महाराष्ट्र
Trending

महावितरणचे कामचुकार अधिकारी रडारवर: वीज ग्राहक हे आपले दैवत, वीज सेवेच्या मानकांनुसार ग्राहक सेवा द्या- संचालक संजय ताकसांडे 

धाराशिव दि.४ नोव्हेंबर: इज ऑफ लिव्हिंगच्या आदर्श तत्वानुसार वीज ग्राहकांना सेवा देत असताना कंपनीने निर्धारीत केलेल्या ग्राहकसेवेच्या मानका नुसार विहित वेळेत ग्राहक सेवा देणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. त्यानुसार ग्राहकाभिमूख सेवा द्यावी अन्यथा गंभीर परिणामांना सामोरे जाण्याची तयारी ठेवावी असे निर्देश महावितरणचे संचालक (संचालन) संजय ताकसांडे यांनी दिले.

धाराशिव येथे काल (दि.४) हॉटेल ॲपल येथे पार पडलेल्या लातूर परिमंडल अंतर्गत ग्राहकसेवांसह विविध कामांचा आढावा घेताना संचालक संजय ताकसांडे बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता सुंदर लटपटे, अधीक्षक अभियंता मदन सांगळे, मकरंदआवळेकर, मधुकर घुमे तसेच छत्रपती संभाजीनगर प्रादेशिक कार्यालयाच्या अधीक्ष्क अभियंता कटकधोंड, स्थापत्य विभागाचे अधीक्षक अभियंता काळोगे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संचालक (संचालन) संजय ताकसांडे म्हणाले की, वीजग्राहकांना ‘इज ऑफ लिव्हिंग’प्रमाणे सेवा देण्यास महावितरणने अतिशय गंभीरपणे सुरवात केली आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांची तत्परता अतिशय़ महत्त्वाची आहे. प्रत्येक वीजग्राहक हे आपले दैवत आहे असे समजून ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. सुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग व तक्रारींचे निराकरण त्याचबरोबर वीजबिलांची वसुली यामधील तत्परतेत हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा संचालक  ताकसांडे यांनी दिला.

ते पुढे म्हणाले की, कृषीपंपांना दिवसा वीजपुरवठा करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषिवाहिनी योजना २.० ची वेगवान अंमलबजावणी सुरु केली आहे. त्याकरिता लातूर परिमंडलातील संबंधीत सर्व उपकेंद्रांची तांत्रिक दुरुस्ती व सुधारणा, अद्ययावती करण, स्थापत्य कामे व  इतर सक्षमीकरणाचे विविध कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सुचनाही त्यांनी केल्या. घरगुती, व्यावसायिक व औद्योगिक वर्गवारीतील प्रलंबीत वीज जोडण्या येत्या दहा दिवसांत पूर्ण कराव्यात तसेच मार्च २३ अखेर बाकी असलेल्या कृषीपंपाच्या वीज जोडण्या डिसेंबर अखेर पर्यंत कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करण्यासाठी युध्दपातळीवर संपूर्ण कार्यक्षमतेने सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी कामाला लागावे.

वीज जोडण्यासंबंधात कसलीही  हयगय खपवून घेतली जाणार नाही असा इशारा देत कामचुकार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचेही निर्देश ताकसांडे यांनी दिले. याप्रसंगी  सुरवातीला मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी संचालक ताकसांडे यांचे स्वागत केले व परिमंडळातील कामांचे प्रास्ताविक केले. याप्रसंगी लातूर, धाराशिव व बीड मंडळातील सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Back to top button
error: Content is protected !!