छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

शिक्षकांना मुख्यालयी राहण्यासाठी वेठीस धरणे व अशैक्षणिक कामाविरुद्ध प्राथमिक शिक्षक संघाचा उद्या शिक्षक दिनी एल्गार !

राज्यभरात ५ सप्टेंबर रोजी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन करणार

Story Highlights
  • तर "आम्हाला फक्त शिकवू द्या." ही आर्त हाक देत राज्यभरातील प्रत्येक जिल्हा कार्यालयावर आगामी काळात प्रचंड मोर्चाचे आयोजन

संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संबंधाने वेठीस धरणे व अशैक्षणिक कामाच्या विरोधात निषेध नोंदवण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने राज्यभरात ५ सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी काळ्याफिती लावून कामकाजाचा एल्गार पुकारला असून “आम्हाला फक्त शिकवू द्या.” ही आर्त हाक देत आगामी काळात राज्यभरातील जिल्हा परिषद आणि जिल्हाधिकारी कार्यालयांवर प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे यांनी दिली.

या संदर्भात हिवाळे म्हणाले की, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमधील शिक्षकांच्या अनेक मागण्या प्रदीर्घकाळ दुर्लक्षित आहेत. जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत कुठेही गंभीरता नाही. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संबंधाने वेठीस धरले जात आहे. अनुदानित शाळेतील शिक्षकांना व इतर सर्व कर्मचाऱ्यांना वेतन आयोगाच्या थकबाकीचे चारही हप्ते देण्यात आले. मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांतील प्राथमिक शिक्षकांना दुसरा, तिसरा व चौथा हप्ता मिळालेला नाही. १०, २०, ३० वर्षांची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आणि विषय पदवीधर शिक्षकांना समान न्यायाने पदवीधर वेतनश्रेणी लागू केलेली नाही.

वस्तीशाळा शिक्षकांची मूळ सेवा पेन्शनसाठी जोडल्या गेली नाही. १५ जून ला शाळा सुरु झाल्यापासून राज्यातील शिक्षकांना अध्यापना व्यतिरिक्त अनेक शालाबाह्य कामामुळे अध्यापनास पुरेसा वेळ मिळेना त्यामुळे त्याचा गुणवतेवर परिणाम होत आहे व यासाठी शिक्षकांना वेठीस धरले जाते. घरोघरी जाऊन नवभारत सारक्षता अभियान अंतर्गत निरक्षर सर्व्हेक्षण करणे, मतदार याद्या अद्यावत करणे, विविध शालाबाहय उपक्रम, विविध माहित्यांची रोज लिंक भरणे, ऑन लाईन माहित्या भरणे अशा अनेक शालाबाहय कामातून शिक्षकांची मुक्तता करा व गोरगरीबांच्या मुलांना गुणवतापूर्ण शिक्षण देण्यासाठी आम्हाला फक्त शिकवू द्या व प्रशासनाच्या दप्तर दिरंगाईच्या विरोधासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने ५ सप्टेबर रोजी काळ्या फिती लावून काम करणे व आगामी काळात राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यावर भव्य मोर्चांचे आयोजन करण्यात आले आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक शाळांमध्ये कार्यरत शिक्षकांच्या न्यायसंगत मागण्यांकडे दुर्लक्ष होत असून विविध कामांच्या पूर्ततेसाठी ऑनलाईन कामे करण्याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली जात आहे. त्याचा फटका गुणवत्तावाढीला बसून मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या शिक्षकांच्या जागांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा खेळखंडोबा झालेला आहे. शिक्षकांची संख्या कमी असतानाही कार्यरत असलेले शिक्षक विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत.

त्याचवेळी शिक्षकांना सातत्याने विविध प्रकारची शालेय कामे ऑनलाईन पद्धतीने पूर्ण करण्याची जबाबदारीही पार पाडावी लागत आहे. या साऱ्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या शिकवणीच्या मूळ जबाबदारी पासून शिक्षकांना दूर सारण्याचा प्रयत्न सातत्याने होत आहे. प्रशासकीय व्हॉटस् अ‍ॅप ग्रुपच्या माध्यमातून निरंतर माहिती, परिपत्रके, विविध नमुने, आदेश, घ्यावयाच्या परीक्षा यांचे पेपर, विविध अ‍ॅप पाठवून माहिती संकलित केली जात आहे. प्रशासनाकडून उलट टपाली, ताबडतोब, तत्काळ, विनाविलंब या नावाखाली व्हॉटस्ॲप माहिती वेळीअवेळी मागितली जात आहे. त्याची हार्डकॉपी दुसऱ्‍या दिवशी सादर करण्याचे आदेश केले जात आहेत. त्यामुळे शैक्षणिक कामामध्ये अडथळे येत आहेत.

यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिक्षकांना मुख्यालयी राहण्याच्या संबंधाने वेठीस धरणे व अशैक्षणिक कामाविरुध्द प्राथमिक शिक्षक संघाचा शिक्षक दिनी काळ्या फिती लावून निषेध आंदोलन तर “आम्हाला फक्त शिकवू द्या.” ही आर्त हाक देत राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर आगामी काळात प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संपर्कप्रमुख मधुकर वालतुरे, जिल्हाध्यक्ष राजेश हिवाळे, कैलास गायकवाड, बळीराम भुमरे, बाबासाहेब जाधव, गिनंदेव आंधळे, हारूण शेख, सचिन एखंडे, प्रशांत हिवर्डे, विष्णु बोरूडे, संजय भुमे, जालींदर चव्हाण, कृष्णा पाटील,बी.डी.जाधव, दिलीप साखळे, योगेश शिसोदे, संजय बागुल, भास्कर चौधरी, प्रवीण पांडे, नारायण नाईक, दर्शन पाराशर, किशोर पळसकर, नारायण साळुंके, संजय भडके, दुर्गादास बलांडे, शमीम पठाण, बळीराम भुमरे, लक्ष्मीकांत कोलते, प्रकाश साळवे, सागर पालोदकर, राजू लहाने, ईश्वर वैष्णव, बाळासाहेब हिलाले, दिवाकर चोपडे, गणेश पगारे, श्रीरंग अवचरमल, राजेश जंजाळ, कारभारी वरकड, संतोष थोरात, राजेश पवार, विनोद जाधव, महेश कापुरे, योगेश खरात, पांडुरंग अंभोरे, प्रदीप मोरे आदींसह पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

Back to top button
error: Content is protected !!