महाराष्ट्र
Trending

चीनमध्ये उद्रेक: कोविड १९ संकटाचे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने उपाययोजना राबवाव्यात: अजित पवार

Story Highlights
  • कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला.
  • चीन, जपान, कोरिया, ब्राझील या देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे.
  • चीनमध्ये बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्णांना अ‍ॅडमिट करण्याची वेळ आली आहे.

नागपूर, दि. २१ डिसेंबर – ‘कोरोना’ संकटाबाबतचा प्रशासनाला अनुभव आहे, महाविकास आघाडी सरकारच्या काळात कोरोनाची परिस्थिती चांगल्याप्रकारे हाताळली होती. ‘कोरोना’च्या नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता असून राज्यसरकारने ‘कोरोना’चा विषय गांभीर्याने घ्यावा, अशी मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात आज केली.

दरम्यान याला सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या माध्यमातून तातडीने टास्क फोर्स उभारणार असल्याची माहिती दिली.

गेल्या तीन वर्षात जगभरात ‘कोरोना’ने थैमान घातले आहे. चीनमध्ये पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. चीनमध्ये पुन्हा लॉकडाऊन करावा लागला. या पार्श्वभूमीवर राज्यात काय खबरदारी, उपाययोजना केली जात आहे ? असा सवाल केला.

कोरोनाच्या काळात मार्च महिन्यात दुबईतून आलेल्या जोडप्यामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढला. चीन, जपान, कोरिया, ब्राझील या देशात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट सापडत आहे आणि कोविडची साथ पुन्हा सुरू झाली आहे. चीनमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. बेड शिल्लक नाहीत म्हणून तिथे कारमध्ये रुग्णांना अ‍ॅडमिट करण्याची वेळ आली आहे.

याच पार्श्वभूमीवर केंद्रसरकारच्या आरोग्य सचिवांनी काल नव्या व्हेरिएंटविषयी तपास आणि काळजी घेण्याचे आवाहन सर्व राज्यांना केले आहे. त्यात आपलेही राज्य असेल. तर या सर्व गोष्टींचा विचार करता चीनमधील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी हायपॉवर कमिटी किंवा टास्क फोर्स आणि जगभरात काय केले जात आहे याचा अभ्यास करण्यासाठी आपण समिती नेमणार आहात का ? असा सवालही अजित पवार यांनी केला.

नवीन व्हेरिएंटचा प्रसार होऊ नये म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काळजी घेण्याची आवश्यकता आहे. बाकी कोणती यंत्रणा तात्काळ उभी करायची याचा अनुभव प्रशासनाला आहे. उद्धव ठाकरे यांच्या सरकारने कोरोनाची परिस्थिती चांगल्या प्रकारे हाताळली होती. त्यामुळे ‘कोरोना’चे गांभीर्य ओळखून राज्य सरकारने तातडीने पाऊले उचलण्याची मागणीही विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली.

Back to top button
error: Content is protected !!