पैठण
Trending

तलाठी रमेश फटागडे व कोतवालास वाळू माफियांची मारहाण, पैठण तालुक्यातील रहाटगाव ते आपेगाव रोडवरील सोलनापूर गावाजवळीळ घटना !

छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – विनाक्रमांकाच्या गाडीला थांबवून कारवाई करण्यासाठी पैठण तहसीलला वाळूने भरलेली झेनॉन गाडी घेऊन जाण्याचे सांगताच चौघांनी तलाठी व कोतवालाला मारहाण केली. तलाठी व कोतवालाने आरडा ओरड केल्याने चौघांनी गाडीसह पोबारा केला. ही घटना पैठण तालुक्यातील रहाटगाव ते आपेगाव रोडवरील सोलनापूर गावाजवळ रात्रीच्या सुमारास घडली. पैठण तालुक्यात वाळू माफियांची दादागिरी वाढली असून शासकीय कर्मचार्यांवर हात उचलण्याच्या प्रकारात वाढ झाली आहे. यामुळे प्रशासकीय अधिकार्यांमधून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

तलाठी रमेश पिराजी फटागडे (वय 51 वर्षे व्यवसाय नौकरी तलाठी सजा बालानगर, तहसिल कार्यालय पैठण, रा. बालानगर पैठण ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) यांनी पैठण पोलिसांना दिलेली माहिती अशी की, ते तहसील कार्यालय पैठण येथे मागील 08 वर्षांपासून नेमणुकीस आहे. मागील तीन वर्षांपासून बालानगर (ता. पैठण) या सजेमध्ये तलाठी पदाचे काम ते पाहतात. पैठण तहसिल कार्यालयाचे अधिकार क्षेत्रामध्ये चोरुन होत आसलेले वाळू, मुरुम, मातीचे उत्खनन व वाहतुक यांना आळा बसावा त्यांना पकडून त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी उपविभागीय अधिकारी पैठण फुलंब्री मुख्यालय यांनी आदेश काढला होता.

त्या आदेशाप्रमाणे गौणखनिजाची होणारी चोरी रोखण्याकरिता काल दि. 27/03/2023 रोजी सायंकाळी 20.00 ते दिनांक 28/03/2023 रोजीचे सकाळी 08.00 वाजेपर्यंत तलाठी रमेश फटागडे व सोबत रविंद्र रंगनाथ सोनटक्के (वय 32 वर्षे व्यवसाय कोतवाल)  ड्युटीवर खाजगी वाहनाने (ब्रेझा कारमध्ये) येत असतांना संध्याकाळी 10.30 वाजेच्या सुमारास रहाटगाव ते आपेगाव रोडवर सोलनापूर गावाजवळ मेनरोडवर समोरुन एक विनाक्रमांकाची टाटा कंपनीची झेनॉन गाडी येताना त्यांना दिसली.

त्यावेळी तलाठी तलाठी रमेश फटागडे यांच्या पथकाने सदर टाटा कंपनीची झेनॉन गाडीला हात दाखवुन थांबविले. त्यानंतर झेनॉन गाडीची पाहणी केली असता गाडीमध्ये अंदाजे एक ब्रास वाळु दिसून आली. त्यावरून विनाक्रमांकाची टाटा कंपनीची झेनॉन गाडी चालकास वाळु वाहतुकीचा परवान्याची विचारना केली असता चालकाने कुठलेही परवाना / रॉयल्टी नसल्याबाबत सांगितले. त्यावेळी तलाठी रमेश फटागडे यांनी सोबत असलेले कोतवाल रविंद्र रंगनाथ सोनटक्के यांना गाडीमध्ये बसून गाडी तहसिल कार्यालय पैठण येथे घेवून जाण्यास सांगितले असता तेथे झेनॉन गाडीमधील अनोळखी चालक व इतर दोन जण गाडीतून उतरले.

त्यांनी तलाठी रमेश फटागडे व कोतवाल यांच्यासोबत वाद घालण्यास सुरवात केली. तलाठी रमेश फटागडे व कोतवाल असे दोघेजण त्यांना समजावत असतांना झेनॉन गाडीमधील एका जणाने कोणत्यातरी व्यक्तीला फोन लावून सदर ठिकाणी बोलावून घेतले. त्यावेळी एक अनोळखी मोटार सायकवर तेथे आला व तलाठी रमेश फटागडे यांच्या सोबत वाद घालून वरील सर्व अनोळखी लोक भांडण करून शिवीगाळ करू लागले. तुम्हीजर या ठिकाणावरून आमची झेनॉन गाडी नेली तर तुम्हाला आम्ही जीवंत मारुन टाकु अशी धमकीही त्यांनी तलाठी व कोतवाला यांना दिली.

त्यानंतर तलाठी व कोतवाल यांना मारहाण करण्यात आली. तलाठी व कोतवालांनी आरडा ओरड केल्याने त्या अनोळखी चौघांनी वाळूची विनाक्रमांकाची टाटा कंपनीची झेनॉन गाडी सदर ठिकाणावरुन घेवून पसार झाले. त्यानंतर तलाठी तलाठी रमेश फटागडे यांनी तहसिलदार शंकर लाड, बैठे पथकचे ड्युटीवर असलेले पोलीस कर्मचारी यांना फोन करून सदर घटनेबाबत कळवले. नंतर तहसिलदार, पोलीस कर्मचारी त्याठिकाणी आले व अनोळखी वाळू माफियांचा व पळुन गेलेल्या झेनॉन गाडीचा शोध घेतला. याप्रकरणी तलाठी रमेश फटागडे यांच्या तक्रारीवरून चार अनोळखींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पैठण पोलिस करत आहे.

Back to top button
error: Content is protected !!