्याचा मुख्यमंत्री किंवा गृहमंत्र्यांवर राज्याच्या अनेक जबाबदाऱ्या असतात त्यातली एक महत्त्वाची जबाबदारी म्हणजे गणपती विसर्जनाच्या दिवशी शेवटचा गणपती गेल्याशिवाय त्यांना विश्रांती घेता येत नाही. आणि त्या ३० तारखेला प्रत्येक जिल्ह्याचे कलेक्टर आणि डीएसपी यांसोबत संपर्क साधत होतो. तुमच्या मिरवणुका संपल्या की नाही ? शांततेत झाल्या की नाही ? कुठे काही प्रश्न आहे का ? आणि जवळपास सर्वत्र स्थिती चांगली होती, फक्त परभणीमध्ये काही विलंब झाला, मी परभणीच्या डी एस पी यांच्याशी संपर्क जोडत होतो आणि शेवटी पावणे चार-चारच्या सुमाराला परभणीच्या डी एस पी यांनी सांगितले की, आमच्या गणपतींचे विसर्जन झाले. मग मी ठरवले की, आता आपण विश्रांती घ्यायला काही हरकत नाही, झोपायला गेलो आणि तेवढ्यात माझ्या घराच्या खिडक्या हल्ल्यात, घरातले सामान हलले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, हे सर्व भूकंपाशिवाय शक्य नाही आणि भूकंप म्हटला की, महाराष्ट्रातले कोयनेचे गाव आठवते, कोयनेला भूकंप झाला होता मोठे नुकसान झाले होते, कोयनेला भूकंपासंदर्भात माहिती देणारे केंद्र हे महाराष्ट्र सरकारने स्थापन केले होते, तिथे मी फोन केला आणि विचारणा केली असता भूकंप झाला याची नोंद तुमच्याकडे आहे का ? तिथून समजलं की आमच्याकडे भूकंप झालेला नाही, मग भूकंप झाला कुठे ? तेव्हा त्यांनी भूकंप नोंदणी केंद्रांची संपूर्ण सखोल माहिती घेतली आणि सांगितले की, लातूर जिल्ह्यातील किल्लारी हा भूकंपाचा मुख्य केंद्रबिंदू आहे आणि भूकंप तिथे झालेला आहे.

आयुष्यात असे संकट कधी पाहू नये अशी स्थिती तेव्हा मी किल्लारीत पाहिली होती- मी काहीही विचार न करता माझ्या अधिकाऱ्यांना उठवून सांगितले की, विलासराव देशमुख साहेब, पद्मसिंह पाटील साहेब या दोघांना संपर्क करा, मुख्य सचिवांना संपर्क करा आणि त्यांना सांगा की, सकाळी ६ वाजता मला विमान पाहिजे आणि विमानांमधून मला लातूरला जायचे आहे आणि आम्ही सर्व सुदैवाने इथे पोहोचलो. किल्लारीत आलो, गावात जाताना भयानक परिस्थिती होती. घरे उध्वस्त झालीत, शेती उध्वस्त झाल्या होत्या, काही लोक मृत अवस्थेत पडली होती तर काही रडत होती. आयुष्यात असे संकट कधी पाहू नये अशी स्थिती तेव्हा मी किल्लारीत पाहिली होती. चालता-चालता माझ्या लक्षात आले की, फक्त किल्लारीच नव्हे तर हौसा, उमरगा तालुका आणि आजूबाजूच्या परिसरातील गावांमध्ये प्रचंड नुकसान झाले आहे. हे संकट मानवी संकट नसून निसर्गाची अवकृपा आहे आणि यातून बाहेर पडायचे असेल तर, सबंध राज्य सरकारची सत्ता आणि शक्ती या संकटग्रस्त माणसांच्या मागे उभी केल्याशिवाय आपण यांचे पुनर्वसन करू शकत नाही आणि म्हणून त्याच दिवशी २ ते ३ तासांत आजूबाजूच्या जिल्ह्यांचे वरिष्ठ अधिकारी या सर्वांना बोलावून डॉक्टर्स आणि त्यासोबतच अन्य सुविधा कशा देता येतील याची काळजी घेतली, आणि या पुनर्वसनाची प्रक्रिया वेगाने सुरू झाली हे काम एका दिवसाचे काम नव्हते, जवळपास तीन आठवडे या कामाशिवाय दुसरे काहीही काम केले नाही १५ दिवस मी स्वतः इथे येऊन राहिलो. माझा मुक्काम इथेच करून सकाळी ७ वाजता उठून आणि सबंध दोन्ही जिल्ह्यात जाऊन रात्री १ ते जवळजवळ ३ वाजेपर्यंत थांबून मुक्कामाला परत जायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी परत कामाला लागायचे या पद्धतीने कार्यक्रम आखला.

