भाजप नेत्याचा मद्यधुंद अवस्थेत बारमध्ये गोंधळ ! पोलिस हतबलतेने तमाशा अपमानित होऊन पाहत राहिल्याचा खा. संजय राऊतांचा आरोप, नेमकं प्रकरण काय ?
गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावल्याचा खा. संजय राऊतांचा आरोप
मुंबई, दि. १ – महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते. ‘रेडिओ’ बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. यासंदर्भात राऊत यांनी गृहमंत्र्यांना पत्र लिहून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शनिवार दिनांक २९ एप्रिल २०२३ रोजी पहाटे लिंक रोड, खार पश्चिम येथे घडलेल्या घटनेकडे मी आपले लक्ष वेधीत असेल्याचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे की, मुंबईत रेस्टॉरंट बार साधारण १ वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना सदर ‘रेडिओ’ बार हा पहाटे ३. ३० वाजेपर्यंत चालू होता. आतील धिंगाण्यामुळे आजूबाजूच्या परिसरात त्रास होऊ लागला. बाहेर ट्रैफिक जाम झाले म्हणून संभाजी ब्रिगेडचे सचिन कांबळे हे आत जाऊन विनंती करू लागले.
तेव्हा त्यांच्यावरच जबरदस्ती व धक्काबुकीचा प्रयत्न झाला. बारमध्ये मोठ्या प्रमाणात मुली होत्या व त्यांच्या गराड्यात भाजपचे एक तरुण नेते मोहित कम्बोज हे मद्यधुंद अवस्थेत होते. कांबळे यांनी पोलिसांना पाचारण केले, पण मोहित कम्बोज हे वर्दीतल्या पोलिसांशी दादागिरीच्या भाषेत अर्वाच्य पध्दतीने बोलू लागले. काही पोलिसांना धमक्या दिल्या. “हिमत असेल तर मला येथून बाहेर काढून दाखवा. मी आता देवेंद्रला फोन करतो बघा,” असे तो राज्याच्या गृहमंत्र्यांच्या नावाने धमकावू लागला व पोलीस हतबलतेने हा सर्व तमाशा अपमानित होऊन पाहत राहिले.
पोलिसांसमोर कम्बोज हे त्याही अवस्थेत दारू पित राहिले. याबाबतचे हॉटेल व बाहेरचे सीसी टीव्ही फुटेज त्वरित पोलिसांनी जप्त करावेत. कम्बोज हे वारंवार देवेंद्र फडणवीस, अमित शहा यांचा उल्लेख करीत असल्याने पोलीस दबावाखाली आले. ही बाब कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने गंभीर आहे. महाराष्ट्रात गृहमंत्र्यांच्या नावाने मोगलाई सुरू असल्याचे दिसून येते.
‘रेडिओ’ बार हा अंमली पदार्थांचे सेवन, विक्री तसेच पिकअप पॉइंट म्हणून कुप्रसिद्ध आहे. शनिवारी पहाटेपर्यंत येथे बेकायदेशीरपणे अंमली पदार्थांचे सेवन, विक्री सुरू होती व भाजपचे एक नेते तेथे मद्यधुंद अवस्थेत उपस्थित होते व गृहमंत्र्यांच्या नावाने पोलिसांना धमकावत होते. ही बाब गंभीर आहे. खार पश्चिमेचा रेडिओ’ बार कोणाच्या मालकीचा आहे, त्याचा तपास करून पोलिसांना धमकावणाऱ्या भाजप नेत्यावर गुन्हा दाखल करून त्वरित कारवाई व्हावी व नियम मोडणाऱ्या संबंधित ‘रेडिओ’ बारचा परवाना रद्द करावा. गृहमंत्री म्हणून आपल्या प्रतिष्ठेचा विषय असल्याने मी ही तक्रार करीत असल्याचे राऊत यांनी फडणवीस यांना लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे. या पत्राची प्रत राऊत यांनी विवेक फणसळकर पोलीस आयुक्त, मुंबई यांना पाठवली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe