राजकारण
Trending

अजित पवारांनी बंड केल्याचं शरद पवारांकडून मान्य ! न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार: शरद पवार

मुंबई, दि. २- माझ्यासाठी हा नविन प्रकार नाही. पक्षावर दावा केला तरी मी लोकांमध्ये जाणार. माझा राज्यातल्या लोकांवर विश्वास आहे. माझी खरी शक्ती कार्यकर्ता आणि महाराष्ट्रातील सर्वसामान्य माणूस आहे. पुन्हा संघटनेची नव्या जोमाने बांधणी करावी लागेल. अजित पवार यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगून ज्यांनी पक्षाची शिस्त मोडली त्यांच्यावर कारवाईबाबत पक्षातील नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. न्यायालयात नाही तर जनतेत जाणार हेही पवारांनी यावेळी आवर्जून सांगितले. अजित पवार यांच्यासोबत गेलेले अनेक आमदार स्वखुशीने गेले नसल्याचा दावाही पवारांनी केला. त्यामुळे आगामी काळात वेगवान राजकीय घडामोडी घडू शकतात, हे आजच्या पत्रकार परिषदेतून स्पष्ट झाले.

राष्ट्रावादी कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये सामिल होत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर माहाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला. आज दुपारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रावादीतील नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला.

शपथविधीनंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमीका स्पष्ट केली. महाराष्ट्राच्या हितासाठी वरिष्ठांच्या संमतीनेच निर्णय घेतल्याची माहिती अजित पवार यांनी दिली होती मात्र, वरिष्ठाचे नाव सांगितले नव्हते. यावर शरद पवारांनी अतिशय मिश्किल उत्तर दिले, कदाचीत अजित पवार यांचे वरिष्ठ वेगळे असतील.

शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन भूमीका स्पष्ट केली. बंड, पक्ष फुटला, घर फुटले असा कोणताही शब्दप्रयोग शरद पवार यांनी आपल्या पत्रकार परिषदेत केला नाही. शरद पवार म्हणाले की, जे घडलं त्याची मला चिंता नाही. अजित पवार यांच्यासोबत जे लोकं गेले ते विधानसभेचे सदस्य आहेत. जे गेले त्यातील काही आमदारांशी माझं बोलनं झालं. त्यातील काही आमदारांनी मला सांगितलं की आम्ही तुम्हाला भेटून यावर सविस्तर सांगतो. आमच्याकडून सह्या घेण्यात आल्या असेही काही आमदार मला म्हणाल्याचे पवार म्हणाले.

अजित पवारांशी कोणतीही चर्चा झाली नाही. ज्या नऊ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली त्यातील फक्त छगन भुजबळ यांच्याशी बोलने झाले. अजित पवारांनी विरोधी पक्ष नेते पदाजा राजीनामा दिल्याची माहिती मला तुमच्याकडून (पत्रकारांकडून) समजली. याची मला माहिती नव्हती, असेही शरद पवार म्हणाले. ६ तारखेला पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत यावर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

काही दिवसांपूर्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रावादी कॉंग्रेसवर भ्रष्ट्राचाराचा जाहीर आरोप केला आणि आजच राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील आमदारांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेतलं यावरून मोदी यांनी केलेल्या आरोपात तथ्य नव्हतं हे आजच्या शपथविधीवरून स्पष्ट होतं, असा दावाही शरद पवार यांनी यावेळी केला. या शपथविधीनंतर काही आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते, असेही पवार यावेळी म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!