दिवसभर कष्ट करून रात्री दोन अडीचच्या दरम्यान २-३ तासांचा आराम करण्यासाठी कलेक्टरने बैलगाडीवर अंग टाकले होते- मला एका गोष्टीचा अभिमान आहे की, संकट मोठे होते परंतु, या दोन्ही तालुक्यांतील सर्वसामान्य जनतेला एवढे मोठे संकट आलेले असताना देखील त्यांनी धैर्याने संकटाला तोंड दिले आणि त्यांच्यातील आत्मविश्वास धडाडीने दाखवण्याचे काम त्यांनी ऐतिहासिक रित्या दाखवले. संकट मोठे होते त्यातून काही ना काही तरी काम करण्याची आवश्यकता होती. सुदैवानं विलासराव देशमुख, पद्मसिंह पाटील यांच्यासारखे सहकारी होते दोघांवरही दोन्ही जिल्ह्यांची कामे सोपवली आणि बाकी सर्व जनतेची साथ त्यांना होती आणि त्याचा परिणाम या संकटग्रस्त लोकांना एक प्रकारचा आधार देण्याचा होता. मला आठवतंय की, प्रविण परदेशी नावाचे एक गृहस्थ येथे कलेक्टर होते त्यांनी अखंड काम याठिकाणी तेव्हा केले. एके दिवशी मी उमरग्यावरून रात्री अडीच वाजता लातूरला यायला निघालो तेव्हा रस्त्यात बैलगाडी मध्ये एक माणूस झोपलेला दिसला, मी गाडी थांबवून त्या झोपलेला माणसाला उठवले, तेव्हा माझ्या लक्षात आले की, तो दुसरा तिसरा कोणी नसून तुमचा कलेक्टर होता. दिवसभर कष्ट करून रात्री दोन अडीचच्या दरम्यान २-३ तासांचा आराम करण्यासाठी त्यांनी रस्त्यावरच त्या बैलगाडीवर अंग टाकले होते. महाराष्ट्राची खासियत हीच आहे की, संकटावर मात करण्याची ताकद महाराष्ट्राचे प्रशासन नियंत्रण देते त्याचे आज उत्तम उदाहरण आज या ठिकाणी पाहायला मिळाले. संकटे हे येत असतात त्याला धैर्याने तोंड देता यायला हवे, आत्मविश्वास घालवून द्यायचा नसतो.

 “पवार साहब आप पैसे की चिंता मत करो, मैं देखूंगा वर्ल्ड बैंक से बात करूंगा आपको जितनी चाहिए उतनी रकम का मैं बंदोबस्त करूंगा- मला आठवतंय की, हे संकट आले आणि तुम्ही आम्ही सर्वांनी कष्ट केले त्याचा परिणाम संपूर्ण जगात याची चर्चा झाली मला स्वतःला युनो मध्ये बोलावले, जागतिक बँकेत बोलावले आणि तेव्हा असे सांगितले गेले की, लातूरचा भूकंप याला तोंड तुमच्या यंत्रणेने आणि लोकांनी कसे दिले यासंबंधीचे तुमचे विचार आम्हाला सांगा आणि तेव्हा मी माझी भूमिका मांडली. तेव्हा या भूकंपाला कोट्यावधी निधी लागणार होता आणि तेव्हा महाराष्ट्राकडे एवढे पैसे नव्हते, सुदैवाने त्यावेळीचे अर्थमंत्री डॉ. मनमोहन सिंग यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्यांनी असे सांगितले की, “पवार साहब आप पैसे की चिंता मत करो, मैं देखूंगा वर्ल्ड बैंक से बात करूंगा आपको जितनी चाहिए उतनी रकम का मैं बंदोबस्त करूंगा |” आणि मला आज या ठिकाणी त्यांची आठवण होते. एकंदर या कामासाठी लागलेली कोट्यावधी रुपयांची रक्कम अक्षरशः दहा दिवसांच्या आत जागतिक बँकेकडून मंजूर करून त्यांनी उपलब्ध करून दिली आणि त्यांनी मला सांगितले की, यात काही कमतरता आली तर हक्काने सांगा आणि पाहिजेल त्या प्रकारे मी मदत करीन.

प्रधानमंत्री इथे आलेत तर सर्व अधिकारी त्यांच्या व्यवस्थेला लागतील आणि जी संकटग्रस्त माणसे आहेत, दुःखी आहेत, जखमी झालेली आहेत त्यांवर कोणी ढुंकूनही बघणार नाही- देशाचे प्रधानमंत्री नरसिंह राव होते ते या ठिकाणी येणार होते, भूकंप झाल्यावर दुसऱ्या तिसऱ्याच दिवशी त्यांचा आग्रह होता या ठिकाणी यायचा मी त्यांना सांगितले की, अजिबात यायचे नाही, तेव्हा मला बाकीचे अधिकारी म्हणाले की, तुम्ही प्रधानमंत्री यांना यायचे नाही म्हणता, तेव्हा मी त्यांना सांगितले की, प्रधानमंत्री इथे आलेत तर सर्व अधिकारी त्यांच्या व्यवस्थेला लागतील आणि जी संकटग्रस्त माणसे आहेत, दुःखी आहेत, जखमी झालेली आहेत त्यांवर कोणी ढुंकूनही बघणार नाही आणि म्हणून सर्व नीट झाल्यानंतर आले तरी चालतील. पहिले इथे जे दुःखी माणसं आहेत त्यांचे दुःख कमी करण्यासाठी यंत्रणेने काम केले पाहिजे यंत्रणा इकडे तिकडे हलता कामा नये, आणि त्यामुळे प्रधानमंत्री यांना मी इथे येऊ दिले नाही. आणि एका ठराविक दिवसानंतर मी त्यांना निमंत्रण दिले आणि ते इथे आलेत आणि इथले जे काही प्रश्न होते ते सोडवण्यासाठी त्यांनी मदत केली.

मंत्रालयात माझ्या केबिनमध्ये असताना मोठा आवाज आला, मी चेंबर मधून बाहेर पाहिले तर लोक पळत होते तेव्हा लक्षात आले की… इथून गेल्यानंतर मुंबईला एक संकट आले त्या दिवशी शुक्रवार होता आणि मी मंत्रालयात होतो. दुपारी साडेबाराच्या दरम्यान माझ्या केबिनमध्ये मोठा आवाज आला, मी चेंबर मधून बाहेर पाहिले तर लोक पळत होते तेव्हा लक्षात आले की, काहीतरी गडबड आहे. मंत्रालयाच्या शेजारील एअर इंडिया बिल्डिंगमध्ये बॉम्बस्फोट झाला असे समजले. त्या बॉम्बस्फोटचा अंदाज घेण्यासाठी मी स्वतः तिथे गेलो मी संरक्षण मंत्री देखील त्याआधी होतो त्यामुळे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी कोणती रसायने वापरतात हे मला माहिती होते आणि तेथील एकंदर चित्र पाहिल्यानंतर मला लक्षात आले की, या बॉम्बस्फोट मध्ये वापरलेले रसायन या देशात होऊ शकत नाही परंतु लष्कराशिवाय दुसरे कोणीही हे रसायन वापरू शकत नाही त्यामुळे आजूबाजूच्या देशातून हा कोणीतरी उद्योग केलेला दिसत आहे आणि नंतर पाकिस्तान मधून हे काम झाले या प्रकारची माहिती तेव्हा समजली आणि तो बॉम्बस्फोट एकाच ठिकाणी न होता दहा ठिकाणी झाला होता आणि दुर्दैवाने एका समाजाच्या विशिष्ट आणि श्रद्धास्थाने आणि कुटुंबे यांच्यातून हा दंगा झाला परंतू त्यातून जातीय दंगा होऊ नये म्हणून मी एक निर्णय घेतला मला विचारणा केली असता हे स्फोट कुठे झालेत तेव्हा मी सांगितले की, दहा ठिकाणी झालेत हे खरे आणि एक ठिकाण मी खोटे सांगितले आणि ते ठिकाण म्हणजे समाजाचे अल्पसंख्यांक राहतात त्यांच्या भागाचे होते. त्याचा परिणाम म्हणजे मुंबईच्या लोकांना हा स्फोट आणि त्याची किंमत हे ध्यानात आले आणि त्यामुळे कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया आली नाही आणि त्यामुळे मुंबई शांत राहिली.

