महावितरण चिकलठाणा एमआयडीसी शाखेतील तंत्रज्ञ योगेश गायकेंच्या डोक्यात पक्कड मारली ! एका महिन्यात केवळ ८ युनिट वापरावरून वाद पेटला !!
महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण करणाऱ्यावर गुन्हा दाखल

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १५: नारेगावात वीजबिल वसुलीस गेलेल्या महावितरणच्या तंत्रज्ञास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ग्राहकावर सिडको एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमीन शेख असे आरोपीचे नाव आहे.
महावितरणच्या चिकलठाणा एमआयडीसी शाखेत कार्यरत तंत्रज्ञ योगेश गायके व बाह्यस्रोत कंत्राटी कर्मचारी अब्दुल अजिम शेख हे दोघे बुधवारी (१५ मार्च) सकाळी नारेगाव येथील नाला डीपी व मनपा डीपीवरील ग्राहकांकडील वीजबिलांच्या वसुलीसाठी गेले होते. दुपारी साडेबाराच्या सुमारास अजीज कॉलनीमध्ये एका ग्राहकाचे वीजबिल तपासले असता एका महिन्यात केवळ ८ युनिट वापर आढळला.
त्यामुळे गायके व शेख यांनी मीटर तपासायचे आहे असे म्हणताच आरोपीने गायके यांच्या हातातील पक्कड हिसकावून त्यांच्या डोक्यावर मारली. त्यात गायके रक्तबंबाळ झाले. तसेच आरोपीने गायके व शेख यांना शिविगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली. घटनेनंतर तंत्रज्ञ गायके यांनी सिडको एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून फिर्याद नोंदवली. त्यावरून आरोपी अमीन शेखवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne