महाराष्ट्र

कामगारांच्या पाल्यांसाठी राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय

– कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे

प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालये, ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे अद्ययावतीकरणासाठी राज्यस्तरीय समिती, तक्रार निवारणासाठी कामगार हेल्प लाईन

मुंबई, दि. १२ : राज्यातील कामगारांच्या पाल्यांना डॉक्टर होता यावे, यासाठी कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या रुग्णालयामध्ये राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविण्याची शिफारस कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे यांनी आज केली.

            कर्मचारी राज्य विमा मंडळाच्या महाराष्ट्र प्रादेशिक विभागाची ११३ वी बैठक आज मंत्रालयात पार पडली. यावेळी राज्यातील प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात यावे, यासाठी मंत्री डॉ.खाडे यांनी मान्यता दिली. या बैठकीस आमदार श्रीमती उमा खापरे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव नवीन सोना, कामगार आयुक्त सुरेश जाधव, कर्मचारी राज्य विमा मंडळाचे वरिष्ठ अधिकारी तसेच मंडळ सदस्य उपस्थित होते.

            कामगार मंत्री डॉ.खाडे यांनी उद्योग असलेल्या प्रत्येक जिल्ह्यात एक कामगार रुग्णालय बांधण्याच्या सूचना केल्या. त्याचबरोबर ५० हजारांपेक्षा कमी कामगार संख्या असलेल्या जिल्ह्यातही रुग्णालये बांधता यावीत, यासाठी उपाय करण्याचे निर्देश कर्मचारी राज्य विमा मंडळास आज दिले.

            आरोग्याच्या सर्व सेवा सुविधा कामगारांना उपलब्ध व्हाव्यात, यासाठी सध्या सुरू असलेल्या रुग्णालयात ब्लड बँक, पथालॉजी बरोबरच हृदय शस्त्रक्रिया आदी सोयी सुविधा मिळायला पाहिजेत. यासाठी ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे अद्ययावतीकरण करण्यावर मंत्री डॉ.खाडे यांनी विशेष भर दिला. कामगार रुग्णालये ही महाराष्ट्र शासनाच्या जागेवर बांधली असल्याने या रुग्णालयाची दुरुस्ती करण्यात अडचणी येत असून यावर लवकर तोडगा काढण्याच्याही सूचना केल्या. मोडकळीस आलेली कामगार रुग्णालयांच्या ठिकाणी अद्ययावत नवीन रुग्णालये बांधण्याची मंजुरी या बैठकीत देण्यात आली

            ई.एस.आय.सी.च्या रुग्णालयांना सर्वांत जास्त महसूल महाराष्ट्रातील कामगारांकडून जात आहे. कामगारांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी राज्यस्तरीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश मंत्री डॉ.खाडे यांनी दिले. या समितीवर लोकप्रतिनिधी समवेत शासनाचे वरिष्ठ अधिकारी नियुक्त असतील. ही समिती कामगारांना अत्याधुनिक सेवा सुविधा देण्यासंदर्भात अभ्यास करून आपला अहवाल शासनाकडे सादर करेल.

            राज्यातील कामगार रुग्णालयात कॉर्डियॉक ॲम्बुलन्स  देण्याबरोबरच ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे फायदे कामगारांना माहिती व्हावे यासाठी प्रचार व प्रसिद्धी करण्यावर भर देण्यात येणार आहे. त्याचबरोबर कामगारांच्या तक्रार निवारणासाठी एक हेल्प लाईन  सुरू करण्यात येणार आहे.

            मंत्री डॉ.खाडे यांनी सांगितले की, राज्य सरकार मार्फत प्रत्येक जिल्ह्यात कामगार भवन, रुग्णालय बांधण्याचे प्रस्तावित असून यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात आले आहे. नागपूरच्या बुटीबोरी एम.आय.डी. सी. येथे ई.एस.आय.सी.रुग्णालय बांधण्यास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!