मी व माझे मंत्री मंडळातील सहकारी आणि मंत्रालयातील अधिकारी यांनी अक्षरशः ४८ तास न झोपता त्या ठिकाणी काम केले- मुंबई ही जगातील एक आर्थिक दृष्ट्या प्रगत आणि व्यवहारिक शहर आहे हे संपूर्ण जगात माहित आहे. त्यामुळे कारभार बंद करून चालणार नाही, तो दिवस शुक्रवारचा होता त्यामुळे शुक्रवार आणि शनिवारी मी व माझे मंत्री मंडळातील सहकारी आणि मंत्रालयातील अधिकारी यांनी अक्षरशः ४८ तास न झोपता त्या ठिकाणी काम केले, आणि सोमवारी मुंबई शहर आणि त्याचा व्यवहार हा सुरळीतपणे चालू आहे ही स्थिती निर्माण केली. जग आश्चर्यचकित झाले, जेथे ३०० लोक मेलेत पण एवढे असून देखील मुंबई नगरी शांत आहे, लोक कामावर जात आहेत, मुले शाळेत जात आहेत, कॉलेज सुरू होत्या ही स्थिती त्या ठिकाणी आम्ही निर्माण केली. आणि सबंध भारताचे नाव संकटाला तोंड देणारे असे नावलौकिक झाले.

हे काम शरद पवार करू शकतात आणि त्याचे कारण की, त्यांना किल्लारीचा अनुभव आहे- संकटे येतात परंतु त्याची एक नीती असते. संपूर्ण जगामध्ये असे म्हटले जाते की, “Disaster Management plan” संकट आल्यानंतर जे नुकसान होते त्याला तोंड देण्यासंबंधीचे योजना व्यवस्था अशा प्रकारचा तो कार्यक्रम सर्वत्र असतो पण तो आपल्याकडे नव्हता. प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी बैठक बोलावली सर्व पक्षाच्या लोकांना आमंत्रित केले आणि आपल्या देशात हे काम नाही हे कोणीतरी केले पाहिजे आणि शेवटी सोनिया गांधींनी त्या मीटिंगमध्ये सांगितले की, हे काम शरद पवार करू शकतात आणि त्याचे कारण की, त्यांना किल्लारीचा अनुभव आहे आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी ते काम पवारांवर सोपवा असे सांगितले आणि ते काम मी दोन वर्ष देशात आणि देशाच्या बाहेर जाऊन अभ्यास करून त्याची नीती आखली आणि त्यासंबंधीचा कायदा केला. आज भारतामध्ये कुठेही संकट आले तर त्याला तोंड देण्याची यंत्रणा आज भारतात आहे आणि त्याचा उगम हा किल्लारी मधून झालेला होता आणि त्यामुळे आता जगाला त्याची चिंता नाही. या संकटाच्या काळात आणखीन एक गोष्ट पाहायला मिळाली आणि ती म्हणजे मदतीचा ओघ आणि शेवटी येथे इतकी मदत यायला लागली की, ट्रकच्या ट्रक या ठिकाणी यायला लागले आणि शेवटी ते आम्हाला थांबवावे लागलेत. लोकांनी अनेक प्रकारची वेगवेगळ्या पद्धतीने मदत केल्यात. आर्थिक त्यासोबतच, औषधे पुरवली हव्या त्या गोष्टी महाराष्ट्रातून आणि या देशातून या ठिकाणी आल्या. घरे बांधण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्यात, जसे शिवसेनेने एक गाव दत्तक घेतले, तसे काँग्रेस पक्षाने तावसी हे गाव दत्तक घेतले त्यासोबतच आणखीन इतरही गावे दत्तक घेतली. काही कारखानदारांनी गावी दत्तक घेतली, जसे किर्लोस्कर, टाटा, बिर्ला असे अनेक लोक या ठिकाणी आलेत आणि या ठिकाणी घरे बांधण्याचा एक कार्यक्रम त्यांनी हातात घेतला आणि अक्षरशः एका वर्षाच्या आत अनेक कामांना गती देण्यात आपण यशस्वी झालो.

