राजकारण
Trending

अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे, अजित पवार पुन्हा स्वगृही परततील : नाना पटोले

शरद पवारांबद्दल काँग्रेस व उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत संभ्रम नाही

मुंबई, दि. २५- शरद पवार हे ज्येष्ठ व अनुभवी नेते आहेत. अजित पवारांनी त्यांच्याशी घेतलेल्या भेटीनंतर परत यावे असे अजित पवारांना वाटत असावे. अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवार यांनाही यश आले असावे असेच शरद पवार यांच्या विधानावरून दिसत आहे, त्यामुळे अजित पवार पुन्हा स्वगृही परततील असे चित्र दिसत आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.

प्रसार माध्यमांशी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, शरद पवार यांच्याबद्दल काँग्रेस पक्ष व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणताही संभ्रम नाही. उद्धव ठाकरेंची शिवसेना व काँग्रेस पक्ष मजबुतीने शरद पवारांच्या पाठीशी उभे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय चालले आहे व त्यांनी काय करावे हा त्यांचा अधिकार आहे. काँग्रेसने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे, भाजपाच्या विरोधात जे पक्ष लढण्यासाठी एकत्र येतील त्यांना सोबत घेऊन लढू.

लोकसभा निवडणुकीत मविआला जास्त जागा मिळतील या सर्वेवर बोलताना नाना पटोले म्हणाले की, आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षच सर्वात मोठा पक्ष म्हणून पुढे येईल असे दोन वर्षांपासून सांगत आहे. तेच चित्र या सर्वेतून पहायला मिळत आहे. लोकांचा काँग्रेस पक्षावर विश्वास वाढत आहे. जनतेने नरेंद्र मोदींवर विश्वास ठेवत बहुमताने सत्ता दिली पण जनतेला दाखवलेली स्वप्न मोदींनीच मोडीत काढली. प्रत्येकाच्या खात्यात १५ लाख रुपये जमा करू, दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करू, परदेशातील काळा पैसा आणू अशी भरमसाठ आश्वासने दिली पण त्यातील एकही ते पूर्ण करु शकले नाहीत.

मोदी सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. त्यामुळे जनतेत भाजपा व नरेंद्र मोदी यांच्याबद्दल तीव्र चीड आहे. राज्यातील “येड्याच्या” (EDA) सरकारनेही जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. शेतकरी लुटले जात आहेत, शेतमालाला भाव नाही म्हणून ते रस्त्यावर उतरले आहेत. पीक येताच बाजारात भाव पाडले जातात यामुळे लोक भाजपाला कंटाळले आहेत असेही नाना पटोले म्हणाले.

Back to top button
error: Content is protected !!