छत्रपती संभाजीनगर
Trending

मीटरमध्ये काडी करणाऱ्या वीजचोरांवर कारवाईचा धडाका, महावितरणने 3319 ग्राहकांना दिला ४४० व्होल्टचा धक्का !

मोहीमेमुळे छत्रपती संभाजीनगर परिमंडलातील वीजचोरांचे धाबे दणाणले

संभाजीनगर लाईव्ह, दि. १० : वीजचोरीविरोधात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जून महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत 3319 जणांवर कारवाई करून 2 कोटी रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली आहे. गेल्या वर्षभरात जेवढ्या कारवाया झाल्या होत्या, तेवढ्या कारवाया एका महिन्यातच करण्यात आल्या आहेत. या मोहीमेमुळे छत्रपती संभाजीनगर परिमंडलात वीजचोरांचे धाबे दणाणले आहे.

मुख्य अभियंता डॉ.मुरहरी केळे यांनी वीजचोरीविरोधात नियमित कारवायांबरोबरच जूनमध्ये विशेष मोहीम राबवण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अभियंते व कर्मचाऱ्यांना दिले होते. ज्या विद्युत वाहिनीवर वीजगळतीचे प्रमाण अधिक आहे, त्या भागात इतर भागातील कर्मचाऱ्यांनीही भाग घेऊन एकाचवेळी कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी दिले होते. त्यानुसार परिमंडलातील प्रत्येक शाखेत जूनमध्ये पहिल्या व तिसऱ्या आठवड्यात धडक मोहीम राबवण्यात आली. यात वीजचोरीच्या 3319 प्रकरणांत कारवाई करण्यात आली.

यात सुमारे 2 कोटी रुपयांची वीजचोरीची बिले आकारण्यात आली आहेत. ही बिले न भरल्यास वीजचोरांवर थेट पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. दरम्यान, वीज चोरीचा संशय असलेले मीटर ताब्यात घेऊन त्याची महावितरणच्या मीटर टेस्टिंग लॅबमध्ये तपासणी केली जाते. त्यात काही फेरफार केल्याचे आढळल्यास ग्राहकाने जोडलेल्या वीजभारानुसार वीजचोरीचे निर्धारित बिल दिले जाते. तसेच दंड (कंपाऊंडिंग चार्जेस) आकारला जातो.

वीजचोरीचे निर्धारित बिल व दंडाची रक्कम भरण्यासाठी ग्राहकाला मुदत दिली जाते. तथापि, विहित मुदतीत ग्राहकाने बिल व दंड न भरल्यास त्याच्यावर विद्युत कायद्यातील तरतुदीनुसार पोलिसांत गुन्हा नोंदविला जातो. वीजचोरी हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून या गुन्ह्यात तीन वर्षे कारावास किंवा दंड अथवा या दोन्ही शिक्षांची तरतूद आहे. नागरिकांनी ही बाब लक्षात घेऊन कोणत्याही प्रकारे विजेचा चोरटा किंवा अनधिकृत वापर कटाक्षाने टाळावा. अधिकृत वीजजोडणी घेऊनच विजेचा वापर करावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!