सर्व मुलांना पुण्याला घेऊन जाऊन एका स्वतंत्र इमारतीत त्यांच्या निवासस्थानाची आणि शिक्षणाची व्यवस्था केली- दुर्दैवाने कुटुंबातील करते माणसे मरण पावली आणि लहान मुले होती, त्यांची प्रशासनाकडून मोजणी केली असता तो आकडा मोठ्या प्रमाणात निघाला. तेव्हा प्रश्न पडला की या मुलांचे करायचे काय ? यांच्याकडे कोण पाहणार ? यांना आई वडील नाहीत. शांतीलाल आणि आमचं पुण्याचे सहकारी होते त्यांना बोलावून अशा कामांमध्ये लक्ष घालणाऱ्या लोकांना जमा करून त्यांना सांगितले की, “हे संकट मोठे आहे या संकटात सापडलेल्या मुलांना पुन्हा नव्याने उभे करून त्यांना शिक्षण देऊन स्वतःच्या पायावर उभे करून त्यांना मार्गी लावायची जबाबदारी घेऊन आपण काम करायचे.” त्या सर्व मुलांना पुण्याला घेऊन जाऊन एका स्वतंत्र इमारतीत त्यांच्या निवासस्थानाची आणि शिक्षणाची व्यवस्था केली.

…असे अनेक नावे माझ्याकडे असून यातला प्रत्येक मुलगा प्रतिष्ठित ठिकाणी काम करतोय –आज या एवढ्या मोठ्या संकटातून जी मुले बाहेर पडलीत त्यांची माहिती घेण्याचा मी प्रयत्न केला, ज्यांचे पालक नाहीत अशी स्थिती असताना देखील शांतीलाल आणि त्यांचे सहकारी त्या मुलांचे पालक झाले, पुण्याला गेल्यावर त्या सर्व मुलांनी उत्तम शिक्षण घेतले. त्यातली काही मुले म्हणजे, किशोर भोसले नावाचा मुलगा एमए झाला आणि सिंगापूरला जाऊन तो एका प्रतिष्ठित संस्थेत पदाधिकारी म्हणून काम करत आहे. बालाजी साठे हा मुलगा एम एस सी होऊन शास्त्रज्ञ होऊन दिल्लीत एका सहकारी संस्थेत तो काम करत आहे. लिंबाजी फडतरे शिरपूर धुळे हा एम पी एस झाला आणि इंटरनॅशनल स्तरावर त्याने उत्तम काम केल्यामुळे त्याचा बँकॉक येथे सत्कार झाला. माधव माने याने एम एस सी करून १७ रिसर्च पेपर मेडिकल केमिस्ट्री या सर्व क्षेत्रात त्यांनी लिखाण काम करून आणि पुण्यातील NSG नावाच्या केंद्र सरकारच्या संस्थेत त्यांनी हे संशोधन केले. सचिन झोने यांनी एम एस सी करून एका रिसर्च संस्थेमध्ये ते काम करत आहेत. मल्लिकार्जुन बिराजदार यांनी बीएससी करून पोलीस खात्यात एक वरिष्ठ अधिकारी म्हणून ते काम करत आहेत. बाळासाहेब कांबळे हे पोलीस खात्यात अधिकारी आहेत असे अनेक नावे माझ्याकडे आहेत. आणि यातला प्रत्येक मुलगा प्रतिष्ठित ठिकाणी काम करत आहे. शांतीलाल यांच्यामुळे मुले शिकलीत आणि मार्गाला लागली. ते एवढेच करून थांबले नाहीत, तर देशात कुठल्याही राज्यात संकटे आली तर सर्वप्रथम शांतीलाल यांना संपर्क करून त्यांच्या संघटनेकडे कामे सोपावली जातात. ते फोनची वाट न पाहता तातडीने कामाला लागतात त्यांनी स्वतःचा व्यवसाय बंद केला आणि फक्त संकट ग्रस्तांना मदत करायची एवढे एकच काम आयुष्यात त्यांनी घेतलेले आहे. आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचे मी या ठिकाणी अभिनंदन करतो.

