छत्रपती संभाजीनगर
Trending

डीपीवरील वितरण पेट्यांचे तीन हजारांहून अधिक दरवाजे केले बंद, छत्रपती संभाजीनगर परिमंडलात एकाच वेळी राबवली मोहीम !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ : विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्यासाठी महावितरणच्या डीपीवरील वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे बंद करण्याची मोहीम छत्रपती संभाजीनगर परिमंडलात 8 सप्टेंबर रोजी राबविण्यात आली. यामध्ये शहर मंडलात 1200, ग्रामीण मंडलात 891 व जालना मंडलात 1192 अशा एकूण 3 हजार 283 उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद करण्यात आले. मुख्य अभियंता डॉ. मुरहरी केळे यांनी स्वतः पाहणी करीत शहरातील अनेक उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे बंद केले.

डॉ.केळे यांनी तीन महिन्यांपूर्वी पदभार स्वीकारताच विविध उपक्रम राबवले आहेत. प्रत्यक्ष वापरात असलेली परंतु महावितरणच्या प्रणालीत नसलेली रोहित्रे प्रणालीत नोंद करण्याची मोहीम त्यांनी राबवली. नवीन 7800 रोहित्रांची प्रणालीत नोंद करताच रोहित्र नादुरुस्तीचे पूर्वीच्या संख्येनुसार असलेले प्रमाणही आपोआप घटले. त्यानंतर आता विद्युत सुरक्षेसाठी वितरण पेट्यांचे दरवाजे मोहीम त्यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आली. विद्युत सुरक्षिततेचे मानवी जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासोबतच विद्युत यंत्रणा सुरक्षित ठेवण्याचे काम महावितरण करते. तथापि, ‍विविध कारणांनी अनेकदा डीपीवरील वितरण पेट्यांचे दरवाजे उघडे व तुटलेले दिसतात.

आता गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा उपाययोजना म्हणून सर्व उघड्या वितरण पेट्यांचे दरवाजे स्वयंस्फूर्तीने एकाचवेळी बंद करण्यासाठी शुक्रवारी सकाळी साडेआठ ते साडेदहा या वेळेत ही मोहीम राबविण्यात आली. महावितरणची कार्यालये असणारी शहरे व गावे यांचा यात प्राधान्याने समावेश करण्यात आला होता. त्यानुसार परिमंडलातील सर्व अभियंते व जनमित्रांनी ही मोहीम यशस्वी केली. वितरण पेट्यांचे उघडे दरवाजे व नंतर ते बंद केल्याची छायाचित्रे घेऊन परिमंडल कार्यालयास अहवाल पाठविण्यात आला.

नागरिकांना कुठे उघडी अथवा धोकादायक वितरण पेटी आढळली तर त्वरित त्याची माहिती महावितरणच्या संबंधित शाखा कार्यालयास अथवा 1912, 1800-212-3435 अथवा 1800-233-3435 या क्रमांकावर द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!