महाराष्ट्रराजकारण
Trending

राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांनी राजीनामा मागे घेतला असणार: राज ठाकरे

डोळ्यादेखत शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत तरी कोकणी माणूस जागा का होत नाही? बारसू रिफायनरी प्रकल्पावर मांडली स्पष्ट भूमीका

Story Highlights
  • व्यापारी मित्रांच्या मार्फत जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात

रत्नागिरी, दि. ७ – माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची नुसती घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल? उद्या मला पण उर्मटपणे बोलेल. म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला असणार, असे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षांच्या राजीनाम्यावर आपले मत व्यक्त केले. डोळ्यादेखत शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत तरी कोकणी माणूस जागा का होत नाही? असा सवालही राज यांनी उपस्थित करून बारसू प्रकल्पावर आपली स्पष्ट भूमीका मांडली.

आजच्या सभेला येताना एका शाखाध्यक्षाच्या गाडीला अपघात झाला आहे. हे दुःखद आहे. सभेवरून घरी जाताना आणि एकूणच कुठेही जाताना गाड्या शांतपणे चालवत जा. माझी महाराष्ट्र सैनिकांना हात जोडून विनंती की जाताना गाडी शांतपणे चालवा आणि सीटबेल्ट लावा. सीटबेल्ट लावणं हे आपल्या हिताचं आहे, असे आवाहन सभेच्या सुरुवातीला राज ठाकरे यांनी केले.

मी कोकणात सभा घेईन असं मागच्या सभेच्या वेळेस बोललो होतो. त्याप्रमाणे आजची सभा घेतोय. एकूणच सगळं राजकीय वातावरण तुंबल्यासारखं झालं आहे. महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थितीच कळतच नाही. काही आमदार तर समोर आलं की विचारावंस वाटतं, काय, सध्या कुठे? इतकं इकडून तिकडे जण सुरु आहे. आणि दुसरीकडे राजीनाम्याचा गोंधळ सुरु होता तो काल संपला.

माझं असं मत आहे की शरद पवारांना राजीनामा द्यायचा होता पण राजीनामा दिल्यावर अजित पवार ज्या पद्धतीने अरेरावी करत होते ते पाहून पवार साहेबांच्या मनात विचार आला असणार की राजीनामा दिल्या दिल्याची नुसती घोषणा केली तर हा इतका उर्मट वागतोय तर खरंच राजीनामा दिला तर कसा वागेल? उद्या मला पण उर्मटपणे बोलेल. म्हणून पवारसाहेबांनी राजीनामा मागे घेतला असणार.

असो. कोकणाकडे पाहताना मला नेहमी वाईट वाटतं. कोकणाची दुर्दशा झाली आहे त्याला तुम्हीच जबाबदार आहात. कोकणातले राजकारणी म्हणजे व्यापारी आहेत, अशांना तुम्ही परत परत निवडून देणार असाल तर काय वेगळं होणार? मुंबई-गोवा महामार्गाच काम २००७ ला सुरु झालं पण तरीही अजून काम पूर्ण नाही झालेलं कारण निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींना माहीत आहे की काम नाही केलं, तरी निवडून देणार आहेतच मग कशाला कामं करायची?

मागच्या वेळेला मुंबई-गोवा हायवेवरून प्रवास करताना रस्त्याची दुर्दशा पाहून मी देवेंद्र फडणवीसांना फोन केला मग नितीन गडकरींना फोन केला आणि रस्त्याची काय अवस्था आहे हे सांगितलं तर ते म्हणाले की कॉन्ट्रॅक्टर पळून गेले. काँट्रॅक्टर्स पळून का जातात? मला सांगा एकही लोकप्रतिनिधी विचारतोय का, की कॉन्ट्रॅक्टर का पळून गेला?

समृद्धी महामार्ग ४ वर्षांत झाला मग १५ वर्षांत मुंबई गोवा महामार्ग का नाही झाला? हा प्रश्न इथल्या लोकप्रतिनिधींना कसा पडत नाही ह्याचं मला आश्चर्य वाटतं.

आज कोकणातील माणसाच्या पायाखालून जमीन निघून जात आहे तरी कोकणातील माणसाला कळत कसं नाही? डोळ्यादेखत शेकडो एकरांचे व्यवहार होत आहेत तरी कोकणी माणूस जागा का होत नाही? तुमच्या स्थानिक लोकप्रतिनिधींना माहीत असतं कुठे प्रकल्प येणार ते, मग तेच त्यांच्या व्यापारी मित्रांच्या मार्फत जमिनीचे व्यवहार करून हजारपट नफा कमवतात. आणि हे आज नाही गेले कित्येक वर्ष सर्रास सुरु आहे तरीही कोणी बोलत नाही, ह्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवत नाही.

आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं की आक्रमक समुद्रमार्गाने येतील आणि इथल्या जमिनी घेतील म्हणून महाराजांनी आरमार उभारलं. महाराजांना किती पुढचं दिसत होतं. महाराजांनी इतक्या वर्षांपूर्वी आपल्याला जागं करायचा प्रयत्न केला पण तरीही आपण जागे झालो नाही. १९९२ च्या बॉम्बस्फोटांच आरडीएक्स समुद्रमार्गे आलं, २६/११ हल्ल्याचे अतिरेकी समुद्र मार्गाने आले. इतकं घडलं, डोळ्यादेखत आक्रमण झाली तरी आपण त्यातून शिकायला तयार नाही. आपल्या जमिनी दुसऱ्याच्या घशात जाऊ देणार नाही हे म्हणायला तयार नाही.

छत्रपती शिवाजी महाराजांवरून एक मुद्दा आठवला तो सांगतो. २०१४ च्या आधी तेंव्हाच्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभा करणार अशी घोषणा केली. मी त्यावर काय बोललो हे लक्षात न घेता राष्ट्रवादी काँग्रेसने आवई उठवली की म्हणे राज ठाकरेंचा ह्या पुतळ्याला विरोध आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विरोध करेन असं वाटतं तुम्हाला? बरं हे बोलणारे कोण तर, राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार हेजे कधीही, महाराजांचं नाव सुद्धा घेत नाही आणि अशा माणसाचा पक्ष मला बदनाम करणार.

माझा मुद्दा इतकाच होता की महाराजांच्या समुद्रातील पुतळ्यावर १०,००० कोटी रुपये खर्च करणार त्यापेक्षा महाराजांनी उभे केलेले गडकिल्ले हे महाराजांचं खरं स्मारक आहे, त्यांचं आधी संवर्धन करा हे माझं म्हणणं होतं. पण माझ्या म्हणण्याचा विपर्यास केला, असेही राज ठाकरे म्हणाले.

कुठलेतरी मुद्दे काढायचे, विपर्यास करायचं आणि महत्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष करायचं हेच महाराष्ट्रात सुरु आहे. कोणालाही कोकणी माणसाविषयी आस्था नाही. इथे प्रकल्प आणायचे आणि जमिनींच्या व्यवहारात बाहेरच्यांनी पैसे कमवायचे हे वर्षानुवर्षे सुरु आहे. दाभोळला एनरॉनच्या वेळेस असो, जैतापूर असो, नाणार आणि बारसू असो इथल्या जमिनी अमराठी लोकांनी घेतल्या आणि अव्वाच्यासव्वा भावाला सरकारला विकल्या. तो गब्बर श्रीमंत झाला. आणि माझा कोकणी माणूस तसाच राहिला. ह्याचं मला खूप वाईट वाटतं,राग येतो, असेही राज ठाकरे म्हणाले.

कोकण ही प्रतिभावंतांची भूमी आहे. महाराष्ट्राच्या वाट्याला आलेल्या भारतरत्नांपैकी ६ भारतरत्न ही कोकणातून आहे. इतक्या प्रतिभावान कोकणी माणसाला काय झालं आहे? कोकणावर निसर्गाची मुक्त हस्ताने इथे पर्यटनाला चालना दिली तर राज्याचं अर्थकारण कोकण चालवेल. पण कोणाला काहीच घेणंदेणं नाही.

आधी नाणारला प्रकल्प होणार असं सांगितलं, मग तो बारगळला, आता बारसू. बारसूमध्ये युनेस्कोला कातळशिल्प सापडली आहेत. युनेस्को जगभरातील अनेक हेरिटेज वास्तूंच जतन करते. आता आपल्याकडे कातळशिल्प सापडली आहेत त्यामुळे अशा हेरिटेज वास्तूच्या आसपास कोणताही मोठा प्रकल्प करता येणार नाही, इतकंच काय युनेस्कोच्या परवानगीशिवाय मोठं बांधकाम करता येत नाही.

आणि ह्या सगळ्यात शिवसेनेची भूमिका नक्की काय आहे रिफायनरींबाबत? त्यांचे खासदार वेगळं बोलतात, आमदार वेगळं बोलतात, पक्ष नसलेल्या पक्षाचे प्रमुख आता म्हणतात की लोकांच्या भावना असतील तसं होईल. मग बाळासाहेबांच्या स्मारकासाठी मुंबईचा महापौर बंगला हडपलात तेंव्हा जनतेला विचारलंत? शिवसेनेची रिफायनरीसाठी भूमिका नक्की काय आहे हे जनतेला सांगा तरी ?

इथल्या जमिनी हड्पणे, त्यातून बक्कळ पैसा कमवणं इतकंच इथल्या लोकप्रतिनिधींचं उद्दिष्ट आहे हे विसरू नका. माझी कोकणवासीयांना हात जोडून विनंती आहे की तुम्हाला फसवणाऱ्या ह्या लोकांना एकदा धडा शिकवाच, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं.

Back to top button
error: Content is protected !!