विलासराव देशमुख, डॉ. पद्मसिंह पाटील यांशिवाय अनेक अधिकारी त्या ठिकाणी काम करत होते- संकटावर मात करण्यासाठी आणि संकट ग्रस्तांना मदत करण्यासाठी आतुरता असलेला जो मोठ्या प्रमाणात वर्ग आहे तो आपल्याकडे आहे आणि त्यामुळे आपण कितीही संकटे आलेत तरी त्यावर मात करू शकतो, या सर्व संकटाच्या काळात मला अनेकांची मदत झाली. विलासराव देशमुख, डॉ. पद्मसिंह पाटील यांशिवाय अनेक अधिकारी त्या ठिकाणी काम करत होते. आणि त्याबरोबरच इथली बरीच माणसे त्या ठिकाणी अहोरात्र काम करत होती. आणि म्हणून येतानाच मी चौकशी केली की, मी त्या काळात किल्लारीला आलो की येथील लोकांचे जे काही दुखणे असो ते सांगायला पुढे असायचे ते म्हणजे डॉ. पडसलगे माझ्यापेक्षा चारच वर्षांनी मोठे. यांसारख्या अनेक लोकांनी कष्ट केलेत आणि म्हणून हे होऊ शकले.

लोकांशी बांधिलकी यांच्याशी तडजोड कधी करायची नसते – कृतज्ञता सत्कार याची काही आवश्यकता नसते, समाजासाठी काहीतरी करायची ही वृत्ती असली तर, लोकांशी बांधिलकी यांच्याशी तडजोड कधी करायची नसते आणि हे संस्कार महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी दिले. चव्हाण साहेबांनी त्यांच्या कालखंडात कोयनेचा भूकंप झाला त्यावेळी अहोरात्र काम केले होते. आम्ही तेव्हा कॉलेजमध्ये शिकत होतो. त्यांच्या कामाची पद्धत पाहण्यासाठी आम्ही तेथे जात होतो. ३० तारखेच्या भूकंपाची एक्झॅक्टली वेळ ३ वाजून ५५ मिनिटे त्याची तीव्रता ६.४ रिश्टर, ४२ सेकंड हजे, एकंदर मृत्यू ८ हजार ८९, जखमी लोक १६ हजार ३०२, संपूर्ण उद्ध्वस्त झालेली गावे ५२, अंशत: हा उध्वस्त झालेली गावे २ हजार २९४, शासनाकडून ३ हजार ६८७ घरे बांधण्यात आली याशिवाय कार्यालय, महिला केंद्र, शाळा, समाज मंदिर, दवाखाने, सरकारी संस्था हे सर्व नव्याने बांधण्यात आले. ही माहिती देण्यामागचे कारण एवढेच की संकटे येत असतात पण संकटांना तोंड देण्याचा सर्वात मोठा वर्ग या देशात , आणि हा आपला ठेवा आहे आणि या ठेव्यासंबंधीची कृतज्ञता त्या सर्व लोकांबद्दल करायचे माझ्याबद्दल नाही, ही माझी तुमची सर्वांची जबाबदारी आहे. ही जबाबदारी आपण सर्वांनी या ठिकाणी पार पाडली या जबाबदारीला ज्यांनी साथ दिली आणि माणसांना उभे करण्यासंबंधीची ताकद दिली त्या मदत करणाऱ्या लोकांसोबत त्यांच्या या दातृत्वासंबंधी त्यांचे अंत:करणापासून आभार मानले पाहिजे एवढेच याच ठिकाणी सांगतो, आपण अगत्याने सर्वांना बोलावले त्यामुळे तुम्हा सर्वांचे आणि विशेषतः येथील तरुण मंडळींचे की, ज्यांनी हा हट्ट माझ्याकडे केला की तुम्ही यायलाच हवे या सर्व तरुणांचे मी आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो.

Back to top button
error: Content is protected !!