राजकारण
Trending

मंत्री छगन भुजबळांच्या दौऱ्याला तीव्र विरोध, सातबारा आमच्या नावाचा ! नुकसान सोसू परंतू शेतीच्या बांधावर येऊ देणार नाही, मराठा आंदोलक आक्रमक !!

९९ टक्के मराठा समाज माझ्या पाठीशी असल्यादा दावा भुजबळांचा

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३०- मराठा समाजाला सरसकट ओबीसीचे आरक्षण देण्यास कडाडून विरोध करणारे मंत्री छगन भुजबळ यांच्या दौर्याला मराठा समाजाने कडाडून विरोध दर्शवला आहे. मागील तीन दिवसांपासून सुरु असलेल्या अवकाळी पावसामुळे शेत पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आज, ३० रोजी भुजबळ आपला मतदारसंघ येवल्यात नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा करणार आहे. या दौर्यास मराठा समाजाने लोकशाही मार्गाने कडाडून विरोध केला आहे.

छगन भुजबळ हे सत्तेत सहभागी असून त्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे संविधानिक पदावर असलेल्या एका मंत्र्याने एखाद्या समाजाला कडाडून विरोध करणे हे संविधानाचे उल्लंघन असल्याचा आरोप करीत मराठा समाजाने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. याशिवाय नुकसानग्रस्त शेतीचा सातबारा हा आमच्या वैयक्तीक मालमत्तेचा भाग आहे. त्यामुळे आमच्या बांधावर भुजबळांनी येवू नये, अशी भूमीका मराठा आंदोलकांनी घेतली आहे.

भुजबळ हे संपूर्ण मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्यास सुरुवातीपासून विरोध करत आहे. त्यामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून संविधानिक पद्धतीने मागणी करणारा मराठा समाज आता आक्रमक भूमीका घेण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचला आहे. भुजबळांच्या दौर्याला विरोध दर्शवन्यासाठी मराठा समाज काळे झेंडे दाखवणार असल्याचे आंदोलकांनी सांगितले.

दरम्यान, भूजबळ गो बॅक अशा घोषणा मराठा आंदोलक देत आहेत. येवल्यातील विंचूर चौफुलीवर मराठा समाजाच्या आंदोलकांनी आपल्या तीव्र निषेध व्यक्त केला. हा दौरा शेत पिकांच्या नुकसानीसंदर्भात नसून राजकीय भावनेने प्रेरित असल्याचा आरोपही मराठा आंदोलकांनी केला आहे. मराठा समाजाचा विरोध लक्षात घेवून भुजबळांनी आपल्या दौर्याचा मार्ग बदलणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, मी आमदार असून प्रतिनिधीत्व करत असलेल्या मतदारसंघात मी दौरा करू शकतो. काही मोजक्या लोकांचा विरोध होत असून ९९ टक्के मराठा समाज माझ्या पाठीशी असल्यादा दावाही भुजबळांनी केला आहे.

Back to top button
error: Content is